सतत इतरांना सर्टिफिकेट देण्यासाठी आपला जन्म झालेला नाहीये..
मेराज बागवान
आपल्या सहवासात अनेक माणसे असतात.त्यांच्यातील काही जणांशी आपण संवाद साधत असतो.बोलत असतो.कधी एकमेकांची स्तुती करीत असतो.तर कधी कधी नकारात्मक संवाद देखील होत असतात.पण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते.प्रत्येकाची विचारसरणी ही वेगळी असते.
कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर मोठा झालेला असतो.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगवेगळे असतात.आपल्याला एखाद्याबद्दल जे वाटते ते अगदी तसेच असेल असे नाही.त्यामुळेच इतरांना सर्टिफिकेट देण्यासाठी आपला जन्म झालेला नाहीये.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधत असतो तेव्हा कधी कधी आपण त्या व्यक्तीला म्हणतो, “अग तू बोलत का नाहीस जास्त. बोलल्याने मन मोकळे होते” आणि मग “तू किती अबोल आहेस “असे सर्टिफिकेट आपण तिला देऊनच टकतो.पण ती व्यक्ती बोलत नसेल , याला इतरही कारण असू शकतात.कदाचित ती स्वतःशी संवाद साधत असेल, आत्मपरीक्षण करीत असेल.पण आपण मात्र अनेकदा असे सर्टिफिकेट देऊन मोकळे होतो.
आपल्यासाठी जी गोष्ट योग्य आहे ती इतरांसाठी बरोबर असेलच असे नाही.तसेच आपल्यासाठी चुकीची असणारी एखादी गोष्ट इतरांसाठी बरोबर देखील असू शकते. मग आपण एखाद्याला असे सर्टिफिकेट का द्यायचे “की तू पूर्णपणे चुकीचा आहेस”.
प्रत्येक व्यक्तिचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा असतो.काहींना चैनीची जीवनशैली आवडते.त्यांना नेहमी त्यांचे ‘प्रेसटीज’ जपायला आवडते.त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे विचार असे असूही शकतात.मग आपण का त्यांना म्हणायचे, “की ही लोकं किती उधळपट्टी करतात”.
जीवन कसे जगायचे, जीवनशैली कशी असावी हा पूर्णपणे त्या त्या व्यक्तीचा निर्णय असतो.मग “माझेच डेली रुटीन परफेक्ट असते आणि त्याचे खूप आळशीपणाचे असते” असे सर्टिफिकेट आपण इतरांना का द्यायचे? ती ती व्यक्ती पाहून घेईल की त्याला कसे जीवन जगायचे आहे.
“तू खूप काकू बाई आहेस”, “तू किती वेंधळा आहेस”,”तू किती पोपटासारखा बोलतोस”,’तू किती फैशन करतेस” असे सर्टिफिकेट इतरांना देण्यासाठी आपला जन्म मुळीच झालेला नाही.तर , आपला जन्म हा स्वतःला घडविण्यात झाला आहे. आपण समाजशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आदर करता आला पाहिजे.त्यांचे विचार कसे का असेना आपण का त्यांना कोणतेही लेबल लावायचे?
कारण जे बरोबर असते ते कायम बरोबरच राहते, मग कुणी काहीही सर्टिफिकेट देवो .आणि जे चूक असते ते कायम चूकच राहते, कुणी कोणतेही सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न केला तरी देखील.
म्हणूनच , विचार वेगळे असले तरी चालतील पण मनाने कायम बांधून राहुयात एकमेकांशी.इथे कोणीच कोणाच्या आयुष्यात कायमचा नसतो.म्हणून, जितका काळ आहोत तितका काळ एकमेकांना कोणतेही सर्टिफिकेट न देता , एकमेकांना समजून घेऊयात.
कोणालाही कोणतेही सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणालाच नाही.प्रत्येक व्यक्ती आपल्या जागी बरोबरच असते.वेगळा असतो तो दृष्टिकोन.आणि दृष्टिकोन जर सगळ्यांचेच समान असतील तर मग सगळेच जणू ‘देव’ ठरतील.
चला तर मग एकमेकांचे वेगळेपण सर्वार्थाने स्वीकारूयात.एकमेकांबरोबर जगताना एकमेकांना समजून घेऊन स्वतःमध्ये गरजेचे बदल करूयात.म्हणजे कोणालाच कोणतेच सर्टिफिकेट देण्याची गरज भासणार नाही.
धन्यवाद!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
