स्टेटस ठेऊन लोकांनी माझं चांगलं केलं नाही, हे सांगण्याची अजिबात गरज नाही.
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
आताचा काळ हा मीडियाचा काळ आहे. इंटरनेट, डिजिटल गोष्टींचा काळ आहे. जे काय आहे ते सर्व स्क्रीन वर आहे. स्क्रीन द्वारे सर्व काही केलं जातं. मग ते बोलण असेल, देवाणघेवाण असेल, काम असेल काहीही. कोरोनाच्या काळात तर सर्वच ऑनलाईन झालं होतं. त्यामुळे याच महत्त्व अधिकच वाढलय. याच मीडिया मध्ये येतो तो सोशल मीडिया. सोशल मीडिया ने आता अख्ख जग व्यापल आहे. याचे जे विविध प्लॅटफॉर्म आहेत जस की फेसबुक असेल, व्हॉटसअप, इंस्टाग्राम,टि्वटर सर्व प्लॅटफॉर्म वर आता सर्वांची अकाउंट असतात. अगदी पाच वर्षाच्या मुलाचे देखील यावर अकाउंट असते. हे प्लॅटफॉर्म जेव्हा सुरू झाले होते तेव्हा अस बोललं गेलं की याने लोकांना एकमेकांच्या खूप जवळ आणलं.
पूर्वीच्या काळी एक पत्र पाठवलं तरी अगदी महिने लागत ते समोरच्याकडे पोहोचायला त्यानंतर त्यांचं उत्तर येण्याची वाट पाहावी लागे.
पण हे चित्र सोशल मीडिया ने पालटलं. व्यक्ती कितीही दुरवर असला तरी सेकंद भरात आपलं बोलण, आपले मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचतात. इतकंच नाही तर यावर आपण आपलं मत मांडू शकतो, आपल्या आठवणी शेअर करू शकतो आपल्याला हवं तस व्यक्त करू शकतो. लोकांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने पोहोचू शकतो.
पण कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते. ती मर्यादा ओलांडली की त्याचे दुष्परिणाम, त्याचा त्रास आपल्याला सहन करायला लागतो.
व्हॉट्सप असूदेत किंवा इंस्टा, फेसबुक हे सर्व सोशल मीडिया आहेत. यावर अनेक लोक आपल्याला पाहत असतात फॉलो करत असतात. त्यावर प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळे आपण जे काही त्यावर टाकतो त्यावर विचार करावा लागतो. या प्लॅटफॉर्म वर आपण अनेक गोष्टी टाकत असतो. फिरायला गेलेलं फोटो, व्हिडिओ, एखादा विनोद अस काहीही. आपण काही यश मिळवलं तेदेखील आपण टाकतो. का तर आपल्या मनातल्या भावना आपल्याला लोकांपर्यंत पोहचवायच्या असतात. आपल्याला त्यातून आनंद मिळतो. अनेकदा आपल्याला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटल, काही दुःखद झालं तेही आपण शेअर करतो. पण तरीही या सर्वाला एक मर्यादा आहे.
अनेक जण त्यांच्यासोबत काहीही चुकीचं झालं, वाईट झालं किंवा त्यांच्या ज्या काही वैयक्तिक बाबी असतात ते स्टेटस ला ठेवून मोकळे होतात. मग त्यामध्ये इमोजी असतील, शायऱ्या असतील आणि अनेकदा तर सरळ सरळ वाक्यच लिहिलेली असतात आणि त्यातून सांगितलेले असत की कस मला लोकांनी चुकीचं वागवलं, कस मी फसलो, कस माझ्याबरोबर लोकांनी चांगलं केलं नाही.
आवेगाच्या भरात आपण या गोष्टी करतो खऱ्या, पण त्यामागे आपण नीट विचार केलेला असतो का? आपण हे जे काही टाकत आहोत त्यामध्ये खरच पाहणाऱ्यांना रस आहे का? आपण स्वतःच आयुष्य आपला वैयक्तिक गोष्टी सरळ सरळ पोस्ट करत आहोत, याचा कोणीतरी गैरफायदा घेऊ शकत हा विचार आपण करतो का? प्रत्येक गोष्ट अशी स्टेटसला ठेवून आपण आपल्या भावनांच गरज नसताना प्रदर्शन करण काही गरजेचं असत का? नाही. हे माध्यम जरी आपल्या मनातल्या गोष्टी, आपल्या रोजच्या आयुष्यात काय घडत हे टाकायची मुभा देत असेल तरी याचा अर्थ असा होत नाही की आपण त्यावर आपल्या आयुष्यातील एक न एक गोष्ट टाकालयच हवी.
आपल्याला माहीत पण नसत पण समोर बसलेली एखादी व्यक्ती याची खिल्ली पण उडवत असते आणि ही खिल्ली आपण उडवू देतो अस काहीतरी टाकून. बर या सर्व गोष्टी टाकून आपल्याला कोणाकडून काही मदत होते असही खूप कमी वेळा होत. लोक फार फार तर काय झालं विचारतात आणि सोडून देतात. याने आपलं दुःख कमी होत नाही तर आपण त्याचा बाझार करून टाकतो. जी गोष्ट आपण सरळ सरळ पोस्ट करतो ज्या माणसाबद्दल पोस्ट करतो तेच आपण त्या व्यक्तीशी बोलल पाहिजे जे काही आहे ते मिटवल पाहिजे असं आपण करत नाही.
इथे हेच महत्त्वाचं असतं. आता अस वाटू शकत की जर आनंद शेअर करू शकतो तर दुःख का नाही? आपण दुःख व्यक्त नक्कीच करू शकतो पण नुसतं याने माझे वाईट केलं, त्याने मला दगा दिला हे टाकून आपल्याला ना कोणी मदत करू शकत नाही आपल्या दुःखात नीट सामील होऊ शकत. यातून आपली विचारसरणी दिसून येते.
ती कशी? तर जर खरच अस काही झालं असेल तर ते कमी करण्यासाठी काही प्रयत्न करण्याऐवजी आपल्याला ते पोस्ट करण जास्त महत्त्वाचं वाटत. यातून बाकी काही नाही तर आपलं उथळ व्यक्तिमत्व दिसून येत. अनेक जण तर अप्रत्यक्षरित्या स्टेटस ठेवून टोमणे देखील मारतात. ज्या गोष्टी समोरा समोर बसून, बोलून मिटवल्या पाहिजेत त्या पोस्ट करून आपण अजून चार जणांना त्यावर बोलण्याची संधी मिळवून देतो. जे की चुकीचं आहे. यातून आपलच नुकसान आहे. कारण आपण आपलं आयुष्य पूर्ण उघड करतो ज्याची काहीही गरज नसते.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात. चांगल्या बरोबर वाईट अनुभव येणारच. ते कोणाला चुकले नाहीत. पण मग त्यावर त्या व्यक्तीशी बोला, आपल्या जवळच्या व्यक्तीशी, तज्ज्ञ व्यक्तीशी बोला ज्यातून ही समस्या सुटेल. अस १०० लोकांपुढे आपलं खाजगी आयुष्य मांडून काहीही होत नाही, समस्या वाढू शकतात. म्हणून आपण जे काही करतो त्यामागे नीट विचार करा. सोशल मीडिया कितीही चांगला वाटला तरी शेवटी हे सर्व आभासी जग आहे. त्याचा तितकाच वापर करा जितका गरजेचा आहे. जर हा इतकाच प्रभावी असता तर प्रत्यक्ष समोर असणारी माणसं, त्यांचं महत्त्व अजूनही टिकून राहील नसत.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खुप छान, आणि बरोबर…