Skip to content

सतत रडायला येणं हे एका अस्थिर मानसिकतेचं लक्षण आहे.

सतत रडायला येणं हे एका अस्थिर मानसिकतेचं लक्षण आहे.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


२०२० हे वर्ष जवळपास सगळ्यांसाठी रडण्याचं एक कारणच बनून गेलं होतं. कोणी जवळची माणसं गमावली तर, कोणी स्वतःची नौकरी, तर बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स मुळे रडण्याची वेळ आली. पण अशा प्रॉब्लेम्स मुळे रडणं किंवा सिरीयस गोष्टींमुळे रडू येणं हे नैसर्गिक आहे. पण सतत रडणे, एवढ्या-तेवढ्या गोष्टींवरून रडायला येणं हे काही चांगलं नाही, आणि नैसर्गिक ही नाही. रडण्याने आपण कमजोर आहोत असं नक्कीच सिद्ध होतं नाही.

कारण रडणं म्हणजे एकप्रकारे व्यक्त होणे असत, आणि भावना व्यक्त करणं ही कमजोरी नसून ताकदच आहे. पण सतत रडण्याची सवय त्रासदायक आहे. याचा अर्थ असा होतो की खूप छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्यावर खूप खोलवर परिणाम करतात. आणि तुम्हाला अगदी सहजरित्या दुखावू शकतात. आणि साध्या-साध्या गोष्टींने आपण दुखावले जात असू तर आपण मानसिकरीत्या स्थिर नाही आहोत, असा त्याचा अर्थ होतो.

रडण्याने मन हलकं होतं असत, आणि जी माणसं कधीच रडत नाहीत, आणि गोष्टी मनात दाबून ठेवतात त्यांना मानसिकरित्या या गोष्टीचा खूप त्रास होतं असतो. त्यामुळे रडून मोकळं होणं हे कधीही चांगलं. पण आपण प्रत्येक गोष्टीसाठी रडतोय का ? प्रत्येक छोट्या गोष्टीचा इशू करून स्वतःला त्रास करून घेतोय का, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. आणि जी लोक अजिबात रडत नाहीत, मग ते पुरुष असो वा स्त्रिया , त्यांनीदेखील जवळच्या माणसांकडे मन मोकळं करायला शिकायला हवं.

पुरुषांनी रडू नये किंवा ते रडल्यास त्यांना जे ‘काय बायकांसारखं मुळूमुळू रडतोय ‘, असं बोललं जात ते बोलणं चुकीचं आहे. जो माणूस आहे, मग त्याच लिंग कोणतं का असेना त्या प्रत्येक माणसाला रडायला येणं हे नैसर्गिक आहे. पुरुषांनी रडू नये किंवा रडल्यास ते कमजोर आहेत असा नियम कुठेही लिहिलेला नाही.

मानसशास्त्रात ‘Neuroticism’ म्हणजे नकारात्मक भावना जसे की, राग, अति चिंता करण्याची सवय, आत्मविश्वासाची कमी, इमोशनल अस्थैर्य अशा गोष्टींचे प्रमाण जास्त असणे. आणि मानसिकरित्या अस्थिर असलेल्या व्यक्ती ज्यांना खूप लहानसहान गोष्टींमुळे देखील रडू येऊ शकते त्यांचे ‘neuroticism’ मध्ये असलेल्या गोष्टींत सुद्धा प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते.

नयूरॉटिसिसमच प्रमाण जास्त असलेल्या व्यक्तींना भावना खूप खोलवर जाणवतात, ज्यामुळे त्यांना खूप सहजपणे रडायला येते. सतत रडण्याची सवय जरी चांगली नसली तरी अशा व्यक्ती मुद्दाम रडत नसतात, त्यांना ते खूप सहजतेने आतून आलेले असते. पण आपल्याला असं होतं असल्यास आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे हे लक्षात घ्यावे. सतत रडणाऱ्या व्यक्तींबाबत बऱ्याच वेळा असं दिसून येत की त्या व्यक्तींना depression आणि anxiety असण्याची शक्यता असते.

काही वेळा तर असही आढळून येत की, काही व्यक्तींना काहीच कारण नसताना देखील रडू येत. त्यावेळी असा प्रश्न पडतो की, ‘का मला अचानक रडू येत असावं? मी तर दुःखी, किंवा नाराज ही नाही.’ पण काही वेळा याचं कारण स्ट्रेस देखील असू शकतो. आपल्याला ताणतणावाची एवढी सवय झालेली असते की कधी-कधी आपल्या लक्षात ही येत नाही की आपल्याला फार स्ट्रेस आहे.

आणि तो स्ट्रेस कशा-ना-कशाच्या माध्यमातून बाहेर पडू पाहत असतो, आणि त्यामुळे असे अचानक रडू येऊ शकते. पण सतत रडण्याचे कारण प्रत्येकाचे सारखे असेल असं नाही. पण ते मानसिक अस्थिरतेचे लक्षण आहे हे मात्र नक्की! एखाद्याला mood disorder मुळे येऊ शकते तर कोणाला कमी-अधिक प्रमाणात असणाऱ्या anxiety किंवा depression किंवा आणखी कशामुळे असू शकते.

पण जेव्हा आपल्या लक्षात येत की आपल्याला सतत कशामुळे तरी रडू कोसळत, तर आपण आत्मनिरीक्षण करून बघावं. कधी-कधी आपल्या प्रश्नांची उत्तरे किंवा प्रॉब्लेम च सोलुशन आपल्याला निरीक्षणाने ही मिळून जाते. पण हे न झाल्यास नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “सतत रडायला येणं हे एका अस्थिर मानसिकतेचं लक्षण आहे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!