“स्वतःला न पटणार्या गोष्टी स्पष्ट कशा नाकारायच्या?”
मधुश्री देशपांडे गान
काही वर्षांपूर्वी “पिंक” नावाचा हिंदी चित्रपट आला होता. त्यात श्री अमिताभ बच्चन यांनी एका वकीलाची भूमिका साकारली होती. त्यात भर कोर्टात पीडित तरुणीची बाजू मांडताना त्याच्या तोंडी एक सुंदर परिच्छेद आहे. “नाही. नाही हा फक्त एक शब्द नाही तर पूर्ण वाक्य आहे. याला कोणत्याही व्याख्येची, स्पष्टीकरणाची, तत्त्वज्ञानाची गरज नाही. नाही म्हणजे नाहीच. नाही म्हणणारी मुलगी मग तुमची बहीण असो, मैत्रीण असो, बायको असो किंवा अगदी वेश्या असली तरीही नाही चा अर्थ नाहीच होतो. जेव्हा कोणी नाही म्हणतं तेव्हा तुम्ही थांबा असा त्याचा अर्थ आहे.”
किती स्पष्टपणे योग्य शब्दांत इथे “नाही” ची व्याख्या सांगण्यात आली आहे. पण नाही चा अर्थ आम्हांला माहीत नाही. आपली सामाजिक संरचना, कौटुंबिक बांधणी, समाजाचा दृष्टीकोन, आपल्यावर होणारे संस्कार, येणारे अनुभव हे सगळं हेच सांगतात. नाही चा नीट अर्थच आम्हांला माहित नाही. मान्य नाही. म्हणूनच तर कोणत्याही वयाच्या स्त्री वर आज विकृत, निर्मम अत्याचार होताना दिसत आहेत. कारण नाही ऐकायची आम्हांला सवयच कोणी लावलेली नाही. कोणीतरी आम्हाला नाही म्हणत आहे, हा आमचा अपमान आहे असा सहज समज आम्ही करून घेतो. आणि मग त्याचे टोकाचे परिणाम होतात.
“लोक काय म्हणतील?” हा आणखी एक मोठा गैरसमज. आपण कोणतीही गोष्ट करण्याआधी स्वतःचा विचार न करता लोक काय म्हणतील? याचा विचार करतो. कुटुंबातील सदस्यांच्या भीतीपोटी, समाज काय म्हणेल या समजा पोटी, स्वतःला न पटणाऱ्या, एकही क्षण आनंद न देणाऱ्या अनेक गोष्टी अनेक वर्षं आयुष्यभर करत असतो. कधी भीडेपोटी, कधी नाती तुटतील म्हणून, कधी भीतीपोटी आजही बहुतेक लोक स्वतःच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी केवळ स्पष्टपणे “नाही” म्हणता येत नाही म्हणून निभावताना दिसतात. अगदी मनाविरुद्ध लग्न, मुलं-बाळं, संसारही होतात अनेकांचे…
स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी, मानसिक शांतीसाठी तुम्हांला काही वेळा स्पष्टपणे नाही म्हणता आलं पाहिजे. पण नाही जमत अनेकांना. काही उदाहरणे घेऊ रोजच्या जीवनातली. एक साठीतील स्त्री स्वतः व्यवस्थित नोकरी, घर सांभाळून आता निवृत्त जीवन जगणारी. तिची नुकतीच आलेली सून. घरासाठी अजिबात वेळ न देता करिअरला प्राधान्य देणारी. अशा सुनेबद्दल सासूची असलेली तक्रार की तिने घरकाम करावं,
व्रतवैकल्यं, कुळाचार करावेत. सुनेचं स्पष्ट “नाही” म्हणणं तिला स्वीकारता येत नाही. का?? जर तुम्हांला आधीपासून हे माहित आहे की ती हे करणार नाही. तर तुम्ही नाराज होण्याचं आणि तिला दुषणे देण्याचे कारणच काय?? तुमचा मुलगा करिअरला प्राधान्य देतो हे तुम्ही मान्य करता ना! तेच सुनेच्या बाबतीत का नाही? कारण काळाप्रमाणे होणारे बदल आपण सहज स्वीकारत नाही.
दुसरा एक प्रसंग माझ्या बाबतीत घडलेला. माझ्या पतीचे अकाली, अचानक निधन झाल्यावर मी सावरत होते. काही ठराविक बायकांचं असं म्हणणं होतं की तू आता देवधर्म, पोथ्या पुराणं, पूजाअर्चा असं करायला हवं. मी स्पष्ट “नाही” सांगितलं. कारण हा माझा पिंडच नाही. देवावर अढळ श्रद्धा पण कर्मकांडावर विश्वास नाही. माझ्या आवडीनिवडी मी जाणीवपूर्वक जोपासल्या. मानसशास्त्रीय, सामाजिक लेखन, हिंदी मराठी इंग्रजी भाषांतून कविता, शास्त्रीय नृत्य, समाजकार्य यात मी स्वतःला गुंतवून घेतलं. मी मैत्रिणींबरोबर खूप धमाल करते. सहलीला जाते. मला आवडतं तसं राहते. मंगळसूत्र घालते. आयुष्य भरभरून जगते. पण या ठराविक बायका याला नावंच ठेवणार ना! अर्थात मला फरक पडत नाही, कारण माझे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी माझ्याबरोबर आहेत. माझं आयुष्य कसं जगावं? हा सर्वस्वी माझा निर्णय आणि माझी जबाबदारी आहे.
सांगायचा मुद्दा एवढाच की मनाविरुद्ध कोणाच्याही सांगण्यावरून मनाला न पटणाऱ्या, तुम्हाला आनंद न देणाऱ्या गोष्टी तुम्ही कधीही करू नका. नकार देणं हा प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण अधिकार आहे. कोणाच्याही दबावाखाली येऊन हो म्हणू नका. कित्येकदा कौटुंबिक, सामाजिक, कार्यालयीन स्तरावर असे प्रसंग आपल्यासमोर येतात. अशावेळी आत्मविश्वासाने, स्पष्टपणे, ठामपणे आणि शांतपणे नाही म्हणायला शिका. बर्याच माणसांना नाही म्हणायची भीती वाटते. अशावेळी पटेल असं स्पष्ट कारण द्यावं.
आता “स्वतःला न पटणार्या गोष्टी स्पष्ट कशा नाकारायच्या.” ते पाहू.
१)तुमच्या विचारांमध्ये स्वच्छपणा, स्पष्टता हवी.
२) तुम्हांला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे लक्षात घ्या.
३) तुमचा सहज वापर करण्याची संधी कधीही कोणालाही देऊ नका. तुमचा आत्मसन्मान ही तुमच्यासाठी प्राधान्यता असली पाहिजे.
४) स्वतःच्या विचारांमध्ये, कृतीमध्ये स्पष्टपणा, ठामपणा, आत्मविश्वास हवा. ५) वैयक्तिक, सामाजिक, कार्यालयीन स्तरावर स्वतःभोवती काही मर्यादांची चौकट घालून घ्या. नाही म्हणताना कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.
६) स्वतःबद्दल कमीपणाची भावना, न्यूनगंड बाळगू नका.
७) तुम्ही नेहमीच सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही, हे समजून घ्या.
८) तुमची स्वतःची प्राथमिक गरज तुम्ही स्वतः आहात. स्वतःला प्राधान्य देताना मागेपुढे पाहू नका.
९) दुसर्यांनी कौतुक करावं म्हणून तुमच्या मनाविरुद्ध काहीही करू नका. खूप बायकांना अशी सवय असते. त्यांना वाटते आपण “ऑलराउंडर” असावं. मला सगळेच आलं पाहिजे आणि सगळ्यांनी माझं सतत कौतुक करावं, असा बायकी हट्ट अनेकींचा असतो. याची खरंच काहीही गरज नाही. तुम्ही स्वतःला आहात तसे पूर्णपणे स्वीकारा.
१०) स्पष्टपणे, ठामपणे, आत्मविश्वासाने नाही म्हणताना तुमचा आवाज, त्याचा पोत, तुमची देहबोली खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीचा आदर राखणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.
११) तुमचं अंतर्मन ही सर्वात सशक्त रडार यंत्रणा आहे. ती तुम्हांला सतत बरोबर सूचना देत असते. तुमच्या मनाचे म्हणणं नक्की ऐका.
१२) काहीवेळा तुमच्या नाही म्हणण्याने इतरांना संधी मिळते.
१३) नाही म्हणतानाही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
१४) सतत “होयबा” होणे कोणासाठीही योग्य नाही.
अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही तुम्हांला न पटणार्या गोष्टी नाकारू शकता. कोणत्याही प्रसंगात स्वतःला स्पष्टपणे विचारा की , “याने मला मदत होणार आहे का?, आनंद मिळणार आहे का? ” उत्तर नाही आले तर स्पष्टपणे नाही म्हणा. तुमचं आयुष्य आनंदी, समाधानी, सुखी होण्यासाठी फक्त तुम्ही जबाबदार आहात. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आत्मविश्वासाने सुंदर आयुष्याला “हो” म्हणा….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



छान. उत्तम संदेश.
मला आलेल्या अनुभवतील ऐक शुंखला. माझी बाहेर गावी नोकरी, पत्नी व मुली उच्च शिक्षणासाठी नागपूरला. मी एकटा गावाला,नोकरी, बागकाम कविता,वाचन छंद.पण माझ्या ऐकते पणाचा फायदा काही व्यसनी लोक माझ्याच घरी येवून आग्रह करू लागले. मी त्यांना स्पष्ट नाही म्हंटले, व त्यांची योग्य निर्देशित जागा पण सुचविली. खर तर त्यांनी काही वेळ मलाच ?? पण माझे अंतर्मन ठाम असल्याने जो आनंद मिळत आहे तो त्यांच्या सोबतीला कसा मिळणार. ( दुरावले तर दुरावले, ) त्यांची चूक च ना.