Skip to content

“सांगायची पद्धत चुकली की बरोबर असलेली गोष्ट पण चुकीची वाटते.”

“सांगायची पद्धत चुकली की बरोबर असलेली गोष्ट पण चुकीची वाटते.”


मधुश्री देशपांडे गानू


“जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ”

ही म्हण आपण अनेकदा ऐकलेली असेलच. बहुसंख्य दुकानदार, व्यावसायिक हे गुजराती-मारवाडी, पारशी असतात. पिढ्यानपिढ्या अत्यंत यशस्वीपणे व्यवसाय करत असतात. कारण सतत गिऱ्हाईकाशी गोड बोलणे, चांगल्या शब्दांत आगत-स्वागत करणे, चहापान विचारणे, गिऱ्हईक रिकाम्या हाताने परत जाणार नाही यासाठी प्रयत्नशील असणे अशा अनेक वैशिष्ट्यांसह हे उत्तम यशस्वी व्यवसाय करत असतात.

अत्यंत मृदू आणि गोड भाषा, संवाद योग्य पद्धतीने योग्य आवाज, योग्य स्तर राखून बोलण्याची कला यांना अवगत असते. त्याच प्रमाणे डोक्यावर बर्फ ठेवून निर्णय घेण्याची क्षमता असते. रागीट, संतापी माणसाला सतत क्षुल्लक कारणावरून राग येत असेल, तर त्याचं डोकं चालेनासं होतं. निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. सतत उद्धट भाषा, समोरच्याला तुच्छ लेखणे, वाद-विवाद, शिवीगाळ असे गुण (?) असल्यास कुठेही यशस्विता लाभत नाही.

नोकरी व्यवसायात यशस्वी होणं असो किंवा कौटुंबिक, प्रेमाचे नातेसबंध जपणं असो, तुमची बोलण्याची पद्धत चुकली तर तुम्ही सांगत असलेली बरोबर गोष्ट ही समोरच्या व्यक्तीला चुकीची वाटते. कारण तुम्हीं काय सांगत आहांत त्याच्याकडे त्याचे लक्ष जातच नाही. तुम्हीं त्याच्याशी अपमानास्पद पद्धतीने, रूक्षतेने बोलत आहांत एवढंच त्याच्यापर्यंत पोहोचतं. आणि प्रतिक्षिप्त क्रियेनुसार ती व्यक्ती तुमचं ऐकण्याच्या मनस्थितीत राहतच नाही. तुमच्याबद्दल लोकांचे गैरसमज होतात ते वेगळेच.

अगदी रोजच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे पहा ना! आई-वडील मुलांशी किती चुकीच्या पद्धतीने संवाद साधत असतात. तुमचा मुलगा किंवा मुलगी हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे लक्षात ठेवून तुम्हीं आदरपूर्वक त्याच्याशी संवाद साधायला हवा. प्रेमाने, समजुतीच्या स्वरात, त्याच्यावरील विश्वास दाखवत जर तुम्ही एखादे काम सांगितले तर तो/ ती नक्की करेल. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वाणी फक्त माणसाला लाभली आहे.

कोणतंही नातं, व्यावसायिक संबंध संवादाशिवाय शक्यच नाहीत. मग हाच संवाद आपण सुमधूर, श्रवणीय, आदरणीय करू शकतोच ना! सगळ्या भावभावना योग्य पद्धतीने व्यक्त झाल्या तरच त्या नीट पोहोचतात. अगदी नाराजी, राग सुद्धा. राग तर सर्वात प्रभावी भावना आहे, पण ती नेहमीच चुकीच्या पद्धतीने व्यक्त होते. आपण स्वतःचा आणि दुसऱ्याचा ही रक्तदाब वाढवून घेतो.

रागही तुम्हीं योग्य पद्धतीने, योग्य शब्दांत, योग्य आवाजाची पातळी ठेवून व्यक्त करू शकताच. सारासार विवेकाने, सामोपचाराने तुम्ही एखादी समस्या लवकर सोडवू शकता. अत्यंत चुकीच्या पद्धतीने बोलण्याने प्रश्न सुटत तर नाहीतच, उलट परिस्थिती, नाती आणखीनच बिनसत जातात. कायमची तुटतातही.

नीट विचार करून पहा. तुमच्या दैनंदिन जीवनात तुमचा किती लोकांशी रोजचा संपर्क येतो. तुमची घरकामातील मदतनीस, तुमची रोजची भाजीवाली मावशी किंवा भैया, इस्त्रीवाला , नेहमीचे ठरलेले दुकानदार. वर्षानुवर्षं आपण काही ठराविक दुकानातूनच खरेदी करत असतो. का? कारण त्यांचं अगत्याने बोलणं, चौकशी करणं, प्रेमाने दोन गोष्टी जास्त देणं, सवलत देणं अशा गोष्टींनी त्यांनी आपल्याला बांधून ठेवलेलं असतं.

नोकरी-व्यवसाय असो, नाहीतर नातेसंबंध असोत तुम्हाला हे संबंध वर्षानुवर्षं असेच सौख्याचे राहावेत असं वाटत असतं ना! मग त्यासाठी नवनवीन कल्पना, नवीन पद्धतीने संवाद आवश्यक असतो. आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी अगदी स्वतःचेही मार्केटिंग करावे लागते. यासाठी तुमची बोलण्याची, सांगायची पद्धत अगदी अचूक, योग्य, मृदू, गोड, अगत्याची हवीच ना! तुमचे सादरीकरण, भाषा सकारात्मक हवी. तरच या स्पर्धेत तुम्ही टिकून राहू शकता.

तुमची बोलण्याची पद्धत गोड, मृदू असेल तर यक्षप्रश्नही सहज सुटतात. कार्यालयीन कामकाजात जर तुम्हीं हाताखालच्या कर्मचाऱ्याला तुच्छतेने वागवले आणि सतत बाॅसपणा गाजवला तर ती व्यक्ती तुमचा राग राग करेल किंवा त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे त्याच्या कामात चुका  होतील. आणि तुम्हांला त्याला रागवायला आणखी कारण मिळेल.

या उलट जर तुम्हीं योग्य पद्धतीने, आदरपूर्वक त्याला काम समजावून सांगितले, त्याने आधी केलेल्या कामाचे आवर्जून कौतुक केले तर ती व्यक्ती आनंदाने, उत्साहाने मन लावून आपले काम करेल. त्याचा तुम्हांला फायदाच होईल.

प्रत्येक नात्याचा पायाच संवाद आहे. यातूनच तुमच्या भावना, समोरच्या प्रति तुम्हांला काय वाटतं हे पोहोचतं. मग ते योग्य पद्धतीने सातत्याने पोहोचणं खूपच महत्त्वाचं आहे. अगदी स्वसंवादही खूप गरजेचा आहे. स्वतःशी संवाद करतानाही तो योग्य पद्धतीने व्हायला हवा. म्हणजे उगाच स्वतःला दोष देणे, स्वतःबद्दल चुकीचे ठामपणे समज बाळगणे, स्वतःबद्दल कमीपणाची भावना असणे या गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळायला हव्यात.

स्वतःशी वास्तवाचे भान ठेवून सकारात्मक संवाद हवा. स्वतःच्या हातून घडलेल्या छोट्या-मोठ्या चांगल्या कामांसाठी स्वतःचे कौतुक असायलाच हवे. स्वतःला शाबासकी द्यायलाच हवी. कौतुकाचा एक शब्दही पुढची अनेक कामे यशस्वी करण्यासाठी उत्साह आणि प्रेरणा देतो. यामुळे एक व्यक्ती म्हणून तुमची सर्वांगीण वाढ होत असते. तुमच्या प्रेमाच्या , आपल्या माणसांचे, मित्र-मैत्रिणींचे मोकळेपणाने कौतुक करा.

तुम्हांला जे सांगायचे आहे ते योग्य पद्धतीने, योग्य शब्दांत समोरच्या व्यक्तीला त्याचा स्वाभिमान न दुखावता सांगा. लोकांनी तुमच्याशी कसं वागावं अशी तुमची अपेक्षा असेल तसं तुम्ही दुसऱ्यांशी वागायला हवं. म्हणजे तुमचे वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक सर्व पातळ्यांवर आयुष्य यशस्वी आणि आनंदमय होईल. यासाठी मनापासून शुभेच्छा….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!