समजून घेणारा कोणी हरवला की आपण कोणालाही दुखणे सांगत सुटतो.
मेराज बागवान
दुःख कोणाला नसते? समस्या कोणाला नसतात?अडचणी कोणाला नसतात? म्हणजेच आपल्या सर्वांना अनेक अडी-अडचणी, दुःखे, समस्या ह्या असतातच.एक समस्या सुटली की दुसरी हजर असते.आणि ह्यालाच तर आयुष्य असे नाव आहे. आपण समाजात राहतो.अनेकांशी आपला संबंध येतो.
आपण कधी दुःखात असलो किंवा कधी आपले मन मोकळे करायचे असेल तर आपण आपल्या जवळच्या व्यक्तींकडे बोलतो, मोकळे होतो,त्यांना आपले दुःख सांगतो आणि असे केल्याने दुःख कमी होतेच असे नाही.पण लढण्याची एक नवीन उमेद मिळते.पण कधी कधी होते असे की , ह्या आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने दूर जातात .त्या आपल्याला समजून घेत असतात , म्हणून तर आपण त्यांच्याकडे बोलून मोकळे होतो.पण कोणीच आपल्या आयुष्यात कायम नसते.
कारण काहीही असो, कितीही जवळची व्यक्ती असली तरी ती आपल्यापासून दुरावू शकते.आणि मग आपण आपले दुःख त्या व्यक्तीकडे कधीच सांगू शकत नाही.मग आपली मानसिकता काय होते?
ह्या लेखात नेमके आपण हेच पाहणार आहोत, की , जेव्हा समजून घेणारी व्यक्ती हरवते तेव्हा आपण आपले दुःख कसे हाताळतो.या मध्ये आपली मानसिकता अशी होते की, आपण आपले दुःख कोणालाही सांगत सुटतो.म्हणजेच आपल्याला जी व्यक्ती आपल्या जवळ हवी आहे, ती जवळ असू शकत नाही.मग अशा वेळी काय होते? मन खूप भरून आलेले असते.काय करावे सुचत नाही.मग आपण पटकन कोणाकडे तरी व्यक्त होतो.ती व्यक्ती आपल्या जवळची असेलच असे नाही.फक्त ओळखीची असू शकते.पण तरी देखील आपण तिला आपले सर्व दुःख सांगत बसतो.ती व्यक्ती कित्येकदा त्यावर फारसा प्रतिसाद देखील देत नाही.मग आपले मन पुन्हा निराशेत जाते आणि पुन्हा दुसरी व्यक्ती शोधत फिरते.
आणखीन कोणी व्यक्ती भेटली की पुन्हा तेच चक्र चालू होते. मग आपण त्या नवीन व्यक्तीला भूतकाळात आपल्याला झालेला त्रास, आपली दुःखे किंवा सध्या चालू असलेल्या समस्या सांगत राहतो.आता समजून घेणारा निघून गेला आणि आता मी हे दुःख माझ्यापाशीच ठेवून काय करू? असा विचार करून, आपण तिसऱ्या व्यक्तीकडे आपले दुःख मांडतो. ह्या मानसिकतेमागे आपला काही दृष्टिकोन असू शकतो.तो म्हणजे, अरे कोणीतरी माझे ऐका, मला खूप काही सांगायचे आहे.किमान तुम्ही तरी माझ्याबरीबर राहा.पण ही झाली आपली मानसीकता. आपण कितीही दुःखात बुडालेले असलो तरी समोरची व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत असेलच असे नाही.ती आपल्या भावना समजून घेणारी असेलच असे नाही.अगदीच स्पष्ट सांगायचे तर,त्या व्यक्तीला आपल्या दुःखाद्दल , आपल्याबद्दल कोणत्याच प्रकारचा रस नसू शकतो.पण आपल्या हे लक्षातच येत नाही.आणि आपण फक्त दुःख सांगत सुटतो.
ह्या मानसिकतेमागे आणखीन एक कारण असू शकते.ते म्हणजे, ‘एकटेपणा’.जी व्यक्ती आपल्याला इतके दिवस समजून घेत होती तीच जर का आज हरवली तर एकटेपणा जाणवणे साहजिकच आहे.मग हाच एकटेपणा कुठेतरी दूर करण्यासाठी ,आपला दिसेल त्याला आपले दुःख सांगण्याचा खटाटोप सुरू होतो.
सगळयांना दुःख सांगत बसले की कुठेतरी ते कमी होईल किंवा सर्व ठीक होईल, किंबहुना मनासारखे होईल ह्या वेड्या आशेने मन धावत असते.मग ह्या सर्व भेटणाऱ्या व्यक्ती ‘आपल्या’ आहेत की ‘परक्या’ आहेत याचा विचार देखील मनात येत नाही.आणि ह्याला कारण असते , ते म्हणजे, भावनांवर नियंत्रण नसणे आणि नेहमी एकाच व्यक्तीत स्वतःला अडकवून ठेवणे.
ही मानसिकता चुकीची नाही.पण साहजिक आहे.मात्र वेळीच ती नियंत्रित करता आली पाहिजे.भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे.’कोणीच आपल्यासोबत कायम नसते’ हे वास्तव खऱ्या अर्थाने स्वीकारता आले पाहिजे.आजचे जग खूप भयंकर आहे.कोण आपल्या दुःखाचा काय अर्थ लावेल आणि त्याचा कसा वापर करून घेईल हे सांगता येत नाही.आपण एकच करू शकतो, ते म्हणजे , ‘कोणी जरी सोबत नसले तरी स्वतःवर विश्वास ठेवून, कणखर बनून , न घाबरता दुःखावर , परिस्थितीवर मात करणे’.आणि स्वतःच्याच सहवासात आनंदी, समाधानी रहायला शिकणे.स्वतःचा सहवास ‘एन्जॉय’करणे.
माणूस म्हटले की भावना ह्या आल्याच.पण ह्याच भावना कोणाकडे व्यक्त कराव्यात, किती प्रमाणात कराव्यात हे वेळीच समजले पाहिजे.नाहीतर समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी काहीच देणे-घेणे नसेल , तुमच्याविषयी काहीच आपुलकी नसेल, तर मग तुम्ही त्या व्यक्तिपूढे किती जरी रडलात तरी काहीच उपयोग होणार नाही.फक्त तुमचा वेळ नाहक जाईल.
म्हणूनच कोणी नाही म्हणून मी स्वतः माझे दुःख समजून घेऊ शकत नाही ,हा विचार आपण सर्व प्रथम डोक्यातून काढून टाकला पाहिजे.कोणी जरी नसले तरी मी स्वतः दुःखावर यशस्वीपणे मात करू शकतो/शकते हा विश्वास मनात बाळगून ठेवला पाहिजे.
दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येते.पण फरक इतकाच असतो की , कोण त्याला कसा प्रतिसाद देतो.आणि स्वतःची मानसिकता कशी ठेवतो.
खंबीर रहा.पण काळजी देखील घ्या!!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Very Nice
सर्व काही अगदी खरं आहे
अति सुंदर विचार मांडले आहे़त.
Very true
Khup chan ani ekdum barber ahe maja babatit sadhya hech ghadat ahe
Carret thought