Skip to content

सतत सोसण्याची सवय झाली की हसण्याचं किंबहुना रडण्याचं प्रमाण कमी होत.

सतत सोसण्याची सवय झाली की हसण्याचं किंबहुना रडण्याचं प्रमाण कमी होत.


गीतांजली जगदाळे


जीवन म्हणल की, सुख-दुःख ही आलीच आली. आणि दुःख म्हणजे सहन करणे, सोसणे. सुख उपभोगणं अवघड जात नाही पण तेवढ्याच प्रमाणात आलेलं दुःख मात्र सहन करता करता नाकी नऊ येतात आपल्या. बरीच दुःख ही आपण स्वतः आपल्या कर्माने ओढून घेतलेली असतात, तर काही नशिबी लिहलेली असतात, तर काही प्रकारचे त्रास हे सभोवतालच्या माणसांकडून आपल्याला होणारे असतात.

कारणं काही का असेनात, पण ते सगळं सोसावं च लागत. पण ते दुःख, तो त्रास सहन करण्याची, सोसण्याची सवय झाल्याने असं होत का, की आता नाही बाबा एवढा त्रास होत, सवयीने त्रास सुद्धा कमी झालाय आता त्या गोष्टीचा..? काही लोकांबाबतीत याच उत्तर ‘हो’ ही असू शकत आणि ‘नाही’ ही.

खरं तर त्रास कमी होत नसतो पण सवय झाल्याने तो नेहमीचा आयुष्याचा भाग बनून जातो, नवीन असताना जसा त्याचा उल्लेख व्हायचा तसा होणं बंद होतो. माणसाच्या मनावर त्याच्या लहानपणापासून प्रत्येक गोष्टीचा परिणाम होत असतो. त्याच प्रमाणे, सतत सोसत राहिल्याने ही त्याचा स्वभाव, विचारयंत्रणा इत्यादी बऱ्याच गोष्टींवर परिणाम होत असतो.

पण सतत च्या आघातांनी माणूस लहान असताना जसा निखळ आनंदाचा आनंद घ्यायचा आणि त्रास झाल्यावर रडायचा ते न होता त्या आनंद उपभोगण्यात आणि दुःख करत बसण्यात ही खूप फरक होतो. सुख आलं तरी आधीसारखा, त्याच मोकळ्या मनाने हसण होत नाही की दुःख आलय म्हणून तेवढ्या प्रमाणात आक्रोश ही होत नाही.

हे खरंच कमी झालेलं असत असं नाही पण हळू हळू माणसाचं त्यावर प्रतिक्रिया देणं किंवा व्यक्त होणं कमी होत जात. त्याची सहनशीलता वाढते की आणखी काही होत ते त्याच त्यालाच माहित असत. कोणत्याही नवीन गोष्टीच जस माणसाला कौतुक असत न तीच जुनी झाल्यावर बऱ्याचदा लक्ष देखील तिकडे जात नाही, तसेच कदाचित सुख आणि दुःखाच्या बाबतीत होत असावं. आणि त्याचा जेवढा प्रभाव पडायला हवा तेवढा पडत नाही.

सतत च्या सोसत राहण्याने हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण यासाठी कमी होत, कारणं आपण सोसतो म्हणजे ती गोष्ट सोसून संपवत नसतो, तर ती कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात नेहमी जिवंत असते, त्याने मन नेहमी जड च राहत. पण आनंदाचे क्षण आपण हसून, खेळून मजा करून एका पॉईंट ला विसरून सुद्धा जातो.

सगळेच चांगले क्षण विसरून जातो असं नसत पण जर मी तुम्हाला असं म्हणाले की तुमच्या आयुष्यातले चांगले, आनंदाचे क्षण आणि वाईट, दुःखाचे क्षण असं दोन वेगळ्या पानांवर लिहून काढा. तर मी खात्रीने सांगू शकते की एक तर आपल्याला वाईट किंवा दुःखाचे दिवस आठवायला फार वेळ लागणार नाही पण सुखाचे काही दिवस लगेच आठवतील ही, पण बाकीचे आठवायला डोक्याला ताण द्यावा लागेल आणि इतकं करून ही सुखाची लिस्ट छोटी आणि दुःखाची लिस्ट मोठीच निघेल.

याचा अर्थ असा नाही की सुखापेक्षा दुःख आपल्याला जास्त मिळालं, मिळालं तर दोन्हीपण एकसारखच होत, पण साठवून मात्र आपण फक्त दुःखालाच ठेवलं. आणि त्याच दुःखाने आपलं मन इतकं जड झालेलं आहे की सुखाच्या क्षणी निखळपणे हसणं, त्याचा आनंद घेणं आणि दुःखाच्या क्षणी एकदाचं रडून किंवा जे तुम्ही ते व्यक्त करण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी, मोकळं होण्यासाठी करता ते करणं, हे होतच नाही आपल्याकडून.

त्यापेक्षा आपण असं केलं तर म्हणजे सुख ही मनसोक्त अनुभवुया आणि दुःख सुद्धा स्वीकारून त्यावर मात करूया. सोसून अंतःकरण जड करून ठेवण्याला काहीच अर्थ नाही.

सहन करून एखादी गोष्ट संपत असेल तर नक्कीच ते करावं पण आपण काय सोसतोय ते खरंच गरजेचं आहे का? ते आपण कोणामुळे सोसतोय, त्याच कारणं काय? आणि चुकीच्या माणसामुळे सोसत असू तर ते थांबवणं गरजेचं आहे या सगळ्या बाबी लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे.

जिथे आपल्या कर्मामुळे किंवा ज्याला आपण नशीब म्हणतो त्यामुळे काही सोसावं लागत असेल तर ते भोग भोगुनच कदाचित संपवावे लागतील. पण दर वेळी याच कारणांनी सोसावं लागत अस नसत त्यामुळे जिथे आपली चूक नसताना ही हे सहन करावं लागत असेल तिथे नक्की आवाज उठवायला हवा..!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!