Skip to content

सतत दुःखात रमणाऱ्या लोकांना सुखाचे क्षण येऊन गेले तरीही कळत नाही.

सतत दुःखात रमणाऱ्या लोकांना सुखाचे क्षण येऊन गेले तरीही कळत नाही.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी दुःखं , संकटं येत असतात. प्रत्येक माणसाची त्यांना हॅन्डल करण्याची पद्धत वेगळी असते. पण ह्या गोष्टी कितीही चांगल्या किंवा वाईट पद्धतीने हाताळल्या तरी देखील आपल्यावर त्याचे लहान-मोठे परिणाम होतच असतात. काही माणसांना दुःखात राहायची एवढी सवय होऊन जाते, की ते दुःखच त्यांना त्यांचा सच्चा मित्र वाटायला लागतो.

माणूस हा असा प्राणी आहे की जो ज्या परिस्थितीत खूप काळ राहतो त्याची त्याला सवय होऊन जाते. आणि कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण सतत दुःखात राहून तो सुद्धा आपला comfort zone बनून जातो, ज्यातून बाहेर निघायची इच्छा तर असते, पण आपण इतके settle झालेलो असतो की ते खूप अवघड वाटायला लागतं. आणि आपल्याच बाबतीत घडणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही. जस की एका गोष्टीवर फोकस केला असता, बाकी आजूबाजूच्या गोष्टी ब्लर दिसू लागतात, त्याचप्रमाणे सतत दुःखात असण्याची सवय झाल्याने आयुष्यात येणारे सुखाचे क्षण देखील दिसेनासे होऊ लागतात.

पण दुःखाची सवय झाल्याने किंवा तो आपला comfort zone बनल्याने आपण त्याविरुद्ध तक्रार करणं मात्र सोडत नाही. म्हणजे त्यामध्ये राहायची सवय झालेली असते, पण तरी देखील आपण आपल्याला असा त्रास आहे, असं वाईट घडलेलं आहे याबद्दल तक्रार करत राहतो, आणि पुनःपुन्हा त्या गोष्टी नव्याने अनुभवत असतो. सतत दुःख – दुःख केल्याने मात्र त्याचा आपल्या आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर परिणाम होतो.

निराशावादी दृष्टिकोन घेऊन आपण सगळ्या दिशेने बघू लागतो, हे आपल्या इतकं नकळत घडत असत की कोणी सांगितलं सकारात्मक विचार करा तरी आपण त्याच ऐकत नाही. आशा ठेवून निराशा होण्यापेक्षा आपल्याला निराशेतच राहणं सोप्प वाटायला लागतं. पण अशावेळी हे लक्षात घ्यायला हवं की आयुष्यात आशा ठेवणं जरी रिस्की वाटत असलं तरी जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी आणि आयुष्यात चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आशा ही ठेवावीच लागते. त्यामुळे वाईट काळात नक्कीच दुःख होतं आणि ते काय आपण लगेच इंस्टंटली पळून लावू शकत नाही, पण पुढे येणाऱ्या चांगल्या क्षणांना ते धूसर करणार नाही इकडे लक्ष आपण नक्कीच देऊ शकतो.

आयुष्यात सुख आणि दुःख अनुभवणं हे अपरिहार्य आहे. आणि त्याचमुळे सुखाचे क्षण जाऊन दुःख अनुभवावं लागतं, आणि दुःख जाऊन सुखाचे क्षण ही परत आयुष्यात येत असतात. सतत दुःखात राहून आपला माईंड सेट असा होऊन जातो की आयुष्याकडे बघण्याचा, त्यात येणाऱ्या घटनांकडे, परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन ही कधी- कधी निराशावादी बनून जातो.

आणि त्यामुळे आयुष्यात येणारे चांगले, सुखाचे क्षण, घटना यांमध्ये देखील आपल्याला वाईट, किंवा निराशाजनक असे काहीतरी दिसते. त्यामुळे चांगल्या आणि वाईट या दोन्ही वेळेला आपण आशावादी दृष्टिकोन ठेवायला हवा. परिस्थिती कितीही बिकट असली तरी आशावादी दृष्टिकोन आपण सोडता काम नये. कारण आशावादी दृष्टिकोनाने झाला तर फायदाच होतो, पण निराशावादी दृष्टिकोनाने आपलं नेहमी नुकसान होत असतं. त्यामुळे जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आशावादी दृष्टिकोनातून सभोवतालच्या गोष्टी बघितल्या तर नक्कीच आनंदाचे क्षण, सकारात्मक घटना आपल्या नजरेतून सुटणार नाहीत.

त्यामुळे दुःखात मन गुरफटून जाण्याआधी वाईट परिस्थितीत सुद्धा चांगलं काय आहे याकडे फोकस करण्याचा प्रयत्न करावा, अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही. जेव्हा आपण वाईट काळात देखील आशेचा किरण बघण्याचा प्रयत्न करतो, त्या परिस्थितीत ही चांगलं काय घडतंय तिकडे मन वळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो वाईट काळ ही लवकर सरतो, आणि आपलं मन ही दुःखात अडकून राहत नाही.

वाईट काळ असो किंवा चांगला काळ, ते temporary असतात हे लक्षात ठेवायला हवं. म्हणजे सुखात आपण वास्तविकता न विसरून पाय जमिनीवरच ठेवतो आणि दुःखात खचून न जाता चांगले दिवस येणार आहेत या आशेने परत खंबीरपणे उभे राहतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सतत दुःखात रमणाऱ्या लोकांना सुखाचे क्षण येऊन गेले तरीही कळत नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!