Skip to content

सतत घडणाऱ्या चुका कशा सुधाराव्यात ??

सतत घडणाऱ्या चुका कशा सुधाराव्यात ??


टीम आपलं मानसशास्त्र


चुका करणे आणि चुका घडणे या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. एखाद्या निर्णय घेण्याच्या प्रसंगात जेव्हा तार्किक विचाराने पडताळणी केली असता तुम्हाला चूक होणार आहे हे माहित असूनही जेव्हा तुम्ही पुढे पाऊल टाकता तेव्हा ‘चूक केली’ या सदरामध्ये हा प्रसंग येतो.

आणि जेव्हा एखादा विषय हाताळताना चूक होण्याची कोणतीही जाणीव नसणे, अनावधानाने जेव्हा चुका होतात म्हणजे चूक होण्याची बाब जेव्हा जाणिवेच्या पातळीत सुद्धा नसणे तेव्हा ‘चूक घडली’ असे म्हणता येईल.

तुम्ही चूक केली असो किंवा तुमच्याकडून चूक घडली असो नुकसान तर तुमचेच आहे. एखाद्या नवीन प्रसंगात नवीन चुका होत असतील तर त्या चुकांची पुनरावृत्ती न होऊ देणे हे सर्वस्वी आपल्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे.

पुष्कळ वेळेस मागे घडलेल्या प्रसंगात घडलेली एखादी चूक त्यावर आत्मचिंतन करून पुन्हा जशाचा तसा प्रसंग जरी घडला नाही, पण त्याला साजेसा प्रसंग असल्यास मागचा अनुभव घेऊनही पुढच्या चुका टाळता येतात. म्हणजेच त्या अनुभवाला पुन्हा तोच वेळ, काळ, व्यक्ती आणि प्रसंग लागतात असे नाही. इथे आपण आपली सजगता वापरतो.

प्रत्येक वेळेस हि सजगता काम करेलच असे नाही किंवा प्रत्येक वेळी हि सजगता का वापरता येत नाही. हा ज्याच्या-त्याच्या व्यक्तिमत्वाचा विषय आहे.

काही टिप्स पाहूया…

१) भावनिकता :

भावनिकता हा असा विषय आहे, जो प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अडथळा म्हणून काम करतो. परिस्थिती सामान्य जरी असली तरी त्या प्रसंगात अतिशय भावुक होऊन पुन्हा गतकाळात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होते. या अशा चुका असतात ज्याचा भयंकर पच्छाताप कालांतराने होतो. त्यामुळे व्यक्ती पुन्हा तो प्रसंग समोर येऊ नये म्हणून घराबाहेर सुद्धा पडत नाहीत.

त्याबद्दल अतिविचार न करणे, अति भावनिकतेची हि साखळी तोडणे, मन कितीही लागत नसले तरी वेगळ्या आवडीच्या विषयात मन गुंतवणे, परिस्थिती कायमची दुर्लक्ष करण्यापेक्षा मन सामान्य स्थितीत आल्यानंतर तो विषय शांतपणे हाताळणे इ.

२) सवयीचा परिणाम :

काही व्यक्तींना त्याच-त्याच चुका करण्याच्या सवयी जडलेल्या असतात. इतरांच्या मनात या व्यक्तींविषयी एक लेबलच लागलेला असतो. या व्यक्तींना नावीन्यतेचा स्वीकार करायला खूप जड जाते. एका ठराविक साचेबद्ध पद्धतीनेच एखादी गोष्ट करायची आणि सवयीनुसार चुकाही करायच्या. याशिवाय त्यांना काम झाल्याचे समाधान सुद्धा मिळत नाही.

एखाद्या कामात चुका न घडल्यास त्यांना कमालीचा आनंद होतो. पण त्या न केलेल्या चुकांमधून पुढे काही विशेष शिकू शकत नाहीत. किंबहुना त्यांना काही शिकता येत नाही. कारण सवयींचा परिणाम.

अशा व्यक्तींनी जुन्या सवयी मोडून स्वतःला एका नव्या सृजनशील सवयींमध्ये रुजवायला हवं. एक ९० दिवसांचं प्लॅनिंग त्यांनी आखल्यास आणि त्याचे काटेकोरपणे पालन केल्यास स्वभावाला नवीन सवयी लागू शकतात.

३) आत्मविश्वास कमी :

या व्यक्ती सतत चुका घडण्याची वाट पाहत असतात. एखादा लहानसा मुद्दा जरी त्यांच्या समोर आला, तो हाताळतानाही त्यांना चुका होण्याची शक्यता जास्त वाटते. या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाचा प्रचंड अभाव आढळून येतो. ‘मला हे जमू शकणार नाही, माझ्याकडून होणार नाही, इतर सहकारी काय म्हणतील, वरिष्ठ काय म्हणतील, लोकं काय म्हणतील…’.

अशा रीतीने ते गांगरून जातात आणि नको त्या चुका करून बसतात. त्यांनी मुळात त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. चुकांमागचं मानसशास्त्र खऱ्या रूपाने समजून घेण्याची गरज आहे. त्या व्यक्तीच्या अवतीभवती इतरही चुका करणाऱ्या व्यक्ती असतात, किंबहुना जास्त चुका करणाऱ्या असतात. पण या व्यक्तींच्या आत्मविश्वासावर त्या गोष्टी थेट हल्ला चढवतात. ज्यावर त्यांनी काम करण्याची गरज आहे.

४) सतत स्वतःला कमी लेखणे :

कमी लेखल्यामुळे आपण ओढवलेली परिस्थिती हाताळण्याच्या लायकीचेच नाही आहोत, त्यामुळे या व्यक्तींच्या हातून सारख्या चुका घडत असतात. एकतर लायकीचे जरी नसलो मात्र तरी ती परिस्थिती हाताळायची तर असतेच त्यामुळे त्यांना नेमकी हि मानसिकताच समजत नसते.

अश्यांनी आधी स्वतःविषयीचा स्व-आदर विकसित करायला हवा. जेव्हा आपण एखाद्या प्रसंगात निर्णय घ्यायला जातो, तेव्हा तो समाधानाने हाताळण्याची चिन्हे तेव्हाच दिसतात जेव्हा आपली देहबोली, कृती, वर्तन ह्या एका दिशेने असतील. आणि त्या एका दिशेने तेव्हाच असतात जेव्हा मी समस्या सोडवू शकतो याबद्दल आपण स्वतःला कमी लेखत नसू.

५) अपुरे ज्ञान :

वरील प्रमाणे सर्व स्वभाव गुणवैशिष्ट्ये जरी तुमच्यात सामान्यपणे विकसित होत असली तरी एखाद्या विषयाचे असलेले अर्धवट ज्ञान आपल्याला घडणाऱ्या चुकांच्या दिशेनेच नेते. निर्णय घेण्याची क्षमता कितीही दांडगी असली तरी चौफेर आणि सारासार विचार जर तुम्ही त्या क्षणी करू शकला नाहीत तर चुका घडणारच आहेत.

आणि सारासार विचार तेव्हाच येऊ शकतील जेव्हा संपूर्ण पिक्चर तुमच्यासमोर क्लिअर असेल…

अशाप्रकारे चुका या घडताच राहतील, तो मानवी स्वभाव गुणवैशिष्ट्याचा एक अविभाज्य भाग आहे. केवळ त्या चुकांनी आयुष्याची दशा नव्हेतर योग्य दिशा मिळाली पाहिजे.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!