Skip to content

स्वतःकडे आणि आयुष्याकडे शून्यात पाहणाऱ्या व्यक्तींनी हा लेख जरूर वाचा.

स्वतःकडे आणि आयुष्याकडे शून्यात पाहणाऱ्या व्यक्तींनी हा लेख जरूर वाचा.


हर्षदा पिंपळे


अंदाज पायवाटांचा
मी हळूहळू घेत गेलो…
कळलच नाही वाटेवरी
चालताचालता मी आकाशी
कसा उडत गेलो….!!

जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजे आयुष्य असं म्हंटलं जातं.आणि हेच आयुष्य म्हणजे प्रत्येकाला एक खडतर प्रवास वाटत असतो. कुणी हा प्रवास अतिशय प्रामाणिकपणे, आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात तर कुणी या प्रवासापासून शक्य होईल तितकं दूर पळण्याचा प्रयत्न करतात. काही व्यक्ती स्वतःकडे, आपल्या आयुष्याकडे शून्यात पाहतात. आपल्याकडे काहीच नाही , आपण काहीच करू शकत नाही, आपण काहीच करू शकणार नाही या दृष्टिकोनातून ते स्वतःकडे पाहत असतात.

आयुष्यात खाचखळगे येणं अगदी स्वाभाविक आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती ओढावते तसच आयुष्यातील खाचखळग्यांच आहे.एखाद्या तुफानासारखी ही संकटं येतात पण त्या तुफानासारखीच ती काही काळाने निघूनही जातात. मान्य की , तुफान खूप काही उध्वस्त करून जातं.पण हेही तितकच खरं की ते तुफान कितीतरी गोष्टी पारदर्शक करून जातं.

पण या गोष्टीचा विचार करणारी माणसं क्वचितच आहे. इथे स्वतःकडे शून्यात पाहणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. कदाचित वाढती स्पर्धा हे त्याच्यामागच एक कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वतःकडे ,आयुष्याकडे शून्यात पाहणाऱ्या व्यक्तींसाठी एकच सांगण आहे की आपल्याला सहसा कोणत्याही गोष्टीचा अंदाज लवकर येत नाही. येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच लागली तर आयुष्यासोबत लढण्याची रंजक कुणालाच कळणार नाही.काही गोष्टी वेळ काळ पाहून कधीच येत नाही.

तुम्ही स्वतःकडे शून्यात पाहताय मग एका गोष्टीचा विचार जरूर करा. ती गोष्ट म्हणजे ‘शून्य’ …. .. ! आता तुम्ही म्हणाल की “आधीच आयुष्यात सगळं शून्य आहे. मग या शून्याचा काय असा वेगळा विचार करायचा…?” तुम्हाला पडलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. पण सांगायचा उद्देश इतकाच की या ‘शून्याचा’ शोध लावायलाच कितीतरी काळ लोटला.आणि आर्यभट्टांनी या शून्याचा शोध हा शून्यातूनच लावला.महत्त्वाच म्हणजे शून्याची किंमत ही जागेनुसार बदलत असते.

आणि आयुष्यात शून्याचच महत्त्व असामान्य आहे. कितीतरी उदाहरणं अशी आहेत जी शून्यातून अगदी ताठ मानेने उभी राहिली आहेत.त्यामुळे स्वतःची जागा आपण बदलायला हवी. शून्यातून उभं राहायची ताकद ही आपल्या मनगटात असतेच फक्त ती वेळीच आपल्याला ओळखता आली पाहिजे. मनगटातली ताकद केवळ एखाद्याला मारण्यासाठी नाही तर आयुष्यातील लढाया लढण्यासाठी वापरता आली पाहिजे.

आपल्या आयुष्यात समोर कितीतरी अशी उदाहरणं आहेत जी की शून्यातूनच एक आदर्श म्हणून उभी आहेत.त्या लोकांनी हळुहळू त्यांच्या पायवाटांचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. आणि कालांतराने त्यांनी थेट आकाशाला गवसणी घातली. बाणेर रोडवरच्या ‘चिनार गार्डनचा’ मालक ‘प्रेम’ शून्यातून आयुष्य कसं घडवायच हे अगदी सहजपणे सांगू शकतो. त्याचा शून्यापासून सुरू झालेला प्रवास निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.

आयुष्यातील कित्येक अडथळे पार करत तो आज अभिमानाने उभा आहे.इतकच नाही तर वयाच्या पस्तीशीत डॉक्टरकीच स्वप्न पाहून त्या पूर्ण करणाऱ्या ‘शारदा बापट’ यांनीही एक वेगळाच आदर्श समाजापुढे घालून दिला. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन कुणीच जन्माला येत नाही.त्यामुळे आयुष्यात काहीतरी कमवायच असेल तर जिद्दीला , प्रयत्नांना साद ही घालावीच लागते.सगळ्यांचाच प्रवास हा एखाद्या हायवेवरील चकाकणाऱ्या सपाट रस्त्यांसारखा मुळीच नसतो.

नाही म्हंटलं तरीही एखादा खडी-डांबर आयुष्यात येतोच.त्यामुळे स्वतःकडे शून्यात पाहू नका.आणि शून्यातूनच नवनिर्मीतीचे विचार जन्म घेत असतात. म्हणून उठा , सज्ज व्हा….शून्यातून उभारी घ्या. आणि आपल्या अस्तित्वाची जगाला एक नवी ओळख करून द्या. ईतकच नाही तर स्वतःला आपण शून्यातून काहीतरी नक्कीच करू शकतो याची जाणीव करून द्या.

मित्रांनो, आयुष्याला असं शून्यात समजून सगळं आयुष्य वाया घालवू नका.हात नसलेला माणूस जर पायाने चित्र काढू शकतो , एखादा अंध व्यक्ती गाणं गाऊ शकतो , डॉक्टर एखादी अवघड शस्त्रक्रिया प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशस्वी करू शकतात,एखादा पक्षी एक एक काडी रचून घरटं बांधू शकतात तर मग आपणच आपल्या आयुष्याकडे असं शून्यात का पहायच…?

आपणही शून्यातून विश्व निर्माण करूच शकतो. एखादी गोष्ट चुकली , हातातून निसटली तर स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.त्यापेक्षा पंखाना सांगा आपल्याला अजून उंची गाठायची आहे, यशाच्या शिखरावरून स्वप्नांचा अथांग असा समुद्र किनारा पहायचा आहे.

एखादी घटना चुकीच्या पद्धतीने झाली , एखादी लागवड चुकीची झाली, अपयश आलं , भीती वाटली तर क्षणातच स्वतःकडे शून्यातून पाहू नका.त्यापेक्षा त्या शून्यातूनच पलिकडच जग पहायचा प्रयत्न करा.त्या शून्यापलिकडेही काहीतरी अस्तित्व असतं , शून्यातून कर्तृत्व निर्माण होऊ शकतं असा विश्वास स्वतःवर ठेवा.

सतत शून्यात पाहणं चांगली गोष्ट नाही.शून्यात पाहत राहिलात तर तिथेच तुम्ही आकर्षित व्हाल. म्हणून तुम्ही जरा शून्यातून बाहेर बघा…तुमची पावलं नक्कीच नवनिर्मितीसाठी भरारी घेतील.

आणि एखाद्या अपयशाची कहाणी नक्की ऐकून पहा.म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्यासारखेच कितीतरी जण स्वतःला शून्यात पाहतात. आणि शून्यातून एखादं विश्व निर्माण करण्यासाठी ते जीवाची किती धडपड करतात हेही तुमच्या लक्षात येईल. आणि खरच शून्यातूनही विश्व निर्माण होऊ शकतं याची जाणीव तुमच्यामध्ये नक्कीच समृद्ध होईल.

So…..आजपासून स्वतःला शून्यात पहायच बंद करा…आणि त्या शून्यापलिकडे पहायला सुरुवात करा…..कारण , आयुष्य सुंदर आहे…. थोडं जगून पाहूया….!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!