Skip to content

सततच्या येणाऱ्या नैराश्याचं व्यवस्थापन कसं करायचं ??

सततच्या येणाऱ्या नैराश्याचं व्यवस्थापन कसं करायचं ??


मेराज बागवान


पूर्वी च्या काळी अनेक साथीचे रोग ,किंवा इतर शारीरिक दुर्धर रोग असत. आणि हे सगळे आजार-रोग शरीराच्या संबंधित असत. मानसिक आजार त्याकाळी इतके बळावलेले नव्हते. त्याकाळी फार कोणाकडे श्रीमंती नसली तरी देखील माणसे सुखी-समाधानी होती.पण आज नेमके याच्या उलट झाले आहे. पैसे भरपूर आहेत, शारीरिक आजार तर आहेतच पण त्याचबरोबर , अनेक मानसिक आजार आज प्रत्येक माणसाला आहेत.

जसे की ,अतिराग येणे, चिडचिडेपणा, भीती, अति काळजी-चिंता आणि नैराश्य. दिवसेंदिवस अशा सर्व मानसिक आजारात भर पडत आहे. जी की खूप गंभीर बाब आहे. आणि ह्या सर्व आजारांवर योग्य वेळी योग्य ती पावले उचलणे आणि जीवन सुकर करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून प्रत्येकजण सुखी-शांतीमय आयुष्य जगू शकेल. तर आयुष्यातील ह्या नैराश्याचे व्यवस्थापन कसे बरे करता येईल?

आज लहान मुलांना सतत च्या अभ्यासाचे, बाहेर चाललेल्या स्पर्धेत कसे टिकून राहायचे याची सतत चिंता आहे, महाविद्यालयात गेल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी म्हणून ओढाताण , नोकरीला लागल्यानंतर ‘टारगेट’ पूर्ण करण्यासाठी धडपड , नोकरी- घर-नातेसंबंध-लग्न-कुटुंब या सगळ्याचा समतोल साधण्यासाठी मनाची झालेली घालमेल, वृद्धांच्या समस्या, त्यांच्या एकाकीपणावरील समस्या …हे असे रोजचे आपले चक्र चालू आहे.

पण कधी कधी हे चक्र आपल्याला जसे पाहिजे तसे चालत नाही, कुठे तरी गाडी बंद ही पडतेच. परीक्षेत कमी गुण मिळतात, कधी कधी नापास झाल्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाते.अचानक नोकरीतून कमी केले जाते, मोठी आर्थिक चणचण भासते, आर्थिक परिस्थिती ढासळते, कधी नातेसंबंध तुटतात, घटस्फोट होतात ,जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो, इतर शारीरिक आजार जडतात , वृद्धांना ‘स्मृतिभंश’ सारखे विकार जडतात.

आणि या सगळ्या घटनांचा आपल्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. आणि तो परिणाम म्हणजे ‘नैराश्य’.मग अशा वेळी आयुष्य असेच वाया जाऊ द्यायचे का ? तर अजिबात नाही. ह्या नैराश्याचे आपण जितक्या लवकर व्यवस्थापन करू , तितक्या लवकर आपण नैराश्यातून बाहेर पडू शकतो.

सर्वात प्रथम , आपल्या आयुष्यात नक्की समस्या काय आहे, याचा विचार केला पाहिजे, आणि त्यावर उपाय म्हणून आपल्याकडे काय काय उपाय आहेत याचा विचार केला गेला पाहिजे. समजा, माझी नोकरी अचानक गेली ,आणि माझ्यावर ३-४ लोकांची आर्थिक आणि इतर सर्व प्रकारची जबाबदारी आहे .तर मग अशा परिस्थितीत मी नैराश्यात जाणे हा अंतिम उपाय आहे का ? हे मनाला विचारणे गरजेचे आहे. आर्थिक गरज भागविण्यासाठी , दुसरी नोकरी लवकरात लवकर मिळविण्यासाठी मी काय प्रयत्न केले पाहिजेत?

आणि ते प्रयत्न मी प्रामाणिकपणे करीत आहे का ? का फक्त हातावर हात धरून बसून आणि नैराश्यात जाऊन कोण आपली समस्या सोडविणार आहे का ? हा विचार करावा. जेव्हा एखादे नाते तुटते, तेव्हा स्वसंवाद खूप गरजेचा असतो. आपण स्वतःमध्ये नाते टिकविण्यासाठी काय बदल केले पाहिजेच हा विचार करावा. फक्त इतरांना दोष देऊन काहीच साध्य होत नाही. दोन्ही बाजूंनी जर का असा विचार झाला तर नैराश्य टाळता येऊ शकते.

जेव्हा जेव्हा तुम्ही नैराश्य अनुभवाल तेव्हा तेव्हा , स्वसंवाद वाढवा. स्वतःला विचारा, की ही परिस्थिती मला काय शिकवू पाहत आहे. मी माझ्यात काय बदल करु? माझी विचारसरणी कशी बदलू? मला नक्की आयुष्यात काय हवे आहे. जर का तुम्ही स्वतःशी कोणतीही फसवणूक न करता प्रामाणिकपणे संवाद साधत असाल तर नक्कीच तुम्ही नैराश्यातून अलगतरीत्या बाहेर पडू शकाल.

मित्र-मैत्रिणी, जवळचे नातलग किंवा इतर कोणीही , ज्यांच्याशी तुम्ही मन मोकळेपणाने बोलू शकता , अशा कोणाशीही तुम्ही बोला. यामुळे देखील नैराश्यातून लवकर बाहेर पडता येऊ शकते. आणि जर तुम्ही ‘आत्मकेंद्रित’ असाल तर मग स्वतःच स्वतःचा एक चांगला मित्र बनता आले पाहिजे. स्वतःवर प्रेम करता आले पाहिजे आणि स्वकाळजी ने नैराश्यातून बाहेर पडले पाहिजे.

आपले विचारच आपले आयुष्य ठरवतात. आपण जसा विचार करतो , तसेच आपले आयुष्य घडत जाते. ‘माझ्या आयुष्यात हे ‘प्रॉब्लेम्स’ कायम राहणारच, मीच कमनशिबी, माझं नशीबच फुटक असे जर आपण वारंवार स्वतःच्या मनावर बिंबवत असू तर मग परिणाम देखील तसेच दिसणार आणि आपण पुन्हा त्या ‘नैराश्याच्या चक्रव्यूहात अडकणार’.म्हणून मनावर असे संस्कार करा जेणेकरून , जगण्याची एक नवी उम्मीद मिळेल.

जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते आहे की , माझ्या आयुष्यात जबरदस्त नैराश्य आलेले आहे आणि ह्या नैराश्याने मला संपूर्णपणे ग्रासलेले आहे , त्याक्षणी स्वतःला डोळे बंद करून खालील १० वाक्ये ऐकावा, आवर्जून ऐकावा, मोठ्याने म्हणा.दिवसातून किमान ३ वेळा असे करा आणि त्यानुसार कृती करत राहा , परिणाम तुमच्या समोर असतील.

१) मी एक सकारात्मक ऊर्जा आहे.

२) मी शांतपणे विचार करू शकतो/ शकते.

३) माझे मन एकाग्र आहे , शांत आहे.

४) माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.

५) आताची परिस्थिती ही कायमची नाही.

६) हे ही दिवस जातील.

७) ‘तरी बर’ मला अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, काहींना ह्या गोष्टी देखील मिळत नाहीत.

८) जे होत आहे ते माझ्या चांगल्यासाठीच, ह्या संघर्षमय घटनांमधून च मला मोठ्या, चांगल्या गोष्टी मिळणारच आहेत.

९) मी एक संयमी व्यक्ती आहे.

१०) मी जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि माझे माझ्यावर खूप प्रेम आहे.

अशा रीतीने जर तुम्ही स्वतःशी संवाद साधला तर नक्कीच तुम्ही हळूहळू नैराश्यातून बाहेर पडाल आणि एक नवी पहाट फक्त तुमचीच वाट बघत असेल. तुमचे जीवन नवचैतन्याने एक नवी कलाटणी घेईल आणि आयुष्याच्या कोण्या एका संध्याकाळी जेव्हा कधी तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हांला स्वतःच स्वतःचा खूप अभिमान वाटेल आणि हीच भावना तुमचे संबंध आयुष्य सुकर , यशस्वी, सुखी , समाधानी आणि शांतीमय करेल.

‘जिओ जी भर के’ . जगा, भरभरून जगा, मुक्तपणे आयुष्याचा आस्वाद घ्या… आयुष्य तुमचेच आहे….मन मोकळेपणाने हसा, वाटेल तेव्हा ‘सेल्फी’ घ्या, स्वतःचे लाड करा ….आयुष्य मनमुरादपणे जगून घ्या..कारण ‘,ये जिंदगी ना मिलेगी दोबारा’…….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!