स्वतःला कमनशिबी समजू नका, ठरवलं तर आपल्यासाठी काहीही अशक्य नाही.
सोनाली जे
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला !
जवळ असुनही कसा दुरावा ?
भाव मनीचा कुणा कळावा ?
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
हार कुणाची ? जीत कुणाची ?
झुंज चालली दोन मनांची
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
दैव , नशीब यावरच कायम आपण भरोसा ठेवून जात असतों . आणि प्रयत्न करणे सोडून देतो. अनेक वेळा प्रयत्न करून ही एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही. एखाद्या गोष्टीत यश मिळत नाही. नात्यात काही तरी बिनसले असते. मन कलुशित झाली असतात. कधी गैरसमज ,अविश्वास, अपेक्षा यातून आहे ती सुंदर नाती बिघडतात. आणि आपण खूप प्रयत्न करुन ही ती मिळवू शकत नाही.
अशावेळी आपल्या मनात नेहमी हे विचार येत असतात की आपलेच कमनशीब . आपल्याच बाबतीत असे घडते. अर्थात कुठे ना कुठे ज्योतिष शास्त्र , astrology ही फार पूर्वी पासून अस्तित्वात आहेत. लोकांचा त्याच्यावर विश्वास ही आहे. यातून ज्योतिषी म्हणा ,पत्रिका असेल ,ग्रहमान बघून आपले भविष्य सांगत असतात, वर्तमानात मदत करत असतात. आपल्या अडचणी काय आहेत ते समजून घेवून उपाय योजना ही सांगत असतात.
पण नुसते त्यावर कधीच अवलंबून राहू नका. अशावेळी आहे हा नोकरी , व्यवसाय चालू राहू देत. आणि त्या व्यतिरिक्त काही उपाय सांगितले जातात. मुख्य म्हणजे ती समोरची व्यक्ती आपल्याला तिच्या बोलण्यातून , समजावून घेणे , सल्ला देणे यातून मानसिक आधार देत असते. सकारात्मक बोलणे आपल्याला आवडत असते. या या दिवशी नंतर ग्रह तारे बदलतील , चांगले दिवस येतील . यातून आपण नकारात्मक विचार काढून टाकून खूप सकारात्मक होतो. आणि पुढे जात असतो.
स्वतःला कमनशिबी समजू नका, ठरवलं तर आपल्यासाठी काहीही अशक्य नाही.हे लक्षात घेवून नक्की काय करायचे आहे हे ठरवा. तुमचे ध्येय पक्के असेल मग कोणत्याही बाबतीत शिक्षण असेल , नोकरी, व्यवसाय , नाती असतील त्या बाबतीत एक ध्येय ठरवा. ते पूर्ण करण्याकरिता नशिबावर नुसते अवलंबून राहू नका. तर अथक परिश्रम ही करावे लागतात. ” दे हरी पलंगावरी ” असे कोणी देत नसते. असे मिळत नसते.
एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यांना मेहनत ही घ्यावीच लागते. ..स्वतः च्या हिंमतीवर उभे रहावेच लागते. ..जबाबदारीने उभे राहावे लागतेच.
एकदा हरलो , अपयशी झालो , नात्यात ही समजून घेण्यास आणि सांगण्यास कमी पडलो तरी परत परत प्रयत्न करावे लागतात. ज्या क्षणी असे वाटते की नाही आता सगळे संपले .आता आपल्या प्रयत्नांची सीमाकाष्ठा संपली . तोच क्षण असतो की आपण नेटाने प्रयत्न करण्याचा , सातत्य ठेवण्याचा. हरून , खचून जावून हात वर करून रिकामे न होता ..
आता ही वेळ जावू द्यायची नाही ..हीच ती योग्य वेळ आहे ..आता थोडेसे च प्रयत्न केले की यश निश्चित आहे. कारण सोपे प्रश्न सोडवून झाले की अवघड अवघड प्रश्न येतातच . आपल्याला वाटते संपले आता आपल्याला काही येत नाही . आपण तिथे थांबण्याचा प्रयत्न करतो. आणि तो एखादा अवघड प्रश्न सोडविला की परत सोपे प्रश्न येत असतात. त्यामुळें कुठेही खचून जावू नका.आणि परिस्थिती पुढे हार मानू नका.
नशिबात नाही म्हणून गप्प बसू नका.
मेरे नसीब मे तू हैं की नहीं तेरे नसीब मे मैं हू की नहीं ..सलीम जावेद यांच्या गाण्यातून हे प्रश्न पडतात तसे आयुष्यात प्रत्येकाला पडतात. व्यक्तीचं नाही तर परिस्थिती बाबत ही. अशावेळी एक मूलमंत्र लक्षात ठेवा. ” Everything great happens outside your comfort zone” . आणि खरेच आपला comfort zone सोडून बाहेर पडा आणि मग प्रयत्न करून बघा .यश हे नक्कीच आपले असते.
एक बाप मुलाला म्हणाला, ” आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ. ” मुलगा भिंतीवर चढला. बाप म्हणाला, ” आता खाली उडी मार. मी आज तुला मोठा धडा शिकवत आहे.” मुलगा घाबरला. दहा फूट खाली उडी मारायची हिंमत होत नव्हती. बाप म्हणाला, ” मार उडी. काळजी करू नकोस, मी तुला झेलून घेईन.”
मुलाने डोळे बंद केले आणि उडी मारली. बाप बाजूला निघून गेला. मुलगा धाडकन खाली आदळला. जोरात आपटला. बापाने मुलाला सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवून उडी मारायची चूक केलीस. म्हणून पडलास. डोळे उघडे ठेवून, तुझ्या बळावर उडी मारली असती तर काही झालं नसतं. आज मी तुला मोठा धडा शिकवला. जे काही करायचं ते स्वतःच्या बळावर कर.
पुढच्या वेळी मुलाने लक्षात ठेवून अतिशय विश्वासाने , कुठून कशी उडी मारली तर आणि मारल्यावर balance जात असताना अलर्ट राहून तेव्हा strongly उभे राहायचे अशी मनाची तयारी करून आपली जबाबदारी आहे . यात कोणी ही मदत करणार नाही हे गृहीत धरून , विचारपूर्वक , आत्मविश्वासाने, डोळे उघडे ठेवून , इकडे तिकडे काही नाही ना , दगड नाहीत ना याची खात्री करून उडी मारली आणि तो यशस्वी झाला.
Low aim is just a crime…
आपल्या क्षमता , शिक्षण , knowledge, skill यावर विश्वास ठेवा . आणि तसे प्रयत्न करत रहा. अनेकदा आपल्या क्षमता जास्त असतात. पण आपण रिस्क नको म्हणून आपल्या क्षमतेपेक्षा कमी goal, aim ठेवतो आणि आपल्या नशिबाला दोष देत बसतो.
उदाहरण. : आज मी व्यवसायात यशस्वी होईन का नाही , किंवा त्यात एवढी च गुंतवणूक करू ..नको रिस्क घ्यायला. असे म्हणून थोडे हातचे राखून प्रयत्न करतो . कारण आपला विश्वास नसतो. आपण परिस्थिती काय येईल याची भीती बाळगून असतो. आपल्याला ते जमणार नाही ..आपली कुवत नाही असे. म्हणून गप्प बसतो. किंवा मग असे होते की आपल्याला तेवढ्याच कामाची , प्रयत्नांची सवय झालेली असते .comfort zone तो सोडून बाकी काही करण्याची तयारी नसते.
Behind every great fortune there is a gamble.- Godfather
मोठे मोठे उद्योगपती एकाच गोष्टीवर अवलंबून नसतात. एक बिझनेस success झाला म्हणजे कायम त्यात प्रॉफिट होईल असे नाही हे लक्षात घेवून एका सोबत छोटे मोठे अनेक बिझनेस सुरू ठेवतात. त्यातून कोणत्या ना कोणत्या बिझनेस मधून फायदा होत असतो. आणि सुरुवात अगदी एक रुपया प्रॉफिट सुधा खूप प्रॉफिट असे गृहीत धरून हळूहळू बिझनेस expand करतात. सुरुवातीलाच मोठे घबाड मिळेल असे प्रयत्न नसतात.
निसर्गनियम कधी डावलत नाहीत. आज जमीन कसली , खड्डा खणला , त्यात उद्या उत्कृष्ट जातीचे बीज पेरतील . उत्कृष्ट प्रतीची माती त्यावर घालतील . रोज थोडे थोडे पाणी घालत असतात. आधी कोंब फुटतो. मग पालवी. मग ते झाड एक पान , दोन पाने असे करून वाढू लागते. योग्य त्या प्रकरचे खत, औषध पेरणी वेळीच करावी लागते. आणि मग मोहोर असेल फुले ती गळून गेली की तिथे फळ निर्मिती होत असते. ते प्रत्येक फळ मोठे होईपर्यंत .योग्य तेवढे पक्व होईपर्यंत ठेवावे लागते. वाट बघावी लागते. आणि मग तोडणी करून ते खूप ही पक्व होवून खराब होण्याआधी बाजारात विक्रीस न्यावे लागते. कधी कधी काही रिस्क घ्याव्या लागतात. अचानक परिस्थिती बिघडू शकते.
कोणताही बिझनेस नव्याने सुरू करताना जरी मार्केट सर्वे केला असेल.प्रॉडक्ट बेस्ट असेल तरी अचानक येणारी ही corona sarkhi paristhiti अनेकदा गणितं चुकवते. आणि मग आपलच नशीब असे म्हणून नशिबाला दोष देतो. तेव्हा लक्षात ठेवा ” डर के आगे जीत है ” .
आज निर्माण झालेली परिस्थिती ही तात्पुरती आहे. कायम स्वरुपी नाही. आज ना उद्या बदलणार च आहे. तसेच आहे नाती जरी बिघडली तरी ती मनाची तात्पुरती अवस्था आहे. आज ना उद्या सगळे शांत झाले की ती मनस्थिती बदलणार च आहे. परिस्थिती बदलणार च आहे. यावर विश्वास ठेवून प्रयत्न करा.
थॉमस एडिसन यांचे उदाहरण कायम लक्षात ठेवा. एकदा ते शाळेतून घरी आल्यावर शिक्षकांनी दिलेली चिठ्ठी आईला वाचाण्या करिता दिली. ती वाचून आईच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा एडिसन यांनी विचारले काय झाले आई ? तेव्हा एडिसन यांची आई म्हणाली की काही नाही बाळा तुझ्या शिक्षकांनी सांगितले की तू खूप genius आहेस आणि तुझ्या बुध्दी प्रमाणे , कुवती प्रमाणे आम्ही शिकवू शकत नाही. आमच्या कडे एव्हढे चांगले शिक्षक नाहीत. पण तू काळजी करू नकोस मी रोज तुला शिकवत जाते.
आणि एक काळ असा आला की अमेरिकेतले सुप्रसिद्ध संशोधक एडिसन १०९३ पेटंट त्यांच्या नावावर आहेत. काही कालांतराने त्यांच्या आई चा स्वर्गवास झाला. आणि नंतर कधी तरी घरात आवराआवरी , साफ सफाई काढली तेव्हा त्यांना आईच्या कपाटात एक चिठ्ठी सापडली . त्यांनी ती उघडली .. ती तीच चिठ्ठी होती जी शिक्षकांनी आई करिता दिली होती. ती उघडुन त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि त्यात लिहिले होते की मानसिक दृष्ट्या तुमचा मुलगा कमकुवत आहे त्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही.
तेव्हा एडिसन यांना त्यांच्या आईचा गर्व आणि कौतुक वाटले. की आज जे काही inventions त्यांनी केली होती ती केवळ आई मुळे आपण करू शकलो . कारण तेव्हा आईने जर प्रयत्न सोडले असते. आणि आपले नशीबच असे. कमनशिबी आहे आपला मुलगा. आता जे आहे ते स्वीकारले पाहिजे असे म्हणून प्रयत्न सोडले असते. तर आज एडिसन एव्हढे मोठे शास्त्रज्ञ झालेच नसते.
केवळ त्यांची आई सकारात्मक राहिली. प्रयत्न करत राहिली. योग्य शिक्षण पद्धती अवलंबिली त्यामुळे शिक्षक आणि नशिबाने जरी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तरी ही केवळ आईची जिद्द , सातत्य , positivity , प्रयत्न आणि आपल्या मुलाच्या अंतर्मन आणि मेंदूवर तू हुशार आहेस हेच बिंबविले. कुठेही नकारात्मक विचार मनात येवू ही दिले नाहीत.
दुसरी गोष्ट एडिसन यांच्याकडे प्रचंड कुतूहल असायचे आणि त्यातून तो अनेक प्रश्न विचारत असे. प्रयोग करत असे. लोक त्याला वेड्यात काढत . पण लोक काय म्हणतात याचा त्यानें कधीच विचार केला नाही.
यामुळे आपल्या संपूर्ण जगाला एडिसन यांसारखे महान व्यक्तिमत्त्व लाभले. त्यांचेही प्रयोग पहिल्या खेपेस च यशस्वी झाले नाहीत. अनेक वेळा त्यांना प्रयोगात अपयश ही आले त्यांनी प्रत्येक वेळेस हार न मानता ते कायम प्रयत्न करत राहिले आणि त्यातूनच यशस्वी झाले.
त्यांची घरात असलेली प्रयोगशाळा आईने बंद करायला लावली. नंतर तो ट्रेन मध्ये वर्तमानपत्र विक्री करत असे. आणि ट्रेन मध्येच त्याने एक lab ही उभी केली होती. एकदा त्यातली काही रसायने सांडली आणि त्या डब्याला आग लागली. तेव्हा रेल्वे मास्टर ने त्याचे सगळे सामान डब्या बाहेर काढले .आणि त्याच्या कानाखाली जोरात वाजविली. त्यामुळे त्याच्या एका कानाला ऐकू येणे बंद झाले. आणि तरी ही त्याने प्रयोग थांबविले नाहीत त्यातून gramophone च शोध एडिसन यांनी लावला.
वयाच्या ६७ व्या वर्षी एडिसन यांच्या दहा building जळून खाक होत असताना त्यांनी त्यांच्या २४ वर्षाच्या मुलाला सांगितले तुझ्या आईला पण बोलावं अशी आग बघायला मिळणार नाही. मुलगा चिडला त्याला समजेना आपले करोडो रुपयांचे नुकसान होत असताना, एडिसन यांचे सर्व शोध , टेप , रेकॉर्डस यात जळून खाक होत असताना ही हे काय सुचते असा विचार करत असताना ते एडिसन म्हणाला अरे त्यात काय यात आपल्या सर्व चुका जळून खाक झाल्या.
त्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांकडून कर्ज काढून परत नवीन कंपनी काढून चार वर्षात कैक पटीने कंपनी चा फायदा करून दिला.
कुठेही हार न मानणे. नशिबाला दोष देत बसले नाहीत. तर जिद्दीने पुढे प्रयत्न करत गेले.
एकदा माणसाने निश्चय केला की, डोंगराएवढ्या मोठ्या गोष्टींचीही त्याला भीती वाटत नाही. अनेक अवघड गोष्टी त्याला कस्पटासमान वाटायला लागतात. कठोर मेहनत, परीश्रम, सातत्य, चिकाटी, जिद्द, अभ्यासाची आवड, ध्यास, प्रचंड इच्छाशक्ती यांमुळे एखादा माणूस हिमालयाएवढा उंच होतो. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी केलेला जीवन संघर्ष पाहून अगदी थक्क व्हायला होते.
कधी ही हरून जावून , परिस्थिती पुढे माघार घेवून , हात टेकवून मागे पडू नका. थांबू नका. स्वतःला कमनशिबी समजू नका, ठरवलं तर आपल्यासाठी काहीही अशक्य नाही. म्हणून आधी ठरवा. आणि तसे प्रयत्न करा.
आयुष्य सुंदर आहे. नशिबाची साथ कायम आहे असे सकारात्मक विचार करून नशिबाला प्रयत्नांची जोड द्या.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


