जैसी संगत वैसी रंगत.
श्री. लालचंद कुंवर
(शिक्षक)
“तुम्ही तुमच्या जवळचे पाच मित्रांची नावे सांगा, त्यावरून आम्ही तुमचा अर्थिकस्तर अणि स्वभाव अर्थात तुम्ही कसे आहात, ते अगदी perfect सांगू.” किती मार्मिक सत्य आहे वरच्या विधानात.
खरंच आपली ओळख , आपल्या संगतीतुनच होत असते का ?
हो , नक्कीच … ! शेवटी जैसी संगत वैसी रंगत.
कारण याच्या पाठीमागे एक मनोवैज्ञानिक सत्य दडलेल आहे. जशा वलयात आपण राहतो , उठतो बसतो , त्या विचारांच्या अणि वर्तनाच्या तरंग लहरी आपल्या अंतर्मनात निर्माण होत असतात. त्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचतात मग तसेच विचार करायला आपण लागतो. अणि वर्तनात ही तेच घडून येत असतं.
मग ज्या विचारांच input आपण आपल्या मनाला देत असतो तेच output आपल्या आचरणातून समाजात दिसून येत असतं.
आता रामलाल , श्यामलाल आणि हरिलाल या तीन व्यक्तींची उदाहरणे आपण पाहू या . ते प्रसंग , त्या घटना नक्कीच आपल्याला विचार करायला भाग पाडतील.
रामलाल, एक सरळ साधा व्यक्ती. फक्त कधीतरी कामाचा क्षीण घालवण्यासाठी व्यसन करायचा. पण काही वर्षानंतर त्याचं लक्षात आलं की आपण पूर्णपणे या व्यसनाच्या आहारी गेलो आहोत. इच्छा असूनही आत्ता हे व्यसन रामलालला सोडता येत नव्हतं. असे कितीतरी रामलाल आज आपल्या अवतीभवती आहेत.
अशा घटनेमध्ये नेमकं होतं काय ? तर…
एखाद्या व्यक्तीला एखादं व्यसन जडल असेल, आणि त्या व्यसनातून ती व्यक्ती बाहेर पडण्याऐवजी कालांतराने त्यांचं सवयीत रूपांतर होत असेल तर नक्कीच व्यसनाधीन संगतीच्या चक्रव्यूहात ती व्यक्ती अडकलेली आहे. सुरुवात अगदी थेंबाने झाली असेल , पण थेंब थेंब तळे साचे या उक्तीप्रमाणे , त्याचं नंतर Addiction मध्ये रूपांतर झालं.
म्हणतात ना, ” ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला.”
श्यामलाल, कॉलेज जीवनात अगदी दिसायला चॉकलेट हिरोच. सिक्स पॅक वगैरे नाही पण फिट ॲण्ड फाइन तर नक्कीच होता . पण आता जर श्यामलाल कडे पाहिलं तर पोटाचा तंबोरा झालेला , जिने चढतानाही चांगलीच धाप लागते. अर्थात ढेर सुटलेली आहे, वजन वाढलेल आहे, एक प्रकारे बेढब शरीर घेऊन श्यामलाल जगतोय . सतत BMI चा ratio रेड सिग्नल दाखवतोय .
निसर्गाने दिलेल एवढं सुंदर शरीर……. !
काय तो तारुण्यातला फिटनेस !
पण आता चाळीशीत …. !
शरीराची अशी अवस्था का झाली असेल बरं ?
एकदा श्यामलालने आपल्या फ्रेंड सर्कल कडे डोळे उघडून पाहीले…. !
तर काय दिसलं असेल बरं ? अगदी बरोबर. श्यामलालच्या फ्रेंड सर्कल मध्ये जवळपास सगळे असेच आहेत. आडवेतिडवे वाढलेले, ढेर सुटलेले, sedentary lifestyle च्या आहारी गेलेले. त्यामुळे श्यामलालला आपल्या बेढप शरीराची जाणीवच होत नव्हती.
आता हरीलाल ची कहाणी तर या दोघांपेक्षा वेगळीच. हरिलालला चांगल्या पगाराची नोकरी, छोटसं खाऊन पिऊन सुखी चौकोनी कुटुंब. पण घरात सुख , शांती आणि समाधानाच्या नावाने कायम शिमगा. लहान सहान कारणांवरून सारख्याच कुरबुरी आणि तक्रारी. त्यात उपास-तापास व नव-नवस सारखे चालूच .
एवढं करूनही घरात शांतता नाही. कर्मा पेक्षा दैवावर भरोसा..!
पाठी मागं वळून पाहिलं तर हरिलालच्या समस्येचे मूळ होतं त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये. हरिलाल तसा अभ्यासात चुणचुणीत पण एकुलता एक असल्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे आई-वडिलांनी जपलं. अगदी त्याच संगोपन बोंसायच्या झाडाप्रमाणे केलं गेलं. आत्मविश्वास नसलेला, त्यात निर्णयक्षमतेचा अभाव , अशी अवस्था हरीलालची.
वरील तीनही उदाहरणं पाहिलीत.
तर एक लक्षात येतं , कुठेतरी आपल्या वागण्यावर, जगण्यावर अणि बोलण्यावर घरातील आणि त्याच बरोबर सभोवतालच्या परिसरातील वातावरणाचा परिणाम झालेला दिसून येतो आणि ज्यांच्या सहवासात आपण राहत असतो, त्या संगतीचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर घडून येत असतो. किंबहुना आपली जडणघडण मुळात त्याच पद्धतीने होत असते.
लहानपणापासूनच आपण एक सडक्या कांद्याची व सडक्या आंब्याची गोष्ट ऐकत आलेलो आहोत. त्या गोष्टीचं तात्पर्य आचरणात नाही आणलं तर………………. !
तर मग आहेच…. जैसी संगत वैसी रंगत.
समाप्त
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


