Skip to content

स्वतःला आपल्या ध्येयाची वारंवार आठवण करून देण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. पाहुयात.

स्वतःला आपल्या ध्येयाची वारंवार आठवण करून देण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. पाहुयात.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपले पाय चुकीच्या वळणावर पडत असतील आणि मन भरकटत असेल तर त्याला योग्य जागी आणायचं काम जर कोण करत असतील तर ती असतात आपली ध्येय. ध्येय म्हणजे आपलं अस स्वप्न, आपली अशी इच्छा जी पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी झटत असतो आणि हीच ध्येय आपल्याला एक योग्य मार्ग मिळवून देत असतात.

कारण ध्येयहीन आयुष्य म्हणजे अर्थहीन आयुष्य. आपण जन्माला आलो नुसते दिवस ढकलले आणि गेलो याला आयुष्य म्हणत नाहीत. तर या आयुष्यात आपण काय मिळवलं, काय साध्य केलं यावर आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होत असतो. म्हणून ध्येय ही असली पाहिजेत. नाहीतर आपल्यात आणि प्राण्यांमध्ये काय फरक राहिला? अशी ही आपल्या आयुष्याला अर्थ देणारी, आपल्याला शिस्त देणारी ध्येय आपण ठरवतो देखील. शाळेत असताना मला डॉक्टर व्हायचं, मोठा अॅक्टर व्ह्यायच, वकील, आर्टिस्ट अशी अनेक मोठी ध्येय आपण उराशी बाळगून असतो. तर वर्गात माझा पहिला नंबर यावा, रोज व्यायाम करून मी वजन कमी करावं, अश्या प्रकारची ध्येय पण असतात.

आता इथे खरी गंमत आहे. म्हणजेच काय तर ध्येय नुसती ठरवून चालत नाही त्यासाठी काही कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्याची सुरुवातच ध्येय कश्या पद्धतीचं असल पाहिजे इथून होते. तर ध्येय हे smart म्हणजेच speciefic, measurable, achievable, realistic आणि time bounded पाहिजे. बरेच जण आपली क्षमता, आजूबाजूची परिस्थिती, वस्तिवकता हे सर्व न पाहता काहीतरी अवास्तव ध्येय बाळगून त्याच्या मागे पळतात आणि निराश होतात.

अस न करता छोटी छोटी पण स्मार्ट ध्येय ठेवली पाहिजेत. आता अनेकदा आपण ध्येय तर ठरवतो पण ती पूर्ण करताना अश्या गोष्टी होतात की आपण वेगळ्याच मार्गाने जातो. काही काळापुरता आपण आपल्या ध्येयाला विसरतो. याला अनेक कारण असतात, जस की संगत, आपलं वय, आजुबाजूच वातावरण तसच अगदी महत्त्वाचं म्हणजे आपला आपल्या ध्येयाकडे पाहण्याचा दृष्टकोईन. ते मिळवणं आपल्याला किती महत्त्वाचं आहे यावर आपले प्रयत्न अवलंबून असतात. या गोष्टींमध्ये काही मागे पुढे झालं की आपण आपल्या ध्येयापासून बाजूला होतो. मित्रांनी पार्टीला बोलवलं गेलो, कंटाळा आला सुट्टी काढली, मूड नव्हता म्हणून काही केलच नाही अशी कारण मग पुढे येतात. यातून आपण जे काही ठरवलेले असत ते पुढे सरकत जात आणि नुकसान आपलंच होत.

म्हणूनच स्वतःला ध्येयापासून लांब करायचं नसेल स्वतःच्या ध्येयाची सारखी आठवण करून द्यायची असेल तर काही पद्धती वापरणं आवश्यक आहे. त्या कोणत्या ते पाहू.

अर्जुन आणि पक्षाच्या डोळ्याची गोष्ट आपल्याला सर्वानाच माहीत असेल. नेम हा पक्ष्याच्या डोळ्यावर मारायचा होता. पण बाकीच्यांना मात्र तो पक्षी त्याच्या त्याच झाड, आजूबाजूच्या गोष्टी पण दिसत होत्या. पण जेव्हा अर्जुनाला विचारण्यात आला की तुला काय दिसत तर त्याचं उत्तर आला मला फक्त तो डोळा दिसतो. कारण तेच त्याचं लक्ष्य होते, ध्येय होत. आपण पण जेव्हा ध्येय ठरवतो आणि ते सोडून त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी जस की करमणूक, आळस मजा मस्ती या त्या पक्षाच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी आहेत ज्या नेम चुकवतात. आपलं ध्येय चुकवतात.

म्हणूनच जेव्हा जेव्हा अस वाटेल की आपण दुसरच काहीतरी करत आहोत तेव्हा तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारायचा? माझं नेमके ध्येय काय आहे? मला काय मिळवायचं आहे? आणि ते मिळवण्यासाठी मी जे अता वागत आहे ते योग्य आहे का? जर ती गोष्ट योग्य नसेल तर ती करणं तिथेच थांबवावी. हा प्रश्र्न आपल्याला परत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला मदत करेल.

दुसर म्हणजे आपण जर एखादी गोष्ट मिळवायची ठरवली आहे तर ती पूर्ण करत असताना त्याचा रेकॉर्ड ठेवावा. म्हणजेच त्याला ट्रॅक करावं. यातून आपण अजून किती मजल पुढे जायचं आहे हे आपल्याला समजत तसच आपण भरकटत नाही.

छोट्या छोट्या पण तात्पुरत्या सुखाकडे न पहाता दीर्घकालीन सूखाकडे लक्ष द्या. आता हे ध्येय मिळवताना त्रास होईल पण त्यातून पुढे जाऊन आपण काय मिळवणार आहोत हे जर आपण पाहिलं, अशी दूरदृष्टी ठेवली तर आपण आपल्या ध्येयाला चिकटून राहू. एमपीएससी, upsc करणारी मुलं त्यांचं टाईम टेबल अचंबित करणारं असत. ही मुलं परीक्षेच्या काळात दुसर काहीही पाहत नाहीत. फक्त एकाच गोष्टीच्या मागे असतात ते म्हणजे अभ्यास. इतकं फिक्स रूटीन असत. असच आपलं रूटीन असल पाहिजे.

आपली जी ध्येय आहेत ती आपल्या मूल्यांचाच एक भाग असतात. मूल्य म्हणजे अशी गोष्ट ज्याच्या आधारे माणूस जगत असतो. मग ती असतील नाती जपणे, चांगलं काम करणे, नाव कमावणे प्रत्येकाची मूल्य वेगळी आणि या मूल्यांच्या पूर्ततेतच आपली ध्येय असतात. म्हणून अस वाटत असेल की आपण कुठेतरी दुसरीकडे वळतोय तर स्वतःला विचारायचं, की १००वर्षाचा झालो आहे आणि आता मी मरणार आहे? तरी मी आनंदी आहे याचं कारण काय असू शकेल? याची जी पाच उत्तर येतील ती आपली मूल्य असतील. मग ही मूल्य मिळवण्यासाठी, त्यासाठी लागणारी जी ध्येय आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी आता तेव्हढे प्रयत्न करत आहे का? त्या मार्गावर मी आता आहे का? अस स्वतःला विचारलं तर आपल्या लक्षात येईल की हो आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे, प्रयत्न करायचे आहेत.

अशा पद्धतीने जर आपण स्वतः ला प्रश्न विचारले, आपल्या वागण्याचा आढावा घेतला, स्व जागरूकता ठेवली तर नक्की आपल्याला आपली ध्येय लक्ष्यात राहतील व आपण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “स्वतःला आपल्या ध्येयाची वारंवार आठवण करून देण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. पाहुयात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!