“स्वतःला सुधारण्यात वेळ घालवला तर फुकटचा मनस्ताप होणार नाही.”
मधुश्री देशपांडे गानू
“क्यूँ मैं किसी से खुशियां उधार लूं??
क्यूँ ना मैं अपनी खुशियों का आशियां खुद ही बना लूं..
और बस खुशियां बांटती रहूं……”
माझ्या एका कवितेतील काही ओळी आहेत या. आणि किती खरं आहे ना! आपल्या आनंदासाठी का आणि किती आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं ना! “माझा आनंद माझ्यातच सामावलेला आहे.” हे एकदा लक्षात आलं की आयुष्याची वाट सोपी होते.
माणूस एकटा जगू शकत नाही, हे तर सत्य आहेच. त्याला मनमोकळा संवाद साधायला, स्वतःचं सुखदुःख सांगायला कोणीतरी भागीदार लागतोच. अगदी मोजकी का होईना स्वतःची हक्काची, प्रेमाची, विश्वासाची माणसं प्रत्येक व्यक्तीला हवी असतात. कधीतरी भावनिकही कोणावर तरी अवलंबून राहण्यात सुखच आहे. निस्सीम प्रेम करणारं, मला समजून घेणारं एक माणूस या जगात आहे, ही भावनाच किती सुखावह, समाधान देणारी आहे. प्रत्येक व्यक्ती या अशा प्रेमाच्या माणसाच्या शोधात असते. मनाला जी शांती, सुकून हवा असतो त्याच्या शोधात असते. अशी प्रेमाची व्यक्ती ज्याच्या आयुष्यात असते तो खरा भाग्यवान!
पण सगळ्यांच्याच बाबतीत असं घडत नाही. प्रत्येक व्यक्ती ही गुणदोषांसहित बनलेली असते. कधी आपण चुकतो, कधी समोरची व्यक्ती चुकते. अपूरा संवाद, गैरसमज, सहवासाची उणीव, अविश्वास अशा अनेक कारणांनी कोणत्याही नात्याची वीण सैल होत जाते. “मीच का पडतं घ्यायचं?” यामुळे अनेक नाती संपतात.
“नातेसंबंध” अनेक पदर असलेला विषय. नातं मग ते कौटुंबिक, प्रेमाचं, नोकरी व्यवसायाचं, कायमस्वरूपी, तात्पुरतं कसं ही असलं तरीही प्रत्येक नात्याच्या किमान अपेक्षा असतात. तशाच प्रत्येक नात्याचा मर्यादाही असतात. हे आपण आधीही पाहिलं आहेच. पण या अपेक्षांच्या जेव्हा अटी होतात, तेव्हा नातं बिनसायला सुरुवात होते.
“मी म्हणते/ म्हणतो तेच बरोबर” किंवा “माझ्या मनाप्रमाणेच तू वागले पाहिजे.” असे जेव्हा होतं तेव्हा तेढ निर्माण व्हायला सुरुवात होते. अगदी घरात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी ही तुम्हांला अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगांना किंवा अपमानित प्रसंगांना किंवा अपेक्षाभंगांना सामोरे जावे लागते. कित्येकदा अनेक अकल्पित, दुर्दैवी घटनांना सामोरे जावे लागते.
अशावेळी स्वतःच्या भावनांवर योग्य नियंत्रण ठेवून स्वतःमध्ये बदल करून तुम्ही पुढे जात राहीलात तरच आयुष्य सहज होतं. नाहीतर दुःखाने, नैराश्याने अतिविचारांनी तिथेच अडकून पडणार्यांना फक्त मनस्ताप होतो. आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं. “समोरची व्यक्ती कशी वागते, काय बोलते, अकस्मात घडणारे प्रसंग, घटना यावर आपले नियंत्रण असत नाही पण यावर आपण काय आणि कसा प्रतिसाद द्यायचा ते आपणच ठरवू शकतो.”
सर्वात प्रथम आत्मसन्मानाची तीव्र भावना स्वतःमध्ये जोपासायला हवी. स्वाभिमान आणि अहंकार यातील रेषा पुसट असते. या दोन्हींमध्ये योग्य फरक करता यायला हवा. स्वतःवर निरतिशय प्रेम हवं. स्वतःच्या आयुष्याचे ध्येय नीट माहीत असायला हवं. आणि त्यासाठी योग्य प्रामाणिक प्रयत्नही करायला हवेत.
उदाहरणार्थ.. समजा कार्यालयीन कामात तुमच्या हातून चूक झाली आणि वरिष्ठ तुम्हांला यावरून बोलले. आता या छोट्या घटनेला तुम्ही कसे सामोरे जाता हे महत्त्वाचं आहे.
तुमच्या हे लक्षात यायला हवं की माझ्या कामामध्ये सुधारणा व्हावी म्हणून मला वरिष्ठ बोलले. त्यांचा हेतू चांगला होता. मग मी माझ्यात सुधारणा करायला हवी. पण याच घटनेकडे तुम्ही नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर तुम्ही वरिष्ठांचा राग राग कराल. वरिष्ठांना कसा धडा शिकवता येईल याचा विचार कराल. किंवा रागाच्या भरात नोकरी सोडण्याचा टोकाचा निर्णय घ्याल.
तुम्ही शांतपणे सकारात्मकतेने स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न केलेत तर तुमची प्रगती आहेच. नाही तर नकारात्मकतेने नोकरी सोडण्याचा निर्णय तुम्हांला मनस्ताप देऊ शकतो. अगदी घरात कुटुंबातही असे अप्रिय प्रसंग घडत असतात. दुसऱ्यांना नावं ठेवण्याचा किंवा सुधारण्याचा व्यर्थ प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यासाठी वेळ द्या. जसं स्वतःचा स्वाभिमान जपणं गरजेचं आहे, स्वतःचा सन्मान महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीचा सन्मानही तेवढाच महत्त्वाचा आहे.
मनस्ताप होऊ नये किंवा चुकीच्या निर्णयाने पश्चाताप होऊ नये याकरता काय करावे?? तर “स्वतः वर लक्ष केंद्रित करावे.” स्वत:ला सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. सर्वात प्रथम जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारणे. सातत्याने कार्यरत राहणे. रिकामपण शरीर मनाचं वाईटच. आपल्या आवडीचं काम , छंदात स्वतःला गुंतवून ठेवणे गरजेचे आहे.
आपल्या ऊर्जेची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आनंदी होण्यासाठी प्रयत्न करणे. स्वतःबद्दल कमीपणाची भावना बाळगू नका. आपल्या हातून चुका होतात हे मान्य करा. निर्मळ मनाने माफी मागा. समोरच्याची चूक असेल तर माफ करा. यामुळे स्वतःच्या प्रगतीसाठी मार्ग निर्माण होतो. स्वतःची प्रशंसा करा. म्हणजे एखादी छानशी गोष्ट तुमच्या हातून घडली तर ती लिहून काढा. स्वतःचा आदर करा. स्वतःला वेळ द्या. या संपूर्ण प्रक्रियेसाठी नक्की वेळ लागेल. लिहिणं सोप्पं आहे, अंगीकारणं कठीण. पण अशक्य नाही ना! सातत्याने, प्रयत्नाने सवय लागते.
हसतमुख, प्रसन्न चेहऱ्याने वावरण्याची सवय लावून घ्या. संवाद कोणाशीही झाला तरी विनम्रतेने होऊ द्या. स्वतःचे मत, विचार स्पष्टपणे योग्य शब्दांत मांडा. स्वतःची कोणाशीही तुलना करू नका. स्वतःची प्रगती ही बढाई मारण्यासाठी वापरू नका. जरूर पडल्यास योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. यात कमीपणा वाटू देऊ नका. नकारात्मक व्यक्तींपासून लांब राहा. सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात राहा. शरीर आणि मन दोन्हींचा आदर राखत दोन्हींचे आरोग्य जपा.
अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींनी तुम्ही स्वतः मध्ये सातत्याने सुधारणा करू शकता. यामुळे तुमचे नातेसंबंधही सुधारतात. “ज्या प्रसंगांवर, माणसांवर आपले नियंत्रण नाही त्यासाठी आपली ऊर्जा का खर्च करायची?” रागाला रागाने उत्तर, अपशब्दाला अपशब्दाने उत्तर याने फक्त तुमचा मनस्ताप वाढतो. मानसिक आरोग्य बिघडते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यशील, प्रयत्नशील राहा. आणि यशस्वी, आनंदी, समाधानी होऊन स्वतःचेच ” The Best Version” व्हा…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


