Skip to content

स्वप्न असो की सत्य… डोळे लवकर उघडलेलेच बरे असतात……..!!

स्वप्न असो की सत्य… डोळे लवकर उघडलेलेच बरे……..!!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


डोळे उघडणे हा वाकप्रचार अगदी शाळेत असतानाही तुम्ही ऐकला असेलच……त्याचा अर्थ मात्र तेव्हा समजला असेलच असं नाही.पण जसं जसं आपण मोठे होत गेलो तसं तसं आपल्याला त्याचा अर्थ समजत गेला.

आयुष्यात डोळे उघडणं महत्त्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा वेळेवर डोळे उघडणे जास्त महत्त्वाच आहे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाचे डोळे उघडलेच पाहिजे. बंद डोळ्यांनी खूप सुंदर दिसतं सगळं. पण ती तर आपल्या डोळ्यावरची झापडं असतात हे आपल्याला काही कळत नाही.एकतर डोळे उघडणे हा असा दुर्मिळ प्रकार आहे.कारण सगळ्यांचेच डोळे वेळेवर उघडतातच असं नाही.

पण एकदा का मनुष्याचे डोळे उघडले तर त्याच आयुष्य अगदी बदलून जातं.आणि ते बदलणही गरजेचं असतं.आपण असं बऱ्याचदा ऐकतो की अरे तिचे डोळे उघडतील तर खरे….आज माझे डोळे उघडले बाई…..माझे डोळे उघडले नसते तर काय झालं असतं…??

डोळे उघडणे म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचे झाले तर एखाद्या गोष्टीबद्दल जाणीव होणे… एखाद्या गोष्टीबद्दल जागरूक होणे होय…

ताजीताजी उदाहरण आपण बघतच आहोत…..त्यातलच एक म्हणजे——आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्यातला महत्त्वाचा मुद्दा ताणला जातो तो म्हणजे रस्त्यातला “खड्डा”……!!आपल्या इथे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हेच कळत नाही. या खड्ड्यांमुळे कित्येकांचा जीवही गेला पण सरकारचे डोळे उघडले का….??सरकारचे डोळे आता तरी उघडणार का….??

आपण असे प्रसंग आपल्या रोजच्या जगण्यातही अनुभवत असतो. आपल्या आयुष्यात आपण एखाद्यावर खूप विश्वास ठेवतो.अगदी आंधळेपणाने….!!पण तीच व्यक्ती आपला केव्हा विश्वासघात करते आपल्यालाही समजत नसतं..त्यामुळे आपण वेळीच डोळे उघडलेले बरे असतात.

एखादी गोष्ट कितीही स्पष्ट आणि काचेसारखी पारदर्शक असली तरी त्याला एक दिवस तडा जाणार हे आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपले डोळे जागरूक ठेवले पाहिजे. आपल्याला वेळेवर त्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे. कारण वेळीच डोळे उघडले नाही तर पुढे जाऊन आपल्यावरच पश्चातापाची वेळ निश्चितच येते.

आपल्याला बंद डोळ्यांनी स्वप्न बघण्याची खूप सवय असते किंवा आपण बंदिस्त डोळ्यांनीच मोठमोठी स्वप्न बघत असतो…स्वप्नात काय काय बघतो आपण…??आपल्या अवास्तव अपेक्षा कोणीतरी अशा चुटकीसरशी पूर्ण केल्या… अरे यार ती/तो किती सुंदर आहे…ती/तो उद्या माझ्यासमोर येईल आणि मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करेल….अशी बरीच स्वप्न आपल्या बंदिस्त डोळ्यांना दिसत असतात…

पण प्रत्यक्षात असं किती आणि काय घडणार असतं काहीच माहीत नसतं.त्यामुळे आपण डोळे उघडलेलेच बरे….आणि बंदिस्त डोळ्यांनी स्वप्न बघण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनीच स्वप्नं पाहिलेली जास्त बरं…..!! आयुष्यात अगदी कोणीही आपले डोळे उघडू शकतं.एखादा भेटलेला अनोळखी व्यक्ती ते एखादा घडलेला प्रसंग ते अगदी एखादं पुस्तक….. अगदी कोणीही…!!

अगदी छोटे छोटे प्रसंग आपल्याला डोळे उघडायला भाग पाडतात. अभ्यास न करण्याचा मुलांना परीक्षेत सतत कमी गुण मिळत राहिले की शेवटी असं वाटतच आपणही अभ्यास केला पाहिजे त्याशिवाय आपल्याला चांगले गुण मिळणार नाही…. वर्षभर नाही पण वार्षिक परीक्षा जवळ येताच या मुलांचे डोळे उघडतात…खाड्कन जागी होतात ही मुलं….!! …..

आता प्रेमविवाह…..याला अजूनही सगळेच मान्यता देतात असं नाही. पण मान्यता मिळत नाही म्हणून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करणारे आणि जीवन संपवणारे आपण पाहतोच…पण मग जीव गेल्यावर मात्र पालकांची जी काही अवस्था होते ती काही वेगळी सांगायला नकोच…या अशा प्रसंगामुळे त्यांचे डोळे मात्र कायमचे उघडलेले असतात..

पण मग हेच डोळे जर लवकर आणि वेळेवर उघडले असते तर कदाचित या घडलेल्या गोष्टींना थांबवता आलं असतं.पण शेवटी एकदाचे का होईना डोळे उघडले ना….ते महत्त्वाचं…!!… आयुष्यात असे डोळे उघडणारे कित्येक प्रसंग येतात. आणि ते जरूर यावे.कारण डोळे उघडले की आपला रस्ता मोकळा होतो.

कोणतीच झापडं लावून आपण फिरत नाही. आणि आयुष्यात डोळे वेळेवर उघडणं खूप गरजेचं आहे कारण यामुळेच खरं जगणं काय असतंहे आपल्याला उमगतं.ईतके दिवस आपण कोणता बुरखा घालून जगत होतो आणि खरं काय आहे त्याची आपल्याला जाणीव होते.आणि एखादी गोष्ट कितीही खरी असेल….अगदी कारल्यासारखी कडू असेल तरी सावध राहून वेळीच डोळे उघडा……नाहीतर आयुष्य कायम झापडं लावूनच जगावं लागेल…. त्यामुळे स्वप्न असो की सत्य…..; डोळे हे लवकर उघडलेलेच बरे….!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!