“स्वतःला ओळखायचं असेल तर मनाविरुद्ध वागून पहा!”
मधुश्री देशपांडे गानू
आयुष्याच्या या प्रवासात कधी प्रवाहाविरुद्ध पोहावे लागतं. जास्त जोराने हात-पाय मारावे लागतात. कारण टिकून राहायचं असतं. यशस्वी व्हायचं असतं. आपलं इच्छित स्थळ गाठायचं असतं. जसं वाघ शिकार करण्याआधी काही पावले मागे जातो आणि मग लक्ष केंद्रित करत मोठी झेप घेतो, तसंच काहीसं!
माणसाचं मन एक खोल खोल डोह आहे. माहित नाही तळाशी काय काय साचलं आहे. कोणतीतरी क्षुल्लक गोष्ट कायमस्वरूपी रुतून बसलेली असते. आणि तसेच प्रसंग परत घडले तर त्या भावनेला परत वर यायची संधी मिळते. बऱ्याचदा या भावना नकोशा, नकारात्मकच असतात. त्यामुळे सतत तक्रार करणे, चिडचिड, किरकिर करणे असे होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या लहान मुलाला शाळेत जर काही मुलं त्रास देत असतील, जे अगदी सर्वसामान्य आहे. पण भावनिक, मानसिक दृष्ट्या कमजोर मुलाच्या ते कायम मनात राहतं.
त्याची स्वतःबद्दलची कमीपणाची भावना वाढीस लागते. “मी असाच आहे. सगळे मलाच त्रास देतात, नेहमी माझ्या बाबतीत असं का घडतं?” ही त्याच्या विचारांची बैठक होऊन जाते. आणि मोठेपणीही त्याचा हा समज कायम राहतो. “सगळे असेच वागतात माझ्याशी” ही त्याच्या विचारांची पद्धत, नमुना बनत जाते.
प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं असं शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, ऊर्जेचं जग असतं. त्यात त्याची प्रेमाची माणसं, नोकरी-व्यवसायानिमित्त संबंध येणारी माणसं, रोज भेटणारी पण फार महत्त्वाची नसणारी माणसं असतात. या सगळ्यांबरोबर त्याच्या कुवतीप्रमाणे, नात्याप्रमाणे, भावनिक गुंतवणुकी प्रमाणे त्याचे संबंध असतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा “Comfort Zone” असतो. त्याच्यात बदल झालेला कोणालाच आवडत नाही. या Zone मध्ये फक्त त्याच्या आवडीची माणसं येऊ शकतात. ही सुखावह चौकट त्याला हवीहवीशी असते. ती जराशीही इकडे तिकडे होऊ नये यासाठी तो प्रयत्नशील असतो.
आता “स्वतःला ओळखायचं असेल तर मनाविरुद्ध वागून पहा” म्हणजे नेमकं काय करायचं? तर या वाक्याचा सकारात्मक अर्थ असा आहे की स्वतःमध्ये सातत्याने प्रगती कशी घडवून आणता येईल, हे पाहणे. माणसाच्या स्वभावानुसार, परिस्थितीनुसार, अनुभवांनुसार त्याच्या जगण्याचा एक “पॅटर्न” असतो. नेहमीच्या सवयी असतात. काही चांगल्या काही वाईट. अर्थात चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो.
वाईट सवयी लगेच लागतात. म्हणजे गंमत म्हणून मित्रांबरोबर प्रथम घेतलेली थोडीशी दारू कधी व्यसन होते कळतही नाही. रोज नेमाने रामरक्षा म्हणायची सवय लावायची म्हटलं की मात्र जमत नाही. दारू, सिगारेट किंवा अन्य काही व्यसनं ही तर दृश्य झाली. पण नको असलेल्या सवयीही एक प्रकारचे व्यसनच असतात. सातत्याने नकारात्मक विचार, चिडचिड, तक्रारी करणे हेही एक प्रकारचे व्यसनच आहे. नीट विचार करून पहा, तुम्हांला नक्की अशा काही सवयी स्वतःमध्ये सापडतील.
अगदी छोट्या छोट्या पण चूकच. आपण त्याकडे पद्धतशीरपणे कानाडोळा करतो. कधी या सवयींचं समर्थनही करतो. काही माणसं सतत तक्रारी सांगत असतात. त्यांना कोणा मध्येच, कशामध्येच काहीही चांगलं दिसत नाही. हे व्यसनच आहे. नीट पाहिलं तर ही माणसं कायम शारीरिक दृष्ट्या सतत आजारी असतात. कारण मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
समजा एका मुलीचं एका मुलावर खूप प्रेम आहे. त्यांचे संबंध ही सुंदर निरोगी होते. पण एका विशिष्ट काळानंतर त्या मुलाची भावनिक गुंतवणूक कमी झाली. असं होऊ शकतं. जबरदस्तीने प्रेम मिळवता येत नाही. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करत आपण शांतपणे नात्यातून बाहेर पडलं पाहिजे. पण हे इतकं सोपं नाही. मग त्या मुलीला अत्यंत दुःखी, एकाकी, निराश वाटू लागतं. त्याच्या आठवणीतून, विचारातून ती बाहेर येऊ शकत नाही. अशावेळी आत्महत्येसारखे विचारही येतात.
हा तिच्या विचारांचा “पॅटर्न” होतो. तिच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. समोरच्या व्यक्तीवर आपले नियंत्रण नाही या गोष्टीसाठी आपण आपली ऊर्जा खर्च करतोय, हे तिला समजत नाही. पण जर तिला यातून बाहेर यायचं असेल तर प्रथम इच्छाशक्ती हवी. स्वतःची सकारात्मक ताकद ओळखायची असेल तर तिला स्वतःच्या मनाविरुद्ध वागावं लागेल. तिला हा पॅटर्न मोडावा लागेल. स्वतःच्या मनातील भीतीला सामोरे जावे लागेल. तरच त्यातून बाहेर पडून ती नवीन सुरुवात करू शकते.
एखाद्य प्रेमाच्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू खोलवर परिणाम करतो. जगावसं वाटत नाही. पुढे काय? असा प्रश्न चिन्ह असतं. पण हेच नकारात्मक विचार, त्या व्यक्तीच्या आठवणी नेटाने बाजूला सारून पुन्हा उभे राहावे लागते, सर्व ताकदीनिशी. “मनाविरुद्ध वागूनच स्वतःतला कस ओळखता येतो.” माणूस म्हणून आपण पुन्हा पूर्ण सामर्थ्याने उभे राहू शकतो, हा आत्मविश्वास येतो.
अनेकांना फोबिया असतो. एखाद्या गोष्टीची, वस्तूची, जागेची, माणसांची एकदा भीती वाटते. पण हीच भीती सतत वाटत राहिली तर ती सवय होते आणि यालाच “फोबिया” म्हणतात. मग कायम असंच राहायचं का? नाही. तर स्वतःला ओळखण्यासाठी त्या भीतीला सामोरे जायचं. “स्वतःच्या मनातील भीतीच्या विरुद्ध वागायचं.” कित्येकांना रस्ता क्रॉस करायची भीती वाटते. मग काय कायम घरात बसून राहणार का?? नाही ना! तर धैर्य करून मुद्दाम रस्ता क्रॉस करायची सवय करायची. आता एका क्षणात, एका दिवसात हे बदल होणार नाहीत. ही एक प्रक्रिया आहे. छोटे छोटे बदल स्वतःमध्ये करत या भीतीला सामोरे जायचे. आणि स्वतःचे सामर्थ्य ओळखायचे.
आता यासाठी काय काय करता येईल ते पाहू. सर्वात प्रथम स्वतःला नीट ओळखा. तुमच्या चांगल्या वाईट सवयी नीट लक्षात घ्या. “तुमच्यामध्ये फक्त तुम्हीच बदल घडवू शकता आणि ही फक्त तुमची जबाबदारी आहे” हे तुम्ही प्रथम समजून घेतलं पाहिजे. यामध्ये तुमच्या भावानिक गुंतवणुकीकडेही नीट लक्ष द्या. कोण कोणते सकारात्मक बदल करता येतील, ते पहा. प्रत्येक गोष्टीकडे, प्रसंगाकडे, व्यक्तीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. याने तुम्हांला वेगळे पैलू सापडतील.
वेगळे आणि सकारात्मक मार्ग मिळतील. जाणीवपूर्वक स्वतःमध्ये सक्षम बदल करा. “सगळी ऊर्जा, शक्ती तुमच्यामध्येच सामावलेली आहे” त्याचा योग्य विनियोग करा. तुमच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींबद्दल विचार करून तुमची ऊर्जा वाया घालवू नका. “मी काय करू शकतो/ शकते” यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला दोष देणं थांबवा. भावना, आठवणी येणारच. त्या नियंत्रित न करता त्यांचं सुनियोजन कसं करता येईल हे पहा.
प्रयत्नपूर्वक स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करा. रोजनिशी लिहायची सवय करा. स्वतःबद्दल सकारात्मक पाच विधाने रोज नेमाने लिहा. एक चांगला घडलेला बदल लिहून काढा. स्वतःला शाबासकी द्या. तुम्ही पूर्ण करू शकाल असे एखादे ध्येय लिहून काढा. स्वतःवर भरभरून प्रेम करा. स्वतःचे सगळ्यात चांगले मित्र व्हा. स्वसंवाद करा. बघा तुमचा आत्मविश्वास वाढतो की नाही!..
अशा अनेक लहानसहान गोष्टींनी तुम्ही स्वतःच्या मनाची नकारात्मक चौकट मोडू शकता. “तुमच्या सवयीच्या असलेल्या मनाविरुद्ध वागून तर पहा!” मग तुम्हांला स्वतःची नव्याने ओळख होईल. आणि हीच ओळख तुम्हांला यशस्वीतेच्या वाटेवर घेऊन जाईल. मग नाती असोत की सामाजिक, आर्थिक पातळीवरचे यश. आत्मविश्वासाने तुम्ही आयुष्याला सामोरे जाल आणि स्वतःच्याच प्रेमात नव्याने पडाल…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


