“स्वभावाच्या प्रेमात पडा, समोरच्याचा चेहरा “Automatic” सुंदर दिसायला लागतो..”
मधुश्री देशपांडे गानू
“दिल को देखो, चेहरा ना देखो …
चेहरे ने लाखों को लूटा..
दिल सच्चा और चेहरा झूठा….
“प्रेम” ही चिरंतन भावना आहे. याची कोणतीही व्याख्या नाही. कोणत्याही चौकटीत नाही बसवता येत. ही वैश्विक भावना आहे. नातं कोणतेही असलं तरीही प्रेम हा त्याचा पाया आहे. प्रेम हा शब्द उच्चारला की स्त्री-पुरुष प्रेम एवढीच समाजाची संकुचित व्याख्या आहे. त्यातही शारीरिक प्रेम, शारीरिक आकर्षण ही प्रेमाची पहिली पायरी असते. शारीरिक जवळीक हे प्रेम व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. पण स्वभाव जुळले नाहीत तर मात्र प्रेम संपायला वेळ लागत नाही.
माणसाची स्वाभाविक नैसर्गिक वृत्ती आहे, प्रथम दर्शनी जे डोळ्यांना सुखावतं ते लगेच आवडतं, मनाला भावतं. एखादी सुंदर, कमनीय बांधा असलेली स्त्री, एखादा उमदा, रुबाबदार, देखणा पुरुष लगेच आवडतो. मग आपण या चेहऱ्याच्या प्रेमात पडतो. चेहऱ्याच्या आकर्षणालाच प्रेम समजू लागतो. सरसकट असा एक गैरसमज असतो की सुंदर चेहरा असला की सर्वगुणसंपन्न असल्याची पावती जणू. सुंदर चेहरा दिसला की चालले मागे… मागचा पुढचा विचार नाही. असे महाभाग सहज आजूबाजूला दिसत असतात.
आता सोशल मीडियावर तर अनेक फिल्टर वापरलेले चेहरे फोटो म्हणून असतात. स्वतःची खोटी वेगळी ओळख निर्माण करायची केवढी हौस!! तेही ज्यांना आपण कधी पाहिलं नाही त्यांच्यासाठी… यातूनच सवंग प्रेम संबंध, स्वभावाची ओळख नसल्याने फसवणूक, एकाच वेळी अनेक जणांबरोबर प्रेमसंबंध असं काहीही सध्या घडत आहे. शारीरिक आकर्षण वाटणं अत्यंत सहाजिक असले तरीही हे काही क्षणांकरताच सुख असू शकतं.
सुंदर चेहरा ही कोणत्याही व्यक्तीची सर्वांगीण ओळख असूच शकत नाही. माणसाला अतिशय प्रगत अशी बुद्धिमत्ता दिली आहे. उत्तम विचार करणारं मन दिलं आहे. नुसत्या सुंदर दिसण्यावर कोणाचंही व्यक्तिमत्व अवलंबून नसतं. प्रत्येक व्यक्तीचे संस्कार, स्वभाव, चारित्र्य, संभाषण चातुर्य, संवेदनशील मन आणि त्यानुसार आचरण आणि कृती यावरून माणसातील माणूसपण ठरतं.
आजही समाजात “वरलिया रंगा” भुलणारेच जास्त आहेत. अतिशय सुंदर चेहरा आणि अत्यंत विकृत मानसिकता हे मी अनुभवले आहे. त्याचप्रमाणे अत्यंत सुंदर चेहरा आणि प्रगल्भ मानसिक-भावनिक समज अशाही व्यक्ती पाहिल्या आहेत. त्यामुळे कधीही दिसण्यावर एखाद्या व्यक्ती विषयी तुमचे मत बनवू नका.
प्रेम अगदी पहिल्या नजरेत होतं की हळूहळू सवयीने होतं हा मुद्दा आहेच. प्रथमदर्शनी तरी आपण त्या व्यक्तीच्या बाह्य व्यक्तीमत्वावरच भाळतो. मग मैत्री होते. हळूहळू दोघांनाही एकमेकांच्या स्वभावातील कंगोरे समजू लागतात. माणसाचा स्वभाव हाच त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. सुंदर चेहरा आणि स्वभाव जर चांगला, मनमिळावू नसेल तर मात्र हा सुरेख मुखवटा गळून पडायला वेळ लागत नाही. त्यामुळे प्रेमात नक्कीच पडा. खूपच सुंदर भावना आहे ही.
पण कोणत्याही निर्णयाप्रत येण्याची घाई करू नका. एकमेकांना पूर्ण समजण्यासाठी वेळ द्या. प्रेमात पडून दोन, चार तास एकमेकांना “Impress” करण्यासाठी भेटणं वेगळं आणि संपूर्ण जबाबदारीने पूर्ण आयुष्य 24 तास एकमेकांबरोबर काढणं संपूर्ण वेगळी गोष्ट आहे. एखादी सामान्य दिसणारी व्यक्ती जर स्वभावाने गुणसंपन्न असेल तर ती खरंच खूप छान दिसते. प्रत्येक व्यक्तीचे डोळे आणि हास्य या गोष्टी नितळ, निर्मळ, सुंदर हव्यात. प्रेमळ, भावनाप्रधान, मदतीसाठी तत्पर अशा स्वभावाच्या व्यक्तींचे हास्य निर्मळच असते. मग दिसायला त्या कशाही असल्या तरी चालतील. अगदी अत्यंत सुंदर अशी व्यक्ती असली तरीही ते काही तिचे स्वतःचे कर्तृत्व नाही. आपण फक्त आपला चांगला स्वभाव आणि कर्तृत्वाने नातेसंबंध टिकवून ठेवू शकतो.
स्वभाव जर जुळत नसतील तर अगदी नवरा-बायको म्हणून तुम्ही चोवीस तास एकत्र राहात असाल आणि याला समाजाची मान्यता ही असली तरीही त्यांच्यात प्रेम असेलच असे नाही. अशावेळी हे नातं फक्त तडजोड म्हणून उरतं किंवा घटस्फोटाच्या निर्णयाने संपतं. या हृदयीचे त्या हृदयी असे धागे असतील तरच प्रेम वृद्धिंगत होतं, टिकून राहतं. सगळ्याच नात्यांमध्ये हे घडतं. घडायला हवं.
एक स्त्री म्हणून मला जाणवलेली गोष्ट म्हणजे लग्नाच्या बाजारात सगळ्यांनाच सुंदर, गोरी बायको हवी असते. हे स्वतः कसेही असले तरी चालेल. पण स्वभाव कसा आहे?? याचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपल्या आवडी-निवडी जुळतात का?, निर्णय क्षमता कशी आहे?, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याची मानसिकता आहे का?, समजूतदारपणा याचा विचारच होत नाही.
आज कित्येक स्त्रिया घरासाठी राब-राब राबतात. घरातली कामं, आपली माणसं यापलीकडे त्यांना जगच नसतं. पण फक्त ती स्त्री “so-called” सौंदर्याच्या व्याख्येत बसत नाही म्हणून लग्नाला कितीही वर्षें उलटली तरी तिच्या दिसण्यावरून तिला टोमणे मारले जातात. हे अत्यंत अपमानास्पद आहे. केवळ या एका कारणामुळे बहुसंख्य स्त्रिया आत्मविश्वास गमावलेल्या असतात. फक्त सुंदर चेहरा एवढीच तिची ओळख आहे???
अगदी स्त्री असो वा पुरुष प्रेमाच्या नात्यात प्रेम तर हवंच, पण योग्य सन्मानही हवाच. त्याकरता तुमचा चांगला स्वभाव असणे गरजेचे आहे. तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीचा, तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराचा तुम्ही आदर राखायला हवा. त्याच्यावर विश्वास हवा. एकदा माणूस आपलं म्हटलं की त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारायची तयारी हवी. वेळप्रसंगी माफी मागणे, माफ करणे सहज व्हायला हवं. छोट्या छोट्या गोष्टीतही मोकळेपणाने कौतुकाचे दोन शब्द मिळायलाच हवेत. तरच नातं आयुष्यभर टिकतं.
तारुण्य आहे तोपर्यंतच सौंदर्य आहे. एका विशिष्ट वयानंतर मानसिक आणि भावनिक आधाराची गरज असते. शारीरिक आकर्षण हा मुख्य मुद्दा उरतच नाही. चांगल्या स्वभावामुळे हे प्रेमाचं नातं मानसिक आणि भावनिक पातळ्यांवर छान टिकून राहतं. आणि आपल्या माणसाचा स्वभाव एकदा आपल्याला आवडला की त्याचा/ तिचा चेहरा ” Automatic ” सुंदर दिसायला लागतो आणि जगणं ही बहारदार होतं.. हो ना!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


