Skip to content

स्वतःशी सकारात्मक नाते निर्माण करण्याच्या टिप्स वाचूया..!!

स्वतःशी सकारात्मक नाते निर्माण करण्याच्या टिप्स वाचूया..!!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


दोन्ही पंख पसरून
मनमोकळ उडावं…
स्वतःच्या अंतरंगात
खोल खोल बुडावं…!!

स्वतःशी स्वतःचं एक वेगळच नातं असतं.कधी कुणाच हळवं , प्रेमळ , हक्काच , तिरस्काराच तर कधी कुणाच अगदी फुलपाखरासारखं रंगीबेरंगी नी सुंदर असं नातं स्वतःशी असतं.अगदी वरच्या चारोळी प्रमाणे काही जणं मनमोकळं उडत असतात.स्वतःच्या सुंदर अंतरंगात काय चाललय हे अगदी आनंदाने शोधत असतात.

पण कधी कधी हे नातं सकारात्मक तर कधी नकारात्मक सुद्धा असतं.पण अनेकदा स्वतःचं स्वतःशीच नकारात्मक आणि शत्रूचं नातं असतं.आपण स्वतःलाच नकोनको त्या गोष्टींमुळे खरच खूप त्रास देत असतो.इवल्याशा जीवाला त्रास देताना आपण कणभरही कचरत नाही.सतत त्याला त्रास देऊन , नकोनको ते विचार करून एका नकारात्मक वातावरणाशी त्याला आपण अनावधानाने जोडत असतो.

आणि मग दिवसेंदिवस आपलच आपल्याशी असणारं हे नातं केव्हा नकारात्मक होऊन बसतं काही कळतही नाही. पण नकारात्मक नातं कितीस चांगलं असणार आहे…? आणि आपल्याला तर स्वतःचं नातं सोडून अजून बरीच नाती असतात.ज्यांना आपल्याला जीवापाड जपायच असतं.पण मला वाटतं की इतरांशी नाती जोडताना , निर्माण करताना ती नकारात्मक भावना आडवी यायला नको.

नकारात्मक मनाने एखादी सुरुवात करायची तर ती कितीशी चांगली होणार…? त्यामुळेच , त्यासाठीच सर्वप्रथम आपलं आपल्या स्वतःशीच सकारात्मक नातं निर्माण होणं आवश्यक आहे.

आपल्याला वेगवेगळ्या टिप्स वाचायला खूप आवडतं. जसे की , आहारविषयक , त्वचेच आणि मनाच सौंदर्य ,मानसिक आणि शारीरिक आरोग्य , करिअर , प्रोफेशन ते अगदी कोणत्याही जीवनशैलीवर आधारित टिप्स आपल्याला वाचायला आवडतात.

चला तर अशा काही टिप्स आपणही पाहुयात.स्वतःशी सकारात्मक नातं कसं निर्माण करायचं याबद्दल……!!

*रोज सकाळी उठल्यावर आरशात पाहून स्वतःला एकदा तरी सांगा की तु तनामनाने खूप सुंदर आहेस.

*तु मनमुराद हसताना खूप छान दिसतेस/दिसतोस , मग तुला हसायलाच हवं असं ठणकावून स्वतःला रोज सांगा.

* आपणसुद्धा रंगीबेरंगी फुलपाखरं आहोत असं समजून या फुलांवरून त्या फुलांवर मनसोक्त बागडायला शिका.

*स्वतःला आवडतात त्या गोष्टी करण्याला प्राधान्य द्या.एखादा छंद असेल तर तो जोपासा.त्यातून आपण आपल्याशी अगदी सहजपणे ‘connect’ होतो.आणि हे ‘connect’ होणच खूप महत्वाच असतं.

*स्वतःशी प्रेमाचा सुसंवाद साधा.स्वतःला बोलतं करा.स्वतःशी हक्काने , बिंधास्त भांडा.आपलच आपल्याशी किती स्वच्छ आणि जवळच नातं आहे याची जाणीव तुम्हाला होईल.

*म्युझिक थेरपी स्वतःवरच ट्राय करून बघा.आणि गाणी किंवा एखादी नॉर्मल धून ऐकताना ती जितकी सकारात्मक असतील तितकी सकारात्मक ऐका.कारण ऐकताना आपण त्यांचे lyrics सुद्धा feel करत असतो.

*सकाळी किंवा रात्री मस्तपैकी चालायला जा.हवेत गारवा असतो.त्याने मनाला ऊर्जा मिळत असते.आणि मनाला नवी ऊर्जा मिळाली की सकारात्मकता आपोआप आपल्याशी जोडली जाते.

*स्वतःचं एकदा तरी कौतुक करा.एकदा तरी स्वतःच स्वतःच्या पाठीवर कौतुकाचा , मायेचं लोणी शिंपडलेला धपाटा द्यायला विसरू नका.

* स्वतःला काही साधे , सोपे सकारात्मक प्रश्न विचारा.जसे की- *आज का हसलो..?
*आज मी का खूश आहे..?

*आजचा सगळ्यात सुंदर क्षण कोणता…?

अशा प्रकारचे प्रश्न स्वतःलाच विचारा जेणेकरून स्वतःच स्वतःशी असणारं नातं अजून फुलायला लागेल.

या झाल्या काही छोट्या छोट्या टिप्स…यांच्यामुळे आपलं स्वतःशीच एक सकारात्मक नातं निर्माण होईल.यासारख्या अजून काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला स्वतःला खूप छान वाटतं.वेगवेगळ्या कला ,क्रीडा , छंदामधून आपण व्यक्त होत असतो.स्वतःशीच जास्त चांगल्या प्रकारे जोडले जात असतो.त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच स्वतःशी सकारात्मक नातं निर्माण व्हायला फार वेळ लागणार नाही.

जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.तुम्हाला काही टिप्स माहीत असतील तर त्यादेखील इतरांपर्यंत पोहोचवा. कारण आनंद दिल्याने द्विगुणित होतो.वाढतो.अगदी तसच सकारात्मकता शेअर केल्याने अजून वाढेल. काय मग….करताय नं शेअर……???

नक्की शेअर करा…स्वतःबरोबर इतरांच आयुष्यही सुंदर आणि निरोगी करा.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!