” एखाद्याला समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं “
हेमा यादव कदम I ७८७५५५०७८९
प्रत्येकाला असे वाटत असते कि मला सर्वानी समजून घ्यावे … पण समजून घ्यावे म्हणजे नक्की समोरच्या लोकांनी काय करणे अपेक्षित असते ? तर आपल्या मनाप्रमाणे आपल्याला वागू द्यावे जेव्हा आपल्याला कोणी आपल्या मनाप्रमाणे वागू देते तेव्हा आपण म्हणतो कि हीच व्यक्ती मला समजून घेते .. आणि मग बाकी लोक आपल्याला शत्रू वाटू लागतात.. मला माझी स्पेस पाहिजे, मला माझे स्वातंत्र पाहिजे, मला माझ्या मनाप्रमाणे वागू द्यावे, असे आपल्याला नेहमी वाटत असते ..
ठीक आहे यात काही गैर नाही पण आपल्या आजूबाजूला असणारे आपले हितचिंतक हे आपल्या आयुष्यात काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत या साठीच प्रयत्नशील असतात तरीही आपण त्यांच्या “भावना समजून न घेता त्यांनीच आपल्याला कसे समजून घ्यायला पाहिजे” याचा अट्टहास करत असतो ….
मानव प्राण्याला त्याच्या इवल्याशा आयुष्यात नक्की काय पाहिजे असते खर तर हे तो/ती स्वतःही नीट सांगू शकत नाही. कारण जेव्हा तो/ती सर्वांमधे असतात तेव्हा त्यांना एकटेपणा पाहिजे असतो, स्पेस पाहिजे असते. आणि जेव्हा तो/ती एकटेपणात असतात तेव्हा त्यांना कोणी तरी समजून घेणारी व्यक्ती आयुष्यात पाहिजे असते.
आपल्या मनाप्रमाणे लोक आपल्याला वागू देतात याचा अर्थ ते आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घेतात असे अजिबात नसते .. नकळत त्या व्यक्तीने आपल्याला आणि आपल्यातल्या कोणत्याही नात्याला वाऱ्यावर सोडून दिलेले असते कि जाऊदे त्याला / तिला जे करायचं आहे. करु दे कारण सांगून जर कोणी ऐकत नसेल तर शब्दांची वाफ करण्यात काही अर्थच नसतो हे इतके तर प्रत्येकाला नक्कीच समजते ..
आपल्या जवळचे लोक जेव्हा आपल्या वागण्यातील दोष आपल्याला सांगत असतील तर त्यावेळी माझ्यात काही दोषच नाही या आविर्भावात जर आपण स्वतःच्या अहंकारात राहत असू तर लक्षात घ्या कि, आपण स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत असतो .. कधीही आपल्या जवळची व्यक्ती (आई – वडील , भाऊ-बहीण, काही ठराविक मित्र – मैत्रिणी) जेव्हा आपल्याला सांगत असतात ना कि, आपल्या स्वभावात काही दोष आहेत. तेव्हा ते ऐकून घ्या त्यावर विचार करा आणि त्यात बदल करण्याचा प्रयत्न करा …

या जगात खूप कमी लोक असे आहेत जे स्वतःमधले दोष समजून घेऊन त्यावर काम करतात आणि भरपूर यशस्वी होतात त्या उलट कोणाचेही मार्गदर्शन न घेता मी एकटाच/एकटीच खूप समजदार आहे अशा आविर्भावात असणारे लोक स्वतःच्या हि नकळत अपयशाच्या दिशेने चालू लागतात.
मानवी स्वभाव प्रमाणे आपण कधी हि स्वतःला तटस्थ पणे पाहू शकत नाही. इतर लोक आपल्याला तसे पाहू शकतात आणि त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ लोक आपल्याला नेहमी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात आणि आपण त्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो पण यामुळे आपल्या अधःपतनाला आपणच कारणीभूत ठरतो .. लक्षात घ्या कि समजून घेणे म्हणजे फक्त कौतुकच करणे नाही समजून घेणे म्हणजे दोष सांगून समोरच्या व्यक्तीला सुधारण्यास संधी देणे.
आणि अजून एक महत्वाचे म्हणजे प्रत्येक व्यक्ती जेव्हा एका दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा त्या व्यक्तीला त्या थोड्याश्या सहवासात आपल्या बद्दल जे काही अनुभव आले ते ती व्यक्त करत असते / असतो त्यामुळे कधी कोणाला कमी लेखू नका त्याने / तिने जे काही तुमच्या बद्दल समजले आहे. ते सांगितल्या नंतर तुम्हाला जर ते मत योग्य वाटले नसेल तर त्याचा अवास्तव बाऊ करू नका विषय सोडून द्या.
पण जर तुम्हाला त्या व्यक्तीच्या बोलण्यात थोडेही तथ्य जाणवले तर त्यावर विचार जरूर करा त्यामुळे आपले स्वतःचे व्यक्तिमत्व सुधारण्यास आपल्याला कळत न कळत मदत होत असते.
सर्वगुणसंपन्न असे या जगात कोणी नाही पण त्यातल्या त्यात आपण विचारांनी जितके संपन्न व्हायला पाहिजे तितके होणे आवश्यक आहे. कारण विचारच माणसाला घडवतात किंवा बिघडवतात …. म्हणून कोणी कौतुक करत आहे म्हणून अविचाराने कोणतेही निर्णय कधी हि घेऊ नका. खोलवर जाऊन प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा …
मानवी स्वभावाप्रमाणे स्वतःच कौतुक करणारे लोक सर्वानाच आवडतात पण आपले दोष सांगणाऱ्या लोकांनाही आपल्याला समजून घेता यायला पाहिजे. आपण स्वतःला नीट समजून घेतले कि, लोक आपल्याला समजून घेऊ लागतात .. जो पर्यंत आपण स्वतःला “स्वतःच्या आणि लोकांच्या” नजरेतून पूर्णपणे समजून घेणार नाही तो पर्यंत आपण स्वतःमध्ये चांगले बदल करू शकणार नाही आणि त्यामुळे आपण नेहमी यशाच्या शर्यतीत मागेच राहणार…
धन्यवाद.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


मनाला पटले लेखातील विचार. एरवी आपण इतरांचे आरसे होतो.इतर आपल्याला केवळ बाहेरील नाही तर एक्सरे सारखे आरपार दिसतात असे आपण समजतो. वास्तविक तसे नसते.
छान लेख आहे. आवडला. 🙏🏼👌