Skip to content

सोबती गेला म्हणून आयुष्य टाकून देऊ नका.

सोबती गेला म्हणून आयुष्य टाकून देऊ नका.


सोनाली जे.


जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जातां राहील कार्य काय।।

सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। होईल कांहिं का अंतराय।।

अशा जगास्तव काय कुढावें । मोहिं कुणाच्या कां गुंतावें।। हरिदूता कां विन्मुख व्हावें । कां जिरवुं नये शांतींत काय।।

सगे सोयरे डोळे पुसतील। पुन्हा आपल्या कामी लागतील।। उठतील बसतील हसुनि खिदळतील। मी जातां त्यांचें काय जाय।।

कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेच्या काही पंक्ती. जीवनाचे सत्य च त्यांनी यातून मांडले आहे.

जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती आज ना उद्या जाणार आहे. मृत्यू अटळ आहे. मी गेल्याने सूर्य, चंद्र , तारे उगवण्याचे थांबणार नाहीत. ऊन , वारा , पाऊस , सर्व सुरळीत असणार. नवीन पीक उगवणार , जुने पीक काढले जाणार. आपल्या जाण्या नंतर आपले सगे सोयरे जमतील , दिवस जातील तसे ते परत आपल्या कामाला लागतील, त्यांची दिनचर्या चालूच राहणार. आज दुःख करणारे उद्या हसतील , खेळतील. सारे विसरून पुढच्या मार्गाला लागतील.

आपला सोबती खरे तर त्यात ही आयुष्याचा सोबती वेगळा , शाळेतला एका बेंच वरचा सोबती वेगळा, नोकरी मध्ये आपल्या टेबल शेजारचा असेल किंवा दुसऱ्या department मधला ही तेवढाच जवळचा सोबती असेल , रोज डबा खाताना चा सोबती , शाळेत जाताना , कॉलेज मध्ये जाता येता सोबत असणारा सोबती, तर अभ्यासतला सोबती, रोज जाता येता बस , लोकल मध्ये आपुलकीने आपली वाट बघणारा , आपली जागा पकडणारा सोबती .

हे सगळे सोबती मग त्यात स्त्री असेल , पुरुष असेल मुले असतील , वरिष्ठ असतील , शेजारी असतील , ऑफिस मधले सहकारी असतील किंवा रोजचे प्रवासातले किंवा कधी तरी अनोळखी असणारी व्यक्ती ही आड वळणावर , प्रवास किंवा हॉस्पिटल मध्ये अचानक भेटते आणि सोबती होवून जाते. ती क्षणिक असते .तर काही वेळेस तिथून होणारी सुरुवात शेवटपर्यंत असते.

मित्र मैत्रिणी , ऑफिस मधले सोबती , शाळा कॉलेज मधले सोबती आपण जसजसे पुढची स्टेप गाठतो तसे तसे मागे पडत जातात. त्यांचे मार्ग बदलतात. तर एखादा कॉलेज मध्ये ही सोबत असतो / असते. पण आयुष्याचे पुढचे मार्ग मात्र नोकरी , व्यवसाय , लग्न , कधी नोकरी निमित्त परदेशी स्थलांतर यातून सोबती बदलत जातात.

आयुष्याचा सोबती तो किंवा ती याविषयी सविस्तर बोलुयात.

आयुष्याचा सोबती लग्न या सामाजिक बंधनातून कायमचा मिळतो. ते कदाचित प्रेम विवाह एकमेकांच्या पसंतीने तर सहवासातून प्रेम आणि आकर्षण वाढून होणारे , एकमेकांविषयी बरीचशी माहिती , स्वभाव , आवडी निवडी , मित्र मैत्रिणी , नातेवाईक कोण कोण आहेत यातून तर कधी शिक्षण एकत्र घेत असताना , नोकरी मध्ये एकत्र असताना , arrange म्हणजे ठरवून किंवा घरच्यांच्या समतीने केलेले विवाह, यापुढे जावून आता live in relationship आली. एकमेक ठरवून, काही नियम ठरवून लग्न न करताच एकत्र राहतात.

काही असो पण जेव्हा आपला आयुष्याचा सोबती म्हणतो तेव्हा आपण खूप अपेक्षा करत असतो .तो / ती आपल्याला समजून घेणारी पाहिजे. आपल्यावर प्रेम करणारी , वेळ प्रसंगी खंबीर आधार देणारी, साथ देणारी पाहिजे. आपण कामाचे काही तास सोडल्यास कायम एकत्र असतो त्यातून एकमेकांचे स्वभाव समजून घेवून तसे वागत असतो. एकमेकांच्या आवडी निवडी मग त्या खानपान विषयी असतील तर पेहराव असेल किंवा छंद असेल , कधी निसर्ग आणि भटकंती विषयी असेल , तर एखाद्याला वाचनाची , लेखनाची आवड असते. कोणी अबोल तर कोणी गप्पिष्ट , कधी राग येतो , कधी एखादी गोष्ट विचारण्यास योग्य वेळ , तर कधी एकत्र बाहेर जाण्यास वेळ यानुसार आपण वागत असतो , आपला सोबती ही तसे वागत असतो. असे एक ना अनेक बारकावे आपल्याला अनुभवता येत असतात.

कधी कठीण प्रसंगी आपल्याला दिलेली साथ असते. तर कधी सुट्टीच्या दिवशी आराम म्हणून मस्त बाहेर फिरून वेगवेगळ्या चवीचं जेवण आस्वाद वाढवते मग जीभेचा असो वा आयुष्याचा. त्यातून एकमेकांना रोजच्या routine मधुन थोडा बदल , विश्रांती आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता , काळजी व्यक्त होत असते. तर कधी आपल्याला काही गोष्टी जमत नाहीत त्या बाहेर जावून खण्यातला आनंद लुटता येत असतो. कधी कधी आपलेपणाने सांगितलेल्या चार गोष्टी तर कधी आजारपणात केलेली मदत , घेतलेली काळजी , आर्थिक व्यवहार दोघांनी मिळून करण्याची सवय, अगदी पुरुष एकटा कमावता असेल तो बाहेरची जबाबदारी आणि स्त्री हाऊस wife असेल तरी ती घरची , घरच्या सर्वांची काळजी , जबाबदारी घेत असतें . एकमेकांचा सहवास .

एकमेकांची सवय झालेली असते. प्रत्येक गोष्टीत एकमेकांचे मत , साथ , कधी त्रास झाला तर व्यक्त होण्याकरिता शब्द आणि त्या त्रासावर मात करण्यासाठी कधी एकमेकांचे आधार , तर कधी guidance, आपलेपणा , ओढ असते. यात प्रत्येकजण समजून घेवून दुसऱ्या करिता गोष्टी करत असते. जपत असते. नवरा असेल तर त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी .कपडे धुणे , इस्त्री , जेवणखाण , डबा असेल किंवा इतर गोष्टी सहज सापडतील अशा ठेवणे, करणे .

बायको असेल तर तीच्याकरीता आर्थिक स्थैर्य देणे , राहण्याकरिता घराची तजवीज करणे , दैनंदिन व्यवहारात लागणाऱ्या गोष्टी , घर सामान असेल वीजबिल , किंवा मग घरात गरजेच्या वस्तू घेणे , अन्न , वस्त्र , निवारा या सगळ्या जबाबदाऱ्या तर पुरुष घेत असतात च.
दोघेही आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करत असतात. कधी कंटाळा आला तर बाहेर फिरायला , सिनेमा , निसर्गरम्य ठिकाणी तर कधी जाणे.. शरीर. आणि मन दोन्ही ही टवटवीत राहतील याची काळजी घेत असतात. भविष्य कालीन आपत्ती करिता दोघे मिळून बचत करतात. आरोग्य , हॉस्पिटल या करिता mediclaim , lic policy या सारखी तजवीज करत असतात.

मुख्य हे सोबती हे गृहीत धरून जातात की आपल्याला लाँग टाईम relationship प्रस्थापित करायची आहे . त्यामुळे दोघेही प्रसंगी तडजोड करत असतात. समजून घेत असतात. समजावून सांगत असतात. मुलांची जबाबदारी , त्यांच्या भविष्या ची तजवीज , त्यांच्यावर योग्य संस्कार आणि शिकवण देत असतात.

या सोबती मध्ये प्रेम म्हणजे केवळ मी म्हणेन तसे वागणे नसते , त्याच्यावर आपल्या अपेक्षांचे बंधन नसणे तर समोरच्याला त्याच्या म्हणण्याप्रमाणे ही वागू देणे हे ही प्रेमच असते. सगळेच नेहमी गोडी गुलाबी मध्ये होत असते असे नाही ना. तर कधी भांड्याला भांडे लागते, कधी गैरसमज होतात , कधी विश्वास डळमळीत होतो . तर कधी आर्थिक चढ उतार ही येतात. कधी छोटी मोठी आजारपणे यातून ही वाढणारे खर्च आणि त्रास यात चिडचिड करण्यापेक्षा समजून घेण्याची गरज ही पूर्ण होत असते.

सोबती असेल तर मानसिक भावना , सुख , समाधान , हे तर असतेच पण नैसर्गिक गरज जी दोन शरीराची ती ही आनंदाने पूर्ण करून सुखाची परिसीमा गाठली जाते. आणि शांतता मिळत असते. एक नवीन उत्साह , प्रेरणा मिळत असते. कधी ऑफिस तर घर यातून थकलो , मनाविरुद्ध घडतं असेल , स्ट्रेस असेल तर तो सुसंवाद , आधार आणि साथ, दिलासा देण्यात जाणवत असतो.

आयुष्याच्या संसाराचा गाडा या दोन चाका वर नेटाने पुढे जात असतो.

काही वेळेस सगळेच सुरुवातीला गोडी गुलाबी मध्ये असते. तर काही वेळेस कुठे तरी सुरुवातच चुकीची होते. काही वेळेस गाडी खूप smoothly पुढे जात असते .तर काही वेळेस सुरुवातीला च खडखडाट होवून बंद पडते. मग सततची कुरबुर , अशांतता , तर कधी अगदी सुरुवाती पासून सुरळीत चाललेली गाडी मध्येच काही तरी होते आणि कधी बंद पडते , तर कधी खडखड करू लागते. अनेक कारणे असतात मीच का करायचे पासून , छोट्या गोष्टी आल्यावर चहा दिला नाही , घरी नसणे , बाहेर मैत्रिणी यांच्यात व्यस्त असणे. एकमेकांना पुरेसा वेळ देवू न शकणे. गरजा पूर्ण करू न शकणे , यातून कधी गैरसमज

वाढत जातात आणि दोघांचे पटेनासे होते. कधी कधी ताजे ताजे करकरीत लोणचे खाण्यात ही मजा असते , कधी छानसे मुरलेले लोणचे ही छान लागते तर कधी कधी लोणचे खूप जास्त मुरले तरी मग त्याला भुरा येवून खराब ही होते.तसेच सोबती ही . त्यांची नाती ही.

कधी सोबती घटस्फोट घेवून दुरावतात. तर मुलांच्या करिता , घरातल्या वडीलधारी मंडळी किंवा समाज काय म्हणेल या भीतीने एका च घरात राहून एकमेकांपासून अलिप्त होवून राहतात.

अशावेळी आपल्याच माणसाचा परकेपणा आपल्याला खूप त्रास देतो. घासातला घास खाल्लेला असतो , भरवलेला असतो . एक खात्री असते की ध्रुव ताऱ्या सारखे आपले स्थान अढळ आहे. पण ते स्थान जेव्हा डळमळीत होते तेव्हा ते accept करण्याची तयारी नसते. दुःख , रडू ,त्रास , वैताग , चिडचिड , भांडण , आदळ आपट करूनही , किंवा प्रेमाने समजून सांगून ही त्याचा काहीच उपयोग होत नाही तेव्हा स्वतः सह इतरांवर त्रागा होतो च. , मनस्थिती बिघडत जाते.

कधी राग , चिडचिड , निराशा , औदासीन्य येते. हतबलता निर्माण होते. सतत तेच तेच विचार करून obsessive compulsive behaviour होते तर कधी personality disorder .. कारण आपल्या व्यक्तिमत्व आणि त्यातले गुण बदलून आपण तेच आहोत का ?? एव्हढे प्रश्न निर्माण होतात.

तर कधी accident असेल , आजारपणं किंवा तडकाफडकी आपला सोबती कायमचा या जगातून जातो. तेव्हा खरेच जो उरतो त्याला खूप त्रासदायक होते. दोन्ही ही ठिकाणी विभक्त होणे असेल किंवा अलिप्त होणे असेल किंवा सोबती कायमचा निघून जाणे .मृत्यू . या कशाची च मानसिकता नसते. असे काही घडेल हे स्वप्नात ही विचार केले नसतात. आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद नसते. छोट्या गोष्टी पासून मोठ्या गोष्टी एकत्र केलेल्या आठवणी सदैव सोबत असतात.

सोबती गेला म्हणून आयुष्य टाकून देऊ नका. त्या करिता खालील गोष्टी जरूर करा.

१. स्वीकार : जी गोष्ट घडली आहे त्याचा स्वीकार करा . सोबती आयुष्यातून गेला हे स्वीकारणे सत्य असते पण जेवढ्या लवकर ते स्वीकार कराल तेवढ्या लवकर तुम्ही पुढे जात राहाल. नाही तर तुमची गाडी तिथेच अडकून पडेल आणि पुढे जाणे शक्य होणार नाही. किंवा वेळ लागेल. आपण कोणी चिरंजीवी नाही , किंवा तसेच आपली नाती ही . त्यामुळे जन्माला आलेली व्यक्ती किंवा नाते कधी ना कधी संपणार आहेच .. आपण प्रयत्न करायचे पण त्यातून आपल्या हातात जेवढे तेवढे करू शकतो .काही वेळेस डॉक्टर , विज्ञान ही कमी पडते. तर काही वेळेस आपण सोबती आणि सोबती आपणास जपण्यास कमी पडतात. त्यामुळे जे आहे त्याचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा.

२. भूतकाळात जगू नका. : सोबती गेल्याचे दुःख असणारच पण म्हणून सतत भूतकाळात जगू नका .त्यामुळे त्या आठवणी आणि तो सोबत यांचा विसर पडणारच नाही पण त्याची तीव्रता कमी करण्याकरिता त्या भूतकाळ आणि आठवणी पासून दूर राहा.

३. वर्तमानात जगा : जे घडले ते खूप वाईट च पण जी सोबत लाभली होती त्यातल्या चांगल्या अनुभवांचा ,जे शिकलो त्या गोष्टींचा वापर वर्तमानात जगण्या करिता करून घ्या. मग कसे motivation मिळत होते पासून एखादी गोष्ट करावी म्हणून मुद्दाम चिडून , डीवचून तर कधी टीका करून ..पण ती चांगल्या करिता करण्यात येत हे लक्षात घेवून त्याचा सद्य परिस्थिती मध्ये वापर करून घ्या.

४. भविष्याचा विचार करू नका.. आपला सोबती गेला म्हणून आता आपले कसे होईल , आर्थिक चिंता , घर कसे चालणार ..जेवण खाण यांची चिंता करून अजून त्रास होईल . नुसते विचार करून मार्ग निघणार नाहीत. समस्या दूर होणार नाहीत. त्यामुळे जी परिस्थीती आहे त्यात खंबीर उभे रहा. मार्ग काढा. धडपड करा. प्रयत्न करा. त्यावरचे उपाय शोधून ते अमलात आणा.

५. स्वावलंबन शिका : आपला सोबती असताना बरीचशी काम वाटून घेतली जात. घरकामे असतील किंवा आर्थिक प्राप्ती पासून सगळ्या जबाबदाऱ्या. सोबती गेला तरी स्वतः मध्ये जिद्द निर्माण करा. स्वतः सगळे करण्याची तयारी ठेवा. स्वावलंबी व्हा.

६. वातावरण बदल : आपल्या आवडत्या नातेवाईक , मित्र मैत्रिणी , मुले यांच्या सोबत quality time spend करा. काही तरी नवीन गोष्टी करत रहा. मोकळेपणाने बोला , शिका नवीन गोष्टी , मदत घ्या. सल्ले घ्या . मुलांना ही वेळ आणि आधार द्या. त्यांच्या कडून अनेक गोष्टी शिकता येतील.आणि त्याच त्याच वातावरणातून , विचारातून बदल होईल.

७. योगा , meditation , प्राणायाम , व्यायाम करा : ज्यातून मनाची एकाग्रता वाढेल , शरीर ही तंदुरस्त आणि मन ही फ्रेश राहील. उत्साह वाढेल.

८. आवडते छंद जपा : आपले छंद जपा , वाचन असेल , लिखाण , painting , travelling , tracking , कधी काव्य रचना , अभिनय त्या त्या आवडत्या गोष्टी जपा. त्यातून वेळ ही कारणी लागतो. Creativity वाढते. आणि आठवणी विसरण्यास मदत होते. आणि नवीन गोष्टी करताना शिकण्याची जिद्द निर्माण होते आणि उत्साह ही वाढतो. नवनिर्मिती चा आनंद ही मिळतो.

९. सकारात्मक रहा : सतत negative विचार करत राहिलात बोलत राहिलात तर नकारात्मक व्हाल त्यापेक्षा सकारात्मक रहा. मिळालेला सहवास सोबत ही आयुष्य जगण्याकरीता भरपूर आहे हे लक्षात ठेवा.

१०. व्यवहारीक गोष्टी पूर्ण करून योग्य ते निर्णय वेळीच घ्यावे लागतात. कर्ज असतील , फेडणे शक्य नसतील तर तसे परिस्थिती नुसार निर्णय घ्यावे लागतात. काही आपल्या जबाबदाऱ्या आता आपणच उचलाव्या लागतात. पैशाची सोंगे नाही आणता येत . काही savings नीट विचार करून पुढे योग्य ठिकाणीं secure ठेवावी लागतात. त्याकरिता इतर कोणी मदत करत नाही. तिथे भावनिक होवून चालत नाही. व्यवहारीक रहावे लागते.

सोबती गेला म्हणून आयुष्य टाकून देऊ नका. त्याच्या चांगल्या आठवणी सोबत आहेतच . आणि जगात अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आयुष्य थांबवू नका. जीवन गाणे गातच रहावे झाले गेले विसरून जावे , पुढे पुढे चालावे. विसरणे सोपे नसतेच पण आपल्या मनाच्या कप्प्यात खोलवर जपा .त्यावर नवीन गोष्टींची भर घालत जा. आपले आयुष्य रडत खडत काढण्यापेक्षा आनंदात जगा. धैर्याने पुढे जा. शरीर गेले असेल तरी गेलेल्या व्यक्तीचा आत्मा आपल्या सोबत आहे हे लक्षात घ्या आणि तीच साथ समजून पुढे जात जा. विचार करा शरीर हे एक माध्यम च होते तुमची मने जोडली गेली होती. मग शरीर संपले तरी मनात तो उत्साह असणारच ना. !!

आपले आयुष्य एकदाच मिळते . ते भरभरून जगा. कधी कधी आपणच आपली चांगली मैत्री करा. जे गेले ते परत मिळणार नाही. सगळ्यांनीच लक्षात घ्या जेव्हा आहात ती सोबत खूप चांगली ठेवा. एकदा परके झालो की काहीच परत येणार नाही. सोबती गेला म्हणून जगणे सोडू नका, उपाशी राहून , हाल करून , त्रास करून अजून निराशा येईल .छान नीटनेटके आवरून स्वतला उत्साही करा तसेच मनाला ही छान पॉलिश करा. त्याला ही आवरा.

आपल्या सारख्या सोबती नसलेल्या लोकांना भेटा. मदत करा. वृध्दाश्रम आहेत . तर अनाथाश्रम ही आहेत. जवळपास ही असे सोबती नसलेले लोक आहेत ज्यांच्या सोबत वेळ घालवा.मदत करा. विचार शेअर करा. भावना व्यक्त करा तर तेही मोकळेपणाने बोलतील.

भा. रा. तांबे यांची कविता जगा.

दुःख झाले तरी निसर्गनियम चुकलेला नाही. पाण्यात पडलो की हात पाय हलवावे लागतात.तसे जगण्याकरिता उमेद ठेवावी लागणार आणि हातपाय हलवावे लागतातच.

आयुष्य सुंदर आहे. सोबती नाही म्हणून आयुष्य सोडून देवू नका. मागे जे आहेत , जे आपल्यावर अवलंबून आहेत त्यांच्या करिता , आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्या करिता आपल्यांचा सोबती व्हा आणि कधी तरी मग स्वतचं स्वतः चा सोबती व्हा. आणि पुढे चालत रहा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!