स्वतःला खुश कसे ठेवायचे? काही सोप्या टीप्स वाचा!!
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
सुख सुख म्हणजे काय असतं?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असत….
साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं,
हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं,
डब्यातला गुळाचा खडा हळूच जीभेवर ठेवणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..
पाडगावकरांची ही कविता आपल्याला सुख म्हणजे नेमकं काय, ती कशात असतं हे नेमकेपणाने सांगते. दैनंदिन जीवनात वावरत असताना आपण बरीचशी काम फक्त करायची म्हणून, कर्तव्य म्हणून करत असतो. पण यात किती सुख आहे, आनंद आहे, यातून आपण खुश होऊ शकतो हे आपल्या लक्षात येत नाही.
आपल्या सुखाच्या, आनंदाच्या व्याख्या म्हणजे आपल्याला हवं ते सर्व असलच पाहिजे म्हणजेच आपण खुश होऊ शकतो. मोठा बंगला, गाडी, खूप पैसे यातून आनंद मिळतो, खुशी मिळते अस अनेकांना वाटतं. त्यातून आहे त्या गोष्टीतला आनंद लोक गमावून बसतात. पण असं नाही. कारण अगदी गरिबीतला माणूस पण खुश असू शकतो आणि गडगंज श्रीमंत माणूस पण नाखूष असू शकतो.
कारण दृष्टी तशी असते. म्हणूनच नेमकं सुख कशात आहे, आपण कोण कोणत्या गोष्टींतून खुश होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे. कारण दरवेळी पैसा ,श्रीमंती खुशी देत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आनंद देऊ शकतात. त्यातून आपण स्वतः ला खुश ठेऊ शकतो. त्या कोणत्या आणि त्यातून आपण स्वतःला कसं खूश ठेवू शकतो ते पाहू.
१. जे आहे त्याच्याकडे पहा, त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा: बर्याच जणांचे आहे त्याकडे दुर्लक्ष करून जे नाही ते पाहायची सवय असते. त्यातून फक्त असमाधान मिळते. म्हणूनच स्वतःला खुश ठेवायचं असेल तर आपल्याकडे जे आहे त्याकडे लक्ष द्या त्याबद्दल समाधानी राहा. चेहऱ्यावर आनंद आल्यावाचून राहणार नाही.
२. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद वेचायला शिका: खुश होण्यासाठी फार मोठी काहीतरी कामगिरी केली पाहिजे असं नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळू शकतो. त्यासाठी दिवसभरात तुम्ही काय काय चांगलं केलं ते आठवा. एखाद्याला रस्ता क्रॉस करायला मदत केली असेल, एखाद्या लहान मुलाला जवळ घेतलं असेल त्याचे लाड केले असतील, तुम्ही लावलेला झाडाला छान कळी किंवा फूल आल असेल ह्या गोष्टींना जर तुम्ही महत्त्व दिल तर छोट्या वाटणाऱ्या या गोष्टी तुम्हाला मोठा आनंद देतात.
३. स्वतःलाच शाबासकी द्या/ कौतुक करा: आपण एखादं काम करायला घेतल्यावर किंवा पूर्ण झाल्यावर इतरांनी आपलं कौतुक केलं पाहिजे, शाबासकी दिली पाहिजे असं आपल्याला वाटतं. यात काही चुकीचं नाही. पण दरवेळी असं होईलच असं नाही.
म्हणून आपल्याला स्वतःच्या कामाबद्दल स्वतःलाच शाबासकी देता आली पाहिजे. ते काम पूर्ण झालं की नाही याहून आपण शंभर टक्के कामापैकी आज मी त्याचे दहा टक्के केलं याबद्दल नक्की स्वतःला शाबासकी द्या, स्वतःचं कौतुक करा. यातून तुमचं काम करण्याची प्रेरणा वाढते, तुम्ही अजून प्रयत्न करता आणि खुश देखील राहता.
४. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा: आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या युगात आपल्याला लांब असलेल्या, कधी कधी प्रत्यक्ष ओळख नसलेल्या लोकांसोबत बोलायला वेळ असतो. पण आपल्या जवळच्या लोकांसोबत बोलायला वेळ नसतो.
म्हणून आनंदी राहायचं असेल तर आपल्या घरातील लोक, आपले मित्र-मैत्रिणी यांच्या सोबत वेळ घालवा. त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जा. निसर्गाच्या सानिध्यात मन खूप छान होत. घरातल्या सोबत दिवसभर काय काय गमती जमती झाल्या ते बोला. एखादा जोक सांगा. या सर्व गोष्टी आपल्याला आनंदी ठेवतात.
५. इतरांना मदत करा: दुसऱ्याला मदत करण्यात एक वेगळाच आनंद असतो. आपण इतरांच्या कामी आलो भावनाच वेगळी असते. म्हणून मदत छोटी असो वा मोठी ती करा. तुमच्या मदत करण्यातून त्यांच्या चेहऱ्यावर येणार हसू, ती कृतज्ञता तुम्हाला खुश करते.
६. व्यायाम करा: व्यायामाने तुम्ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीने सुदृढ होता. व्यायामाने आपला ताण कमी होण्यास मदत होते व अनेक हार्मोन्स जसे की endorphine, serotonine, dopamine रिलीज होतात. यातून आपला स्ट्रेस कमी होऊन आपण फ्रेश तजेलदार होतो.
मग या व्यायामात तुम्ही फिरायला जाणं, धावणं, तसेच घराची स्वच्छता कारण हे करू शकता. हा ही एक प्रकारचा व्यायाम आहे. आपण जेव्हा मन लावून साफ सफाई करतो तेव्हा आपण त्या प्रसंगात जास्त असतो. आपण mindful असतो. ही स्वच्छता केल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि आपल्याला मेंटल सॅटिसफॅक्शन मिळत.
७. छंद जोपासा, नवीन काहीतरी शिका: माणसाने नेहमी काही ना काही शिकत राहिल पाहिजे. वेगवेगळे छंद जोपासले पाहिजेत. जसं की चित्रकला असेल, वाचन असेल, गायन असेल अश्या अनेक गोष्टी आहेत. यातून आपलं ज्ञान देखील वाढत आपण नवीन काहीतरी करतो देखील. जेव्हा आपण नवीन काहीतरी करून पाहतो आपल्याला काहीतरी achieve केल्यासारख वाटत आणि आपण खुश होतो. मग ते एखादा नवीन पदार्थ करून पाहणं असेल, एखादं क्राफ्ट बनवणं असेल. म्हणून शिकत राहा.
८. वय वाढलं तरी मनाला लहान मुलाप्रमाणे खेळकर उत्साही ठेवा: आपलं वय हे वाढणारच आहे. ते थांबू शकत नाही. पण मनाला जर तुम्ही लहान मुलासारखं ठेवलात तर तुम्हाला खुश होण्यासाठी फार मोठ्या गोष्टींची गरज भासणार नाही. लहान मुलं रुसली जरी तरी तो रुसवा फार काळ टिकत नाही. नवीन काहीतरी मिळालं, काहीतरी केलं तर ती लगेच खुश होतात. तस आपणही कोणती गोष्ट फार काळ मनात न ठेवता त्यातून बाहेर पडून खुश राहील पाहिजे, उत्साही राहील पाहिजे.
या सर्व नेहमीच्या जीवनात असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला खुश ठेवायला मदत करतात आणि आनंद मिळवून देतात फक्त तो आपल्याला घेता आला पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Mast
छान टीप आहेत
खुप छान