समोरच्याची मर्जी संभाळण्यातंच आयुष्य निघून जातंय !!!
टीम आपलं मानसशास्त्र
कित्येकांचं आयुष्य हे समोरच्यांच्या मर्जीवर अवलंबून असतं. म्हणजेच त्यांनी ते अवलंबून करून ठेवलेलं असतं. जर समोरच्याची मर्जी राखली नाही तर आपलं काहीतरी व्यक्तिगत नुकसान होईल अशा भ्रमात या सर्व व्यक्ती जगत असतात.
सतत त्यांच्या मताला सहमती देणं, मग ते मत कितीही स्वार्थी वृत्तीचे, सर्वाना सामावून न घेणारे किंवा इतरांना नुकसान पोहोचवणारे जरी असेल तरी ती व्यक्ती योग्यच अशाप्रकारे त्या व्यक्तीची मर्जी राखली जाते.
यामध्ये कशाला त्या बिचारी व्यक्तीचं मन मोडायचं, कशाला तिला दुखवायचं हा सुद्धा विचार केला जातो. परंतु तिच्या वागण्यामुळे इतरांची सुद्धा मने दुखत असतात, हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही.
सतत हो ला हो म्हणणं, त्यांच्या मागे-मागे फिरणं आणि वेळ पडलीच तर त्यांचे अनावश्यक लाड करणं यांमुळे समोरच्या व्यक्तीला तशी वागणूक ठेवण्याची प्रेरणा मिळते.
काही काही वेळेस आपलं काम काढून घेण्याच्या हेतूनेही समोरच्याची मर्जी राखली जाते. परंतु आपलं काम करून घेण्याच्या या पद्धतीपेक्षाही दुसऱ्या अजून पद्धती आहेत, असा कोणताही मार्ग ते अवलंबत नाही.
सतत हाजी हाजी करणे, प्रत्येक गोष्टीत होकारार्थी प्रतिसाद देणे, एखादी गोष्ट जरी खटकली किंवा पचली नाही तरी स्पष्टपणे मांडता न येणे असा काहीसा स्वभाव या व्यक्तींचा बनलेला असतो.
या व्यक्ती घरात तर असे वागतातच पण बाहेर सुद्धा वागताना दिसतात. एकावेळेस घरातली परिस्थिती त्यांना बोचत नाही, परंतु बाहेर मात्र त्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
या व्यक्तींना आपले मत स्पष्टपणे मांडताच येत नाही. एखादे मत सुद्धा ते अतिशय नाजूक आवाजात मांडत असतात. समोरच्याला ते पटेल का, समोरचा आपलं ऐकून घेईल का वगैरे भावनिक गुंत्यांमध्ये ते पूर्णपणे स्वतःला अडकवून घेतात.
अशा व्यक्तींना कायम इतरांकडून गृहीतच धरले जाते. मी कसा खरा आहे, याबद्दल स्वतःचे पारडे जड करण्यासाठी कायमच अशा व्यक्तींचा वापर केला जातो. सहमती मिळविण्यासाठी अशा व्यक्तींशी गोड बोलून पटकन काम होते.
सारासार विचार करून योग्य रीतीने परिस्थिती हाताळता येत नसल्यामुळे एका व्यक्तीसाठी ही जवळची बनते तर दुसऱ्या व्यक्तीच्या आक्रमकतेला तिला सामोरे जावे लागते.
म्हणजेच एक स्थिर असं मत या व्यक्तींना घेताच येत नाही. कारण त्यामागे विचार असतो, समोरचा माझ्यामुळे दुखावला गेला नाही पाहिजे. इतकं चांगलं वागूनही पदरी काही विशेष आनंद आणि समाधान न पडल्यामुळे त्या प्रचंड नैराश्यात सुद्धा जातात.
पण आपण नैराश्यात जाण्याचं नेमकं काय कारण असावं, याबद्दल त्यांच्या ठिकाणी नेमकेपणा आढळून येत नाही. पुन्हा जर कोणी त्यांच्याशी अगदीने वागलं तर पुन्हा या त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तयारी दर्शवतात.
अशा या मानसिकतेत या व्यक्ती आयुष्यात काहीतरी करू शकतील, असे इतरांना मुळीच वाटत नाही. सतत दुसऱ्यांचा विचार, दुसऱ्यांसाठीच सर्व काही अर्पण करणे यासाठीच आपला जन्म झालेला आहे, असेच त्यांना वाटत असावे.
त्यांचं स्वतःचं असं काही विश्वच नसतं, इतरांची मर्जी सांभाळण्यातच त्यांचं पूर्ण आयुष्य निघून जातं.
अश्या सर्व व्यक्तींना लेखाच्या शेवटी एवढंच सांगावेसे वाटते कि, तुम्ही दुसऱ्यांची मर्जी सांभाळत असताना स्वतःचं नुकसान करून घेताय. तसेच तुमच्या अशा स्वभावामुळे इतरांची मानसिक सुद्धा तशीच बनत जात आहे.
याकडेही तुम्ही लक्ष द्यायला हवं. मर्जी संभाळण्यापेक्षा तुम्ही काही ठराविक जीवन कौशल्ये आत्मसात करायला हवीत. जसं कि स्पष्ट बोलणे, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, समजून घेण्यापेक्षा नीट समजून सांगणे, प्रत्येक वेळेस सहमती न दर्शविणे ई जरी आत्मसात केल्या तरी तुमचा बराचसा अतिरिक्त भाग हा रिकामा होईल.


