Skip to content

” सतत सुविचार पाठवणाऱ्यांनो तो आधी आपल्या विचारांत असू द्या. “

” सतत सुविचार पाठवणाऱ्यांनो तो आधी आपल्या विचारांत असू द्या. “


मधुश्री देशपांडे गानू


“लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण.”

ही म्हण तर सर्वांना ठाऊक असेलच. लोकांना सतत उपदेशाचे डोस पाजायचे पण स्वतः मात्र त्यातला एकही अंगीकार करायचा नाही. एकूणच समाजात असे “बोलबच्चन” खूप दिसतात. अनाहूत सल्ला देणारे, आगाऊ मत मांडणारे, शहाणपण शिकवणारे खूप असतात आजूबाजूला. त्यातले किती जण खरंच स्वतः तसे वागतात??

आता सोशल मीडिया तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी डोळे उघडल्याबरोबर आपण आपला फोन हातात घेतो. मग सुरु होतो सुप्रभात, गुड मॉर्निंग आणि त्याचबरोबर सुविचारांचा भडिमार…. आपल्या जवळच्या मोजक्या सुहृदांना सुप्रभात पाठवणे काहीच वाईट नाही. त्यातही नुसते सुप्रभात असावे. उगाच सुविचारांचा सुळसुळाट नसावा. रेडीमेड सगळेच उपलब्ध आहे की आता! त्यामुळे एका बोटावर काहीही कुठेही फॉरवर्ड करता येतं.

पण त्यातले किती सुविचार खरंच मनापासून वाचले तरी जातात??? सकाळच्या घाईगडबडीत वेळ तरी असतो का? सुविचार चांगलेच असतात. त्यातून शिकण्यासारखे असतं. पण सतत सुविचारांचा भडीमार नको वाटतो. आणि तोही तसं न वागणाऱ्या लोकांकडून तर नाहीच नाही.

अगदी प्रेमाचे, मैत्रीचे गोडवे गाणारे सुविचार सतत पाठवले जातात. पण जे मैत्रीचे सुविचार पाठवतात तेच कधी मैत्री निभावत नाहीत. नुसते “इधर का माल  उधर…  उधर का माल इधर” अशी अवस्था असते. यांच्या वागण्या-बोलण्यात ती मैत्रीची आपुलकी, ओढ, सातत्य कधीच आढळून येत नाही. फाॅरवर्ड चा बाजार भरलेला आहे नुसता! स्वतः दोन ओळीही लिहू न शकणारे दुसऱ्याचं उत्तम लिखाण स्वतःच्या नावावरही खपवतात.

सतत सुविचार पाठवणाऱ्यांनो तो आधी आपल्या विचारांत असू द्या.. एवढंच नाही तर तो तुमच्या कृतीत असायला हवा. अनेक वर्षांचे नातेसंबंध, मैत्रीचे संबंध एखाद्या क्षुल्लक कारणावरून मोडीत काढणारे अनुभवास येतातच की!

अजून एक उदाहरण याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. सोशल मीडियावर आपण व्हर्च्युअल जगात वावरत असतो. खूप कमी जणांना आपण वैयक्तिक ओळखत असतो. आपले मित्र-मैत्रिणी आणि नातलग एवढेच वैयक्तिक ओळखत असतो. आपली फ्रेंड लिस्ट मात्र भलीमोठी असते.

अशावेळी एखादी व्यक्ती रोज कशा प्रकारचे मेसेज पाठवते यावरून त्या व्यक्तीची व्हर्च्युअल आवड आपल्या लक्षात येत असेलही, पण आपण त्या व्यक्तीला अजिबातच ओळखत नसतो. प्रत्यक्ष ती व्यक्ती कशी आहे याची आपल्याला पुसटशीही कल्पना नसते. एका समूहात एक व्यक्ती रोज मैत्रीपूर्ण सुविचार, अध्यात्मविषयक लेखन पोस्ट करायची. त्या व्यक्तीची ओळख माननीय, आदरणीय, अध्यात्मिक व्यक्ती अशी झाली.

पण एका स्त्री सभासदाला त्याच व्यक्तीचा प्रत्यक्ष पराकोटीचा वाईट वैयक्तिक अनुभव आला. आणि जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा सगळ्याच सभासदांना सखेद आश्चर्य वाटलं. असे अनुभव येतात. एखाद्या फेसबुक, व्हाॅट्सअप समूहामध्ये एखादा गोड बोलणारा पुरुष सगळ्या स्त्री सदस्यांशी छान मैत्री असलेला असतो. खूप मदतीचा आव आणणारी, आपण खूप चांगले आहोत असे भासवणारी. पण स्त्रियांचा त्या व्यक्ती बाबतचा वैयक्तिक अनुभव वाईटच असतो. पण सांगणार कोणाला???

प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मी नुकतेच समुपदेशन प्रशिक्षण पूर्ण केले. ते प्रत्येक सेशनला आम्हांल आवर्जून सांगायचे की, ” तुम्हीं लोकांना समुपदेशन करण्याआधी हे तुम्ही स्वतःच्या अंगी बाणवलं पाहिजे. हा सगळा बदल तुमच्या मध्ये आधी घडायला हवा. तरच तुम्ही दुसऱ्यांना ठामपणे सांगू शकता. मला माझे विद्यार्थी असेच हवेत. ” हा त्यांचा आग्रह असायचा.

सुविचार पाठवणारे वाईटच असा या लेखाचा उद्देश नाही. आजच्या धावपळीच्या जगात काही ठराविक आपली माणसं आपल्याला आठवणीने सुप्रभात, सुविचार पाठवतात. मीही पाठवते. त्यांना आपली आठवण आहे हे कौतुकास्पदच आहे. पण काहीही फॉरवर्ड करताना आपण तसे वागतो का? हा विचार करायला हवा.

आंधळेपणाने मेसेज इकडून तिकडे फिरवू नये. खरंतर प्रत्येक व्यक्ती ही गुणदोषांसहित असते. आपली प्रेमाची माणसं, मित्र-मैत्रिणी आहे तशीच स्वीकारायला हवी. सतत सुविचारांचा भडिमर नकोच. स्वतःमध्ये जे छोटे-छोटे सकारात्मक बदल तुम्ही करता त्याने तुमच्या जवळच्या माणसांना नक्कीच प्रेरणा मिळेल. त्यामुळे आधी करा आणि मग सांगा…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “” सतत सुविचार पाठवणाऱ्यांनो तो आधी आपल्या विचारांत असू द्या. “”

  1. हा लेखअतिशय सुंदर तीन वास्तववादी आहे चमकणाऱ्यांसाठी एक प्रकारची चपराक.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!