Skip to content

सतत होऊन गेलेल्या गोष्टींची आठवण येऊ नये , यासाठी हे करून पहा…

सतत होऊन गेलेल्या गोष्टींची आठवण येऊ नये , यासाठी हे करून पहा…


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आठवणींचा पसारा कितीही असला तरी तो आवरावासा वाटत नाही… कधीकधी..!! आपलं आयुष्य म्हणजे विविध घटनांच एक अध्यायच आहे.क्षणाक्षणाला एकामागोमाग एक अशा घटना या आयुष्यात घडत असतात. या घटना जेव्हा घडून जातात तेव्हा त्या घटना काही आठवणी मागे सोडून जातात आणि अशा याच आठवणींचा आपल्या आयुष्यात पसारा होतो.हा पसारा आवरेनासा होतो तर कधीकधी हा पसारा आवरावासाही वाटत नाही.

काही आठवणी या हव्याहव्याशा वाटतात तर काही आठवणी या नकोनकोशा वाटतात आणि तरीही त्या आठवतातच.त्यांच्यापासून स्वतःला दूर लोटणं आपल्याला जमतच नाही. सतत अशा घडून गेलेल्या गोष्टींमध्ये आपण गुंतलेले असतो.सतत त्या गोष्टींची आपल्याला आठवण येत राहते. आणि मग त्या गोष्टी आठवतात नी त्रास होतो.आतल्या आत रडायला येतं पण काही केल्या त्या आठवणी पाठलाग करणं सोडत नाहीत. होऊन गेलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत राहतात. मग वाटतं का आठवतय हे सगळं…?

मला विस्मरण तरी व्हायला हवं म्हणजे हे काही आठवणारच नाही. आणि लक्षही विचलित होणार नाही.असं बरच काही वाटत रहातं…पण नेमकं खरच काय करावं ते मात्र समजत नाही. आपण या आठवणींपासून लांब रहाण्याचे कितीतरी मार्ग शोधत असतो पण काही केल्या ते सापडत नाहीत. आणि सापडले तरी ते ‘impliment’ करणं आपल्याला अवघड जातं.

तर मग अशाच काही गोष्टींची सतत आठवण येऊ नये म्हणून आपण काही गोष्टी करून पाहुयात———

*ज्या ठिकाणी मन शांत आणि ताजतवानं राहील अशा ठिकाणी काही वेळासाठी तरी एक फेरफटका मारणे.

*कुणाला गाण्याचा छंद असतो तर कुणाला नाचण्याचा…मग असे विविध प्रकारचे छंद प्रत्येकाला असतात.याच वेगवेगळ्या प्रकारच्या छंदांमध्ये आपलं मन गुंतवून ठेवलं तर मन इकडे तिकडे भरकटणार नाही. ते एका ठिकाणी स्थिर राहण्यास या छंदांची नक्कीच मदत होईल.

*ज्या गोष्टी ज्या ठिकाणी घडल्यात , किंवा ज्या गोष्टी त्यात ‘involved’ होत्या अशा सगळ्या गोष्टींपासून काही काळासाठी तरी लांब रहा जेणेकरुन सतत त्याच गोष्टी समोर येऊन त्याचा त्रास कमी होईल.

*Rock songs लावून एकदा बेभान ठेका धरून बघा…सगळ्या आठवणींचा कसा क्षणभर तरी विसर पडेल आणि तुम्ही कसं अगदी रिफ्रेश होऊन तुमच्या इतर कामाला लागाल.

*इतकच नाही तर जी गोष्ट करायला मनापासून आवडते ती गोष्ट करण्याला नक्की प्राधान्य द्या. इतर गोष्टींपेक्षा मनापासून आवडणाऱ्या गोष्टींमध्ये आपलं मन जास्त चांगल्या प्रकारे रममाण होतं.

*त्या घडून गेलेल्या गोष्टी जर सतत आठवत असतील आणि तुम्ही त्या गोष्टी सारख सारख अगदी बुद्धी नी मनावर ताण येईपर्यंत विसरायचा प्रयत्न मुळीच करू नका.कारण त्याने गोष्टी विसरल्या जाणार नाहीत तर स्वतःला अजून त्रास होईल.आपण हे हे विसरूच शकत नाही असा विचार मनाला केव्हा पोखरून काढेल कळणारही नाही.

*भूतकाळात रमण्यापेक्षा , त्याच भूतकाळावर भविष्य ठरवण्यापेक्षा समोर असणाऱ्या वर्तमानात जगायला शिका.वर्तमान स्विकारा.त्याने गोष्टी अधिकाधिक सोप्या होतील.

*अतिविचार करणं वेळीच सोडून द्या. कारण गोष्टी घडून गेल्यात आणि त्याच गोष्टी आठवतायेत म्हणून त्याचा अतिविचार करू नका.अतिविचाराने ते आठवणं थांबत नाही तर ते अधिकाधिक आठवत रहातं.

*शक्य तितका वेळ कुठे ना कुठे चांगल्या कामासाठी ‘invest’ करा.म्हणजे मोकळ्या वेळात तुम्हाला पुन्हा त्या गोष्टी आठवणार नाहीत.आणि वेळ कुठेतरी सत्कारणी लागतोय याचही एक वेगळच समाधान तुमच्याकडे असेल.

*योग , प्राणायम , मोकळ्या हवेवर फिरणे , आवडत्या व्यक्तींशी संवाद साधणे यांसारख्या गोष्टी करण्याला प्राधान्य द्या.

*सतत आठवणाऱ्या गोष्टी आपोआप व्यक्त होत असतील तर त्यांना व्यक्त होऊद्या , किंवा तुम्हाला त्या गोष्टी व्यक्त करायच्या असतील तर व्यक्त करा म्हणजे तुमच्या मनावरच ते टांगतं ओझं थोडफार तरी हलकं होईल.

खरं सांगायचं तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केल्याने त्या घडून गेलेल्या गोष्टी सतत आठवणार नाहीत. पण हेही तितकच खरं की , कोणाच्या गोष्टी कुठे किंवा कशाशी ‘connect’ असतील हे सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांना ह्या गोष्टी जमणं तसं थोडं अवघडच…पण अशक्य नाही…! त्यामुळे इतकच की , जिथे मन रमतय , जे आवडतय , जिथे मन प्रफुल्लित , उत्साही , सकारात्मक राहतय त्या गोष्टी करण्याला जास्तीत जास्त प्राधान्य द्या. आयुष्य थोडं ‘easy’ व्हायला नवीन मार्ग मोकळे होतील.

आठवणी विसरता येत नाहीत असं म्हणून त्यात गुंतून राहू नका…..पेपर लिहतोय , तोंडी परिक्षा देतोय ,या या प्रश्नाच उत्तर येत नाही…कदाचित विसरलो वाटतं…..असं समजून त्या प्रसंगांना विसरायला शिका.आयुष्य सुंदर आहे…… थोडं जगून तर पाहूया……कधी कधी थोडं विसरूनही पाहूयात..!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सतत होऊन गेलेल्या गोष्टींची आठवण येऊ नये , यासाठी हे करून पहा…”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!