Skip to content

सतत टेन्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या विचारांची तीव्रता कशी बॅलन्स करता येईल?

सतत टेन्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या विचारांची तीव्रता कशी बॅलन्स करता येईल?


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थी)


टेन्शन म्हणजे नक्की काय हो? किती सर्रास वापरतो ना आपण हा शब्द. म्हणजे एखाद्या प्रसंगाला नकारार्थी स्वरूपात शरीराने किंवा मनाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच अशी एखादी परिस्थिती जिथे काय करावं, कस करावं आणि हे नाही केला तर काय होईल असे विचार मनात येऊन आपण काळजीत पडतो, चिंता वाटू लागते, अस्वस्थ , बैचेन असं सगळंच व्हायला लागत.

जेव्हा एखाद्या कामाचं टेन्शन येत आणि आपण ते काम पूर्ण करतो म्हणजे, एक प्रकारे टेन्शन आपल्याला काम करायला भाग पडते तेव्हा काळजी करण्याची गरज नसते, कारण काम झालं की टेन्शन ही गेलेलं असत पण प्रत्येक गोष्टीच असं होत नाही, तेव्हा टेन्शन हे खूप दिवस राहून आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात आणू शकतं. पण जेव्हा इतकं टेन्शन येत की आपल्याला काय करावं आणि काय करू नये हेच सुचत नाही आणि यामध्ये आपण काहीच न करता फक्त काळजी आणि त्रास करून घेतो अशा टेन्शन च काय करायचं?

टेन्शन येत तेव्हा शरीरात खूप बदल होतात जस की श्वासाची गती वाढणे, रक्ताभिसरणाचा वेग वाढणे, घाम फुटणे इत्यादी आणि सततच् टेन्शन बऱ्याच वेळा आजारांना निमंत्रण देत. जस की उच्च रक्तदाब, मधुमेह, उदासीनता इत्यादी.पण टेन्शन घ्यायचं नाही म्हणून ते येणार नाही असं होत नाही.

पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा आपण ते चांगल्या पद्धतीने किंवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कस हाताळू शकतो यासाठी काही उपाय आहेत. खूप साध्या आणि सोप्प्या जीवनशैलीतून आपण या टेन्शनच्या विचारांची तीव्रता कमी करू शकतो.

योगासन, प्राणायाम (दीर्घ श्वास घेण्याने oxygen आपल्या मेंदू पर्यंत पोचून त्याने शांत व्हायला किंवा विचारांवर नियंत्रण मिळवायला मदत होते.) हे तर आपल्या संस्कृती मध्ये खूप पूर्वी पासून आहेत त्यांचं महत्त्व ही आपल्याला खूप चांगलं माहित आहे रोज अर्धा तास का होईना योगासन,प्राणायाम किंवा कोणत्याही प्रकारचे व्यायाम केल्याने सुद्धा जीवनातला ताण कमी व्हायला मदत होते.

याच बरोबर आहाराचा ही खूप मोठा महत्त्वाचा भाग यात असतो. आपण कोणत्या प्रकारचं अन्न कोणत्या वेळेत आणि कशा पद्धतीने खातो हे ही महत्त्वाचं असत. त्यामुळेच घरच सकस, सात्विक अन्न वेळच्या वेळी प्रसन्न आणि शांत चित्ताने खाणं गरजेचं आहे. आज काल खूप लोकांना जेवताना सुधा मोबाईल किंवा टीव्ही बघण्याची सवय असते पण याही गोष्टीचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो. बघायला गेलो तर तसे अगदीच छोटे छोटे बदल आहेत हे, पण जर कटाक्षाने आपण याकडे लक्ष दिल तर आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहू शकत.

लवकर झोपा आणि लवकर उठा असं आपले पूर्वज सांगून दमले पण आजकाल उशिरा झोपणं ही एक प्रकारची फॅशन झालीये. उशिरा झोपायचं, कामाला जायचं म्हणून वेळेत तर उठायलाच लागत पण यामुळे पुरेशी झोप घेणं होत नाही आणि त्याचा ही मेंदू वर परिणाम होत असतो. आपल्या शरीरावर पूर्णतः आपल्या मेंदूच नियंत्रण असत जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर मेंदू पूर्णपणे नीट काम करू शकत नाही त्यामुळे टेन्शनच्या वेळी जे विचार मनात येतात त्यांना नियंत्रित करताना तो कमी पडूच शकतो.

टेन्शन किंवा स्ट्रेस हे कंट्रोल करताना किंवा हे येऊच नये किंवा कमीतकमी यावं यात पुरेशी झोप, सकस आहार, पुरेसा व्यायाम या गोष्टी खूप महत्वाच्या भूमिका निभावतात.

याच बरोबर आपण आजपर्यंत नेहमी अजून एक गोष्ट ऐकत आलो ती म्हणजे चांगलं वाचा, चांगलं बोला आणि चांगलं ऐका. ते का? याच्या खोलात थोडस आपण आज जाऊयात. आपल्या मेंदूचे conscious आणि subconscious हे दोन भाग असतात. त्यातला conscious हा भाग तर्कशुद्ध असतो म्हणजेच काय तर चूक-बरोबर, योग्य-अयोग्य यातला फरक त्याला कळतो आणि हा conscious भाग आपण जागे असताना कार्यरत असतो पण subconscious भाग हा तर्कशुद्ध नसतो पण तो २४ तास कार्यरत असतो . त्याला जी गोष्ट आपण वारंवार सांगू ती त्याला योग्य वाटायला लागते.

त्यामुळेच चांगलं ऐकल्याने, बोलल्याने आणि वाचल्याने ते कुठेतरी आपल्या subconscious मध्ये जतन व्हायला लागत. आणि subconscious मध्ये जतन होणाऱ्या गोष्टींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो आणि त्यामुळेच किंबहुना आपलं वागणं बोलणं आणि विचार करायची पद्धत ही कुठेतरी तशीच व्हायला लागते.

या सगळ्या गोष्टी केल्याने नक्कीच आपल्या जीवनातील टेन्शन कमी व्हायला किंवा ते योग्य पद्धतीने हाताळायला मदत होते. पण रातोरात याचे परिणाम दिसून येत नाहीत थोडा धीर धरून नियमितपणे या गोष्टी पाळल्याने आपल्याला याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळू शकतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सतत टेन्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या विचारांची तीव्रता कशी बॅलन्स करता येईल?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!