Skip to content

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे जवळची नाती कायमची लांब गेलीये.

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे जवळची नाती कायमची लांब गेलीये.


हर्षदा नंदकुमार पिंपळे


‘सोशल मीडिया’…… सोशल मीडिया म्हणजे आयुष्यातील एक अविभाज्य भाग किंवा जणू आपलं आयुष्यच आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आज या सद्यस्थितीला सोशल मीडियाने प्रत्येकाच्याच आयुष्यात एखाद्या उंदरासारखाच धुमाकूळ घातला आहे.सोशल मीडिया आणि माणूस एकमेकांची पाठ काही सोडत नाहीत.सोशल मीडिया आणि माणूस म्हणजे जणू उंदीर आणि मांजराची एक जोडीच…!

सोशल मीडियामुळे आयुष्यात अनेक चांगले बदल झाले.जगाच्या कानाकोपऱ्यात काय चाललय ते एका क्लिकवर समजणं सोपं झालं.दूरस्थ अंतरावरच्या लोकांना आठवण आली की क्षणात व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधता आला तो या सोशल मीडियामुळेच…! ईतकच नाही तर कितीतरी नवी नातीही क्षणात जोडली गेली.

कुठल्याही कला-कल्पना सादर करण्यासाठी, विविध प्रकारे व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे एक चांगलच वरदान ठरलं. दूर असलेली नाती पुन्हा नव्याने या सोशल मीडियामुळे जवळ आली.त्यामुळे या सोशल मीडियाचे मानावे तितके आभार कमीच आहेत.

पण पहा आपण म्हणतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.इतकच नाही तर अतिविचार करणे देखील घातकच असते.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की नको नको ते सहन करावं लागतं.यात आपलं आणि इतरांचही नुकसान होत जातं.त्यामुळे कोणतीही गोष्ट ही प्रमाणात असणं जास्त आवश्यक आहे.

हे जरी खरं असलं तरी सोशल मीडियाच्या बाबतीत हा नियम आपण बहुधा विसरत चाललो आहोत.जगात सोशल मीडियाचा वापर करणारी असंख्य लोकं आहेत.वेगवेगळ्या पिढ्या, वेगवेगळ्या वयोगटातील एखादा अपवाद सोडला तर सगळीच माणसं ही या सोशल मीडियाचा वापर करत आहेत. पण त्या सोशल मीडियावर कुणाचा किती ताबा आहे हे मात्र ज्याच त्यालाच माहीत. अहो आजकालच चित्र पाहिलं तर सोशल मीडियाचा अतिवापर हा वाढत चाललाय.आणि याच अतिवापरामुळे त्याचा जवळच्या नात्यांवर विपरीत परिणाम होताना दिसतोय.

म्हणजे ज्या सोशल मीडियामुळे माणसं जोडली गेली त्याच सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नात्यांवर वाईट परिणाम होतोय.मनामनाने जोडलेली नाती केवळ या एका कारणामुळे तुटली जात आहेत. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नात्यांमध्ये सगळ्यात जास्त वाढत चाललाय तो गैरसमज….. आणि याच गैरसमजामुळे नात्यांची घट्ट बांधली गेलेली विण एका क्षणात सैल होऊन जाते.समजून घ्यायला जितका वेळ लागतो तितका वेळ गैरसमज करून घ्यायला लागत नाही.

व्हॉट्सऍप , इन्स्टाग्राम किंवा कोणतही अन्य माध्यम आपण वापरतो. ते किती वापरतो याच काहीच प्रमाण नाही. कदाचित इथेच नात्यांची गुंतागुंत व्हायला सुरुवात होते. लास्ट सीन, तासनतास ऑनलाइन , सतत पोस्ट्स किंवा स्टेटस अपलोड करणे, एकमेकांना हाईड करणे , लाईक – शेअर -कमेंट्स या सगळ्या गोष्टींद्वारे खूप गैरसमज निर्माण होत आहेत.संशयाच प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

साधी साधी उदाहरणं म्हणजे… सतत मोबाईल घेऊन त्यात डोकं खूपसून राहणे आणि नंतर कुणी काही विचारल तर लक्ष नसणे हा प्रकार तर ईतका वाढतोय की काही वेगळ सांगायलाच नको.

घटस्फोट म्हणाल तर….गेले कित्येक वर्षात घटस्फोटाच कारण हे केवळ कौटुंबिक हिंसाचारापुरतं मर्यादित राहीलं नसून ते आता थेट सोशल मीडियाचा कहर इथपर्यंत जाऊन पोहचलय.साधारण एक २५-३०% घटस्फोट हे केवळ सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे झाले आहेत. अनेक तक्रारी समोर आल्या त्यामध्ये ती/तो रात्र रात्र मोबाईलमध्येच गुंतलेले असतात.

अनेकदा खूप उशीरापर्यंत ऑनलाइन असणं , सारखे मित्रमैत्रिणींचेच प्रोफाईल फोटोस् , माझ्या रिप्लायला लवकर रिस्पॉन्स नाही वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यावेळी समोर आल्या. आता या छोट्या छोट्या गोष्टींमुळे लोकं थेट घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचली.

म्हणजे पहा या सोशल मीडियाचा अतिवापर किती घातक ठरू शकतो. जवळची नाती थेट उध्वस्त होतात. समजून घ्यायच्या मनस्थितीत ही नाती राहतच नाहीत. त्यांच्या मनात केवळ सोशल मीडियामुळे पसरलेला गैरसमज नावाचा लाव्हा धूमसत राहतो. तो /ती रात्र रात्र ऑनलाइन असतो/असते. ‘मला घटस्फोट हवाय’ , मला तुझ्यासोबत रहायच नाही. मी ब्रेकअप करतोय/करतेय.वगैरे या गोष्टी सर्रासपणे वाढत आहेत.तु फोटो अपलोडच का केला , मला विचारल का नाही…?, तु ते शेअर का केलं…असच का तसच का…इतका वेळ कुणासोबत ऑनलाइन गप्पा रंगल्यात …? लास्ट सीन का हाईड केला..

या गोष्टी इतक्या वाढू लागल्यात की अशा वेळी या सोशल मीडियाला शाप म्हणावं की वरदान हा प्रश्न निश्चित डोळ्यासमोर उभा राहतो. या आभासी जगात लांबची नाती जरी जवळ येत असली तरीही काही जवळची नाती याच सोशल मीडियामुळे कायमची दुःखावली जात आहेत ,दुरावली जात आहेत.

त्यामुळे या सोशल मीडियावर प्रत्येकाचा ताबा असायला हवा. त्याचा इतकाही अतिरेक होता कामा नये की एखाद्या नात्यात वितुष्ट निर्माण होईल. योग्य प्रमाणात आपण आपल्या मर्यादांच भान ठेवून सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे.नाहीतर नात्यांमध्ये दुराव्याची दरी केव्हा निर्माण होईल कळणारही नाही.सोशल मीडियाचा वापर करू नका असं नाही.

पण त्याचा वापर योग्य वेळी योग्य प्रमाणात केला पाहिजे. सोशल मीडिया आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक चांगल मोकळं असं व्यासपीठ आहे. पण मग मोकळ्या व्यासपीठावर सगळं कसं मोकळं असतं.कोणत्याही प्रकारची लपवाछपवी तिथे चालत नाही. त्यामुळे या सोशल मीडियावर मोकळेपणाने व्यक्त व्हा.पण नात्यांसोबत लपाछपीचा खेळ मात्र खेळू नका.कारण गोष्टी हरवल्या तर सहजासहजी सापडणं मुळीच शक्य नाही. सोशल मीडियात इतकही गुंतून पडू नका की नाती कायमची तुटली जातील.

या आभासी जगात
नवी नाती बहरतीलही कदाचित…
इतकच नाही तर
लांबची नाती जवळ येतीलही
कदाचित…
जवळची नाती मात्र कायमची
दुरावतील…
सगळ्याच ‘solution’ असेलही
या सोशल मीडियाकडे…
पण तुटलेल्या नात्याला मात्र
जोडायच कसं..?
याचं ‘solution’ या सोशल
मीडियाकडे नसेलही…
कदाचित…..!

So……मित्रांनो…मैत्रिणींनो… सोशल मीडियाच्या चाहत्यांनो….नाती सांभाळणं सोशल मीडियापेक्षा कठीण आहे… त्यामुळे आधी नात्यांना सांभाळा… आणि शक्य होईल तितकं योग्य प्रमाणात हा सोशल मीडिया हाताळा….!!

बाकी.. आयुष्य तुमच आहे , तुमच्या आयुष्यावर कंट्रोल ठेवणारे तुम्ही स्वतःच आहात.त्यामुळे कोणत्या गोष्टींवर किती कंट्रोल करायचा हेही एकदा समजावून घ्या. सोशल मीडिया सोडून इतर विश्वही आहे याची जाणीव स्वतःला एकदा करून द्या….कधीतरी त्या सोशल मीडियातून बाहेर पडून मावळतीचा सूर्य पहायचा प्रयत्न करा…

नात्यांच माध्यम काही केवळ सोशल मीडियाच नाही हे लक्षात घ्या.एखादी पहाट…एखादी संध्या या नात्यांच माध्यम असु शकते.नाती त्यातूनच व्यक्त होत रहातात.त्यामुळे सगळा वेळ त्या सोशल मीडियावर घालवू नका. थोडा वेळ आपल्या जवळच्या नात्यांनाही द्यायला शिका…..!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!