सतत सहानुभूती मिळवून आयुष्य जगता येत नाही…
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
सहानुभूती…..हा शब्द इथे असणाऱ्या कुणालाही नवीन नसावा.रोजच हा शब्द आपण वापरत असतो. आपण खूपदा बोलतो…की तिने हे सगळं सगळ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलं.त्याला काय सहानुभूती मिळाली नं…बस् झालं मग.किंवा मग असही ऐकतो/बोलतो की…मला कुणाचीही सहानुभूती नकोय.मला तुमच्या सहानुभूतीची काही एक गरज नाही. वगैरे वगैरे…!!
खरचं , आपल्या आयुष्यात आपल्याला या सहानुभूतीची गरज असते का हो….?? आणि असेल तर कशासाठी….??सहानुभूतीशिवाय आपण आयुष्य जगू शकत नाही का….??सहानुभूती आपल्याला वेटोळा घालून तर बसत नाहीये न…??आपण काय कायम सहानुभूतीला आपल्यासोबतच मिरवणार आहोत का…???
हे असलं काही तुमच्या मनात कधीतरी घोळत रहातं का….???की सतत सहानुभूती मिळवून आयुष्य जगायचं ठरलं आहे…??नक्की काय…??कधीतरी या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न नक्की करा.नाहीतर सतत सहानुभूतीभोवती पिंगा घालावा लागेल. इच्छा नसतानाही….!!
आणि….. मला सांगा , किती दिवस असं सहानुभूती मिळवून आयुष्य जगायचं…??मुळात सतत एखाद्याची सहानुभूती घेऊन आयुष्य जगणं म्हणजे जगणं नसतं ते.’बुडत्याला काठीचा आधार…’ मान्य आहे कधी कधी हीच सहानुभूती बुडणाऱ्याला आधार देते.बुडण्यापासून वाचवते. पण असं किती दिवस चालणार…..??
आयुष्यभर असं सहानुभूतीसोबत जगता येत नाही. आणि अशी सहानुभूती घेऊन कुणी आयुष्य जगूही नये.सहानुभूती जशी आधार देते तशीच ती सततची सहानुभूती सहानुभूतीशिवाय कसं जगायचं हेच विसरायला लावते.
सहानुभूती ही एक भावनिक अवस्था आहे.कुणाच्या आयुष्यात काही घडल तर आपण बोलत असतो की असं घडल तिच्या बाबतीत.असं व्हायला नको होतं.आणि तिची काही चूक नव्हती तशी. वगैरे वगैरे गोष्टी घडताना आपण पाहतो.थोडक्यात काय..तर एखाद्याच्या दुःखाने आपण सहज द्रवतो.आणि अचानक करूणेचे , कळकळीचे चार शब्द आपसूकच तोंडातून बाहेर पडतात.खूप काही काही वाटत असतं आपल्याला अशा लोकांबद्दल.
ईतकच नाही तर दुःखातच नाही तर कुणाच्या सुखातही आपण सहानुभूती दाखवत असतो.कौतूक वेगळ नी सहानुभूती वेगळी. चांगल झालं चला.उशीरा का होईना पण खूप चांगल झालं.हे आपल्या कानांना काही नवीन नाही.
पण मग एक गोष्ट स्पष्ट जाणवते….आणि तुम्हालाही कदाचित ती जाणवत असेल. आता हे आपलं आयुष्य आहे. आणि या आयुष्यात चढ उतार हे येतच राहतात. सुखं दुःखं येतात आणि जातातही. पण सहानुभूती…..तिचं काय…??ति जात नाही सहजासहजी. कारण काही अगदीच खरीखुरी माणसं सोडली तर इतर काही जण आपण कधी सहानुभूती दाखवतोय आणि आपल्या सहानुभूतीने आपल्याला केव्हा सहानुभूती मिळेल याचीच वाट बघत असतात.मी असं म्हणत नाही की गोष्टी ‘share’ करू नका वगैरे.
पण इतकच की काही जणांना सवयच लागलेली असते आपल्या दुःखाचा नी सुखाचा बाजार मांडण्याची.आणि त्यातून सहानुभूती मिळवण्याची.पण एक लक्षात ठेवा असं सतत सहानुभूती मिळवून आयुष्य जगता येत नाही.
इथे बऱ्याच जणांना वाटत असतं की आपल्याला सहानुभूती मिळावी , आणि कित्येकांना त्या सहानुभूतीचा तर अंशसुद्धा नको वाटतो.
सततच्या सहानुभूतीमुळे माणूस… किंवा सहानुभूती देणारा आणि घेणारा…दोघही सहानुभूतीच्या सवयीचे केव्हा गुलाम बनतात काही कळतही नाही. आणि इतकच नाही तर एकदा दोनदा ठिक असतं.पण सततच्या सहानुभूतीमुळे समोरचा माणूस दुबळा व्हायला वेळ लागत नाही. आणि सहानुभूती देणारा माणूस अहंकारी बनायलाही वेळ लागत नाही.
कारण सतत सहानुभूती देताना नेहमीच त्याच्यामागे शुद्धता असेल असं नाही. कधी काही गोष्टी साध्य करण्यासाठी सुद्धा लोकं या सहानुभूतीची अक्षरशः देवाणघेवाण करायलाही मागे पुढे बघत नाहीत.आणि अशी सहानुभूती काही कामाची नाही. ही सहानुभूती उराशी बाळगून आयुष्य ‘जगता’ येत नाही. ते एका अवघड जागेच दुखणं केव्हा होऊन बसतं तेही कळत नाही. सहानुभूतीला काही मर्यादा असाव्यात.
नाहीतर ज्या सहानुभूतीमुळे क्षणिक आधार वाटतो त्याच सहानुभूतीमुळे केव्हा मानसिक त्रास जडतो हे लक्षातही येत नाही. नंतर सगळं असह्य झाल्यावर मात्र सहसा कुणीही सहानुभूती दाखवायला येत नाही.आणि सहानुभूती द्यायची असेल तर द्या..घ्यायची असेल तर घ्या.. पण एका ठराविक मर्यादेपर्यंतच….!! एकदा का अतिरेक झाला तर अवघड असतं.त्यामुळे सततची सहानुभूती ही काही चांगली नाही. आणि ति मिळवून आयुष्य खऱ्या अर्थाने जगता येत नाही.
म्हणून म्हणते की… , सहानुभूतीच्या पंखाशिवाय स्वतः उडायला शिका….आणि दुसऱ्यालाही त्या पंखाशिवाय उडायला शिकवा…..!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Right.👌👌👌 👍😊