Skip to content

सुखी असण्यापेक्षा सुखी आहे हे दाखवणं जास्त गरजेचं झालंय.

सुखी असण्यापेक्षा सुखी आहे हे दाखवणं जास्त गरजेचं झालंय.


लालचंद कुंवर

उरुळी कांचन , पुणे.


‘जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
विचारी मना तू चि शोधून पाहे ”

समर्थांनी या अभंगातून सतत विचार करणाऱ्या मनालाच, हा प्रश्न केला आहे की जगातील सर्व सुखी प्राणी कोण आहे ? हे तूच शोध मना.

सुख म्हणजे नेमकं काय हो?
हे व्यक्तिपरत्वे मतभिन्नता असू शकते , नव्हे असतातच.

काही थोर विभूती यांची उदाहरणे जर आपण पाहिली, तर हेच सत्य त्यांच्या कृतीयुक्त आचरणातून दिसून येते.

महात्मा गांधींना अहिंसेलाच जीवनाचं तत्त्व आणि सुख मानलं. बाबा आमटे यांना कुष्ठरोग्यांची सेवा करण्यातच सुख गवसलं . सिंधुताई सपकाळ या अनाथांच्या माता झाल्या, यातच त्यांना सुख आणि समाधान सापडलं. अब्दुल कलाम यांनी संशोधन आणि देश सेवेसाठी अख्खं आयुष्य समर्पण केलं. नेल्सन मंडेला यांनी वर्णद्वेष आणि वर्णभेद विरोधी मोहिमेतील लढ यालाच जीवनाचे सार्थक झाले अस ठरविल.

अशा काही असामान्य व्यक्ती आपल्या अवतीभवती आहेत किंवा होऊन गेल्यात . त्यांच्या सुख समाधानाच्या संकल्पनाच वेगळ्या आहेत, हो ..! खरा जगण्याचा सार त्यांना कळाला.

पण आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून आपलं ” सुख ” नेमके आपण कशात शोधत आहोत ? ‘स्वतःच्या सावली मागे स्वतःच धावत सुटलोय… !’ अशी गत तर सुख शोधण्याच्या नादात प्रत्येकांची, झाली नाही ना ?

का उद्याच्या सुख समाधानासाठी , आजच जगणंच , आजचा आनंदच विसरत चाललो आहोत ?

कुठे आहे नेमकी सुखी आयुष्याची गुरुकिल्ली ?

कारण आज प्रत्येक जण सुखी माणसाचा सदरा शोधण्यात व्यस्त झाला आहे.

या सर्व घटनांचा जर अंतर्मुख होऊन विचार केला तर
” काखेत कळसा आणि गावाला वळसा,” अशी गत सुख शोधणाऱ्या माणसाची झाली आहे.

कारण रोज दैनंदिन जीवनात , छोट्या छोट्या गोष्टीत, लहानसहान प्रसंगात सुख दडलेलं असतं. आनंद सामावलेला असतो. तो फक्त अनुभवता आला पाहिजे आणि घेताही आला पाहिजे गड्या….. ! ज्या दिवशी तुम्ही खडखडून हसला नाहीत , तो दिवस आयुष्यातला वाया गेला म्हणून समजा.

नाहीतर सुखाच्या मागे धावता-धावता आयुष्याचा टांगा कधी पलटी होईल, सांगता येत नाही ….. ! एवढं जगणं बेभरवशाच झालंय. म्हणून स्वतःच्या मनालाच well train कराव लागेल की ” प्रत्यक्ष सुखी असण्यापेक्षा, सुखी आहे हे दाखवणं जास्त गरजेचं झालंय. ” कारण आयुष्यात आपण जसे विचार करतो, जे Vision रंगवतो , तेच प्रत्यक्षात घडवून येत असतात.

आणि त्याच बरोबर मनालाही आपण प्रत्येक दिवशी ठणकावून न चुकता हेच सांगितलं पाहिजे की ,
” मन मित्रा, या भूतलावर माझ्यासारखा सुखी मीच आहे रे !”

खरचं ज्यांच्याकडे चांगल्या विचारांची संपत्ती आहे, चांगल्या सहवासाची हिरवळ आहे , तर सुख त्याला सोडून दुसरीकडे वास्तव्याला जाईल तरी कसं म्हणा ?

खरंतर अगदी लहानसहान कारणावरून सुद्धा सारखंच कुरकूर करणारी माणसं कोणालाच आवडत नाहीत ……. !
मग आपल्यालाही जर हीच सवय असेल अणि आपणही जर सारखेच कुरकुर करत असाल तर मग निसर्गही ” तथास्तु ” म्हणून मोकळा होतो.

पू. ल. देशपांडे यांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर हे एक प्रकारे
” चिंतातुर जंतूच ” असतात. बर यांच्या चिंता असतात अगदी आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या.. . !
त्याच बरोबर ” आज पेक्षा माझा उद्या कसा जाईल … ! ” हीच मोठी विवंचना यांच्यासमोर असते.
म्हणून या पेचातून बाहेर पडा, आणि आजचा दिवस , आजचा आनंद भरभरून जगा.

खरं पाहिलं तर , सुखाजवळ बसण्याचं एकच आसन आहे , मग तेथे ‘ चिंता का आनंद ‘ यांच्यापैकी कोणाला विराजमान करायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

भौतिक सुख सुविधांनी सुखी आयुष्य जगण्याच्या नादात , आत्मिक समाधान गमवून मानवाने त्याचं सरळ साधा आयुष्य इतकं गुंतागुंतीचं करून ठेवल आहे , की जगण्याचा खरा आनंदच बंदिस्त करून ठेवला आहे.

शेवटी हेच त्रिकालबाधित सत्य आहे की,
दिवसभर काम केल्यानंतर रात्री समाधानाने गाढ झोप लागावी…. ! यासारखं सुख जगात दुसरं कुठलंच नाही….. !

समाप्त

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सुखी असण्यापेक्षा सुखी आहे हे दाखवणं जास्त गरजेचं झालंय.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!