सतत आराम, आळस आणि कंटाळा येत असेल तर या टिप्स वापरून पहा.
हर्षदा पिंपळे
‘आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे.’ असा सुविचार शाळेतील भिंतीवर बालवाडीत असतानाच वाचला होता.प्रत्येकानेच तो वाचला असेल. पण त्याचा अर्थ तेव्हा कळला नव्हता पण आता मात्र तो सगळ्यांना चांगलाच कळून चुकला आहे.
पण आपण माणूस आहोत आणि आपल्याला कंटाळा, आळस येणं अगदी साहजिक आहे. आराम करावस वाटणही तितकच नैसर्गिक आहे.यंत्रही सातत्याने काम करून करून बिघडतच…आणि आपण तर माणसच आहोत.त्यामुळे कधी आराम करावासा वाटला , कंटाळा आला तर ते ठीक आहे.पण कसय नं…
आळस येणं आणि आळशी असणं यात खूप म्हणजे खूप फरक आहे. काही जणं मुळातच खूप आळशी असतात. आळशीपणा , तो कंटाळा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला असतो.इतकच काय तर त्यांच्याकडे पाहून पाहून आपल्यालाही कंटाळवाणं वाटत रहातं.गमतीने आपण कित्येकदा बोलतोही की ‘ तुझ्या अशा वागण्यामुळे मीही एक दिवस असाच आळशी बोका होईल.तासनतास असाच लोळत राहील.
‘आता आपल्याला कधीतरी आळस येतो की आपण हाडाचेच आळशी आहोत हे ज्याच त्याला माहीत…!
असो……आळस , कंटाळा तर सर्वांनाच येतो.आयुष्य म्हणजे काय एक सरळ रेषा मुळीच नाही. किती काय काय करावं लागतं.जगणं मुळीच सोपं नाही. राब राब राबून , कष्ट करून थोडं थकायला तर होतच.थोडा आराम तेव्हा करावासा वाटतोच.दिवसभर काम करून नंतर पुन्हा लगेच काम करायच झालं तर थोडा आळस-कंटाळा हा येतो.त्यात नाकारण्यासारख काहीच नाही.
पण काही असेही असतील की त्यांना कधी कधी विनाकारण आळस येत असेल.प्रत्येक गोष्ट करण्याचा कंटाळा येत असेलं.मस्त अंथरूण टाकून आराम करावासा वाटत असेल.पण एकीकडे कामाच किंवा इतर गोष्टींच प्रेशरही असेल. आणि अशातच नेमकं काय करायचं…? हा आळस कसा घालवायचा…?
हे असे काही प्रश्न हे कित्येकांच्या मनात नक्कीच घिरट्या घालत असणार. त्यामुळे सतत असा आराम, आळस , कंटाळा येत असेल तर या काही टिप्स तुम्ही नक्कीच वापरून पहा.
१) झोप : –
कित्येकांची आवडती आणि अगदी ‘जीव की प्राण’ म्हणजे ही झोप.त्यामुळे एक मनसोक्त अशी झोप घ्या.कारण मनापासून झोप झाली तर अर्धा आळस तिथेच संपतो.इतकच नाही तर …कधी वाटल्यास (शक्य असल्यास) दुपारची एक वामकुक्षीसुद्धा तुम्ही घेऊ शकता.
२) नृत्य :-
एखाद्या आवडत्या गाण्यावर बेभान होऊन चार उड्या मारल्या तरी आलेला कंटाळा पळून जाईल. त्यामुळे मस्तपैकी नृत्याचा ठेका धरून त्या आळसाला दमवायला शिका.नाचून नाचून तो आळसही थकून काही काळ तरी नक्कीच विश्रांती घेईल.
३) फेरफटका :-
अगदी दूरवर कोणत्या कोसावर नाही तर खाली पाच-दहा मिनीटाच्या अंतरावर जाऊन एक फेरफटका मारून या.शरीराला नी मनाला थोडं मोकळं करून या.
४) आवडीचे खाद्यपदार्थ :-
तुम्हाला आवडणारं एखादं खाद्य खाऊन पहा.किंवा एखादं चॉकलेट नाहीतर आईस्क्रीम किंवा रसाळ फळं खाऊन पहा.त्या फळांनी खूप फ्रेश वाटतं.
५) विनोदी चुटकुले :-
विनोदी पुस्तकं वाचा , किंवा हल्ली सोशल मीडियावर विनोदी व्हिडिओ कितीतरी प्रमाणात पहायला मिळतात.थोडक्यात काय तर विनोदाने आळस चुटकीसरशी झटकला जातो.
६) हास्यासन :-
कंटाळा आल्यावर एकदा तरी हास्यासन करून पहा.अगदी खळखळून हासून पहा.हासण्याने कंटाळा , आळस माणूस सहजपणे विसरून जातो.इतकच नाही तर हास्यासनाने शरीरात उत्स्फुर्त अशी ऊर्जा निर्माण होते. जी की शरीर आणि मनावरील मळभ दूर करण्यास मदत करते.
७) स्पोर्ट्स :-
क्रिकेट ,बॅडमिंटन, किंवा एखादा कोणताही तुमच्या आवडीचा मैदानी खेळ खेळा. खेळायला कोणी सोबत नसेल तर सायकलिंग करा.सायकल नसेल तर स्वतःतील धावपटू जागा करा.
८) छंद :-
तुमच्या आवडीचे छंद अशावेळी तुम्ही नक्की जोपासू शकता.चित्रकला, गाणं गाणे, किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवणे ,बागकाम , हस्तकला यांसारखे अनेक छंद तुम्ही जोपासू शकता.यांच्यामध्ये स्वतःला गुंतवून रिफ्रेश होऊ शकता.
९) प्राण्यांशी हितगूज :-
आता वाघ , सिंह तर आपण घरात , सोसायटीमध्ये पाळू शकत नाही. पण कुत्रा, मांजर , गाय असे कोणतेही पाळीव प्राणी जर तुम्हाला आवडत असतील तर त्यांच्याबरोबर वेळ घालवा.
१०) लहान मुलांमध्ये मिक्स होणे :-
लहान मुलांमध्ये आपण सहज रमतो , त्यांच खेळणं ,बागडणं आपल्यामधील लहान मुल जागं करत असतं.अशावेळी आळस आलाय हेही लक्षात नसतं.लहान मुल होऊन आपण तितक्याच आनंदात , उत्साहात बागडत असतो.
११) योगासन-प्राणायाम :-
कंटाळा येऊ नये म्हणून बेस्ट आहे ते म्हणजे प्राणायाम करणे.आधीच प्राणायम वगैरे केले तर शरीर व मन दोन्ही प्रसन्न राहतं.सहसा कोणताही थकवा लवकर जाणवत नाही. त्यामुळे योगासन-प्राणायम करायला सुरुवात करा.
१२) निसर्ग :-
निसर्ग हा आपल्या खूप जवळचा मित्र आहे.त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा.एखाद्या शांत पाण्याच्या ठिकाणी थोडं निवांत बसून पहा.झाडावरच्या पक्षांच , फुलांच निरीक्षण करा.वेळ वाया जाणार नाही आणि काहीतरी चांगलं केल्याचं समाधानही मिळेल.
१३) धमाल-मस्ती :-
इतरांशी थोडी मस्ती करून पहा, पोटधरून हसून पहा.थट्टा-मस्करी करून पहा.
आता या झाल्या काही टिप्स….
पण आता हे सगळं करायचा सुद्धा कंटाळा येतो असं बोलणारेही खूप आहेत. साधा चहाचा पेला उचलून ठेवायचा म्हंटल तरी कंटाळा आलेला असतो.इतकं सगळं कधी करणार….? असं बोलणारे खरच कमी नाहीत. आपणही त्यापैकी नक्कीच एक असू. पण मग या सगळ्या गोष्टी करायची इच्छा नसेल तर शेवटी अजून दोन पर्याय आहेत.
ते म्हणजे एखादा कागद घ्या किंवा काहीतरी घ्या आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करत बसा.(स्वतःच्या घरात)आणि शेवट म्हणजे तुम्हाला खरच जी गोष्ट केल्यावर उत्साह वाटतो , ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करण्याला प्राधान्य द्या. तुमचा आलेला आळस – कंटाळा थोडातरी नक्कीच कमी होईल. आणि कंटाळा आला तर येऊद्या , त्यानेच तर आपण गुंतलेल्या गोष्टींमधून काही काळ तरी बाहेर पडतो.आणि सारखं सारखं जर कंटाळा येत असेन तर या टिप्स नक्की वापरून पहा.कदाचित कंटाळा काही काळ तरी सुट्टीवर निघून जाईल.
काय मग….करताय नं या टिप्स फॉलो….???
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


