Skip to content

स्वतःला शोधण्याचा न संपणारा हा प्रवास करत रहा!

स्वतःला शोधण्याचा न संपणारा हा प्रवास करत रहा!


सौ. मयुरी महेंद्र महाजन

पुणे (चिंतामणी चौक)


शोध या शब्दाशी सर्वजण परिचित आहेतच पण शोध एका दिवसात एका रात्रीत कधीच लागत नसतो मग तो कुठलाही असो जसे की विजेचा शोध लागला मग नंतर नवीन नवीन तंत्रंज्ञान विकसित होत गेले आणि आता ते आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेले आहेत, मोबाईल जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्याचा आकार त्यामध्ये असणाऱ्या सर्वच गोष्टी आता पेक्षा पूर्ण वेगळ्या होत्या कदाचित आज असणाऱ्या गोष्टी उद्या नाहीशा होतील त्या जागी काहीतरी वेगळी साधने असतील हे सर्व शक्य होते ते फक्त शोधामुळे …..

या जगात सर्व काही मिळणे सोपे परंतु स्वतःच स्वतःला शोधणे कठीण कारण हा निरंतर चालणारा प्रवास आहे आपण सर्वजण जन्मल्यापासून तर आजतागायत हळूहळू शिकत गेलो, मोठे झालो …तसे आपल्याला स्व जाणीव काय असते ,आपण स्वतः काय आहोत आपण कोण आहोत?? कुठून आलो??? कुठे जायचे आहे ???

अशा प्रश्नांनी आपण आयुष्याचा प्रवास करत असतो या जगात सर्वात अगोदर आपले आपल्या स्वतःशी नाते आहे, दुसऱ्या कुणाला शोधायला वेळ लागत नाही ,परंतु स्वतःला स्वतःचा शोध लागायला खूप वेळ लागतो या निरंतर चालणार्‍या प्रवासात आपल्या सर्व क्षणांचे साक्षीदार आपण स्वतः असतो कधी कधी आपल्या समोर अचानक पणे अशी परिस्थिती निर्माण होते त्यातून मार्ग काढणे अवघड असते.

परंतु आपण अशा परिस्थितीला सुद्धा खूप छान पद्धतीने अलगद मार्गी लावतो आणि नंतर जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते की खरच माझ्यामध्ये हीसुद्धा क्षमता होती परंतु मी मात्र त्याकडे लक्ष दिले नाही म्हणजे मला ही गोष्ट सुद्धा खूप छान पणे मार्गी लावता आली तर येणार्‍या पुढच्या काळात मी माझ्या क्षमतांना अजुन ताकदीने मजबूत करू शकतो …

या गोष्टींची जाणीव आपल्याला स्वतःला तेव्हाच होते जेव्हा आपण आपल्या प्रवासात स्वतःला शोधत शोधत आपल्या हातात अशा काही गोष्टी लागतात याची आपण कल्पना सुद्धा केलेली नसते, त्यामुळे स्वतःला शोधण्याचा न संपणारा हा प्रवास करत राहा …….आपण किती बरोबर आणि किती चुकीचे याचे उत्तर फक्त आपल्याला आपण स्वतः देऊ शकतो….

दुसऱ्या व्यक्तीची चूक आपल्याला फार पटकन दिसते परंतु त्याच ठिकाणी आपली चूक मात्र दिसत असून सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो सर्वच गोष्टी आपल्याला आपल्या जवळ मिळणार आहे ,प्रत्येक गोष्टीचे मूळ आपल्यातून सुरू होते आणि आपल्या आत मध्ये संपते जसे येताना प्राण कुठून येतो….. आणि जाताना प्राण कुठे जातो…..या अलौकिक परमेश्वरी शक्तीला आपण देवत्वाच्या ठिकाणी राहून पुजतो…. त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकात या अलौकिक शक्तीचा वास आहे…. त्यात आत्म्याचे आपण कायम पूजन केले पाहिजे, कारण ती शक्ती आपल्यात आहे तरच आपल्या असण्याला अर्थ आहे…….

प्रवास आपल्यासोबत सुरू होतो आणि आपल्याबरोबरचं संपणार असतो कदाचित आपल्या मध्ये खूप काही करण्याची शक्ती दडलेली असेल पण आपण जर तिचा शोध घेतलेला नसेल तर त्या असलेल्या शक्तीची महती बाहेर कळणार कशी….

जसे की दुधामध्ये तूप असतेच पण त्या दुधापासून तूप बनवण्यासाठी जी काही प्रक्रिया पद्धत असते ती जर का आपण पूर्णचं केली नाही तर त्यातून तूप बाहेर येणार तरी कसे अगदी त्याचप्रमाणे आपल्या सर्वांमध्ये सुद्धा काही ना काही अलौकिक दडलेले असतेच फरक फक्त इतकाच असतो की आपण कधी ती प्रक्रियाच पूर्ण करत नाही….. स्वतःचा शोध काही एका दिवसात आपल्याला लागणार नाही त्यासाठी आपल्याला हा प्रवास करावा लागणार …..त्यासाठी प्रयत्न करावे लागणार…..

“”स्वताःला शोधन्याचा न संपणारा प्रवास करत राहा ……
आजचा उद्याचा विचार सोडत राहा ………
हसत खेळत जगत रहा …….
आपल्या आनंदाचा खजाना आपल्यातच आहे तो शोधत राहा…………””

मित्रहो, या जीवन प्रवासात वेग वेगळ्या टप्प्यावरती आपल्यालाच आपली नव्याने ओळख होत असते ….तोचं क्षण आपल्यातल्या स्वला शोधण्याचा क्षण असतो ,शोध घेतल्यावर सर्व गोष्टी चांगल्याचं हाती लागतील असे नाही त्यात कधी चुका, त्वेष, घृणा आणि अजून काय काय हाती लागू शकते, त्यामध्ये अडकू नका पण त्यातून धडा घ्या पुढच्या प्रवासात तुम्हाला या गोष्टीमुळे कुठेही अडचण येता कामा नये हाच आपल्या स्वताला शोधन्याचा खरा उद्देश्य परिपूर्ण कोणीही नाही….

परंतु झालेल्या गोष्टीत अडकून न राहता आपल्या मध्ये आपल्याला शोधण्याचा हा प्रवास करत राहा….. आणि आयुष्याच्या वाटेवर असलेले सुवर्णक्षण जगत रहा….. आयुष्याच्या वाटेवर कायम स्वतःसोबतच्या क्षणांना भरभरून जगत चला…..!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “स्वतःला शोधण्याचा न संपणारा हा प्रवास करत रहा!”

  1. संजय माने

    स्वताला शोधण्याचा न संपणारा प्रवास…हे वाक्यच खुप काही सांगून जाते…झालेल्या चुका मधून शिकत पुढे जाणे आणि स्वताच्या वाढलेल्या क्षमते वर विश्वास ठेवत वाटचाल करते राहणे हेच् तर् यशाचे गमक…खुप छान !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!