“सततच्या चुकीच्या निर्णयांमुळे मानसिक कोंडमारा उद्भवू शकतो.”
मधुश्री देशपांडे गानू
“जीवन एक रंगमंच आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही एक कलाकार” असं काहीसं प्रसिद्ध लेखक शेक्सपीयरने म्हणून ठेवलंय. याच रंगमंचावर आपण एकाच जन्मी अनेक विविध भूमिका वठवत असतो. अनेक भावनाविष्कार अनुभवतो. सुख-दुःखाच्या हिंदोळ्यावर झुलत असतो. काही अनुभव आपल्याला समृद्ध, प्रगत, आनंदी बनवतात. तर काही दुःखाच्या, नैराश्याच्या गर्तेत लोटणारेही असतात. हीच शिदोरी घेऊन आपण आयुष्याला सामोरे जात असतो. प्रत्येक येणारा अनुभव हा आपणच घेतलेल्या निर्णयांची परिणिती असते.
अगदी बालपणापासून आपलं मन संस्कारक्षम असतं. टीप कागदासारखं सगळे टिपून घेत असतं. परिस्थितीनुसार बरे-वाईट संस्कार आपल्यावर होतात. आणि माणूस म्हणून आपण घडत राहतो. अगदी लहानपणापासूनच आपली काही स्वप्नं आणि उद्दिष्टं असतात. आयुष्य जगण्याचे प्रत्येकाचे स्वतःचे असे आडाखे असतात.
चांगल्या मार्कांनी पास होणं, मनासारख्या अभ्यासक्रमात पदवी प्राप्त करणे, हवा असलेला व्यवसाय नोकरी मिळवणे, आवडलेल्या व्यक्तीशी लग्न अशी अनेक स्वप्नं प्रत्येक व्यक्तीची असतात. सुरुवातीची काही वर्षे आपल्या वतीने आपले पालक निर्णय घेतात. एका ठराविक वयानंतर आपण स्वतः निर्णयक्षम होतो. अडखळत, धडपडत का होईना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागतो. याबाबत घरातील, कुटुंबातील ज्येष्ठ अनुभवी मंडळींचं मार्गदर्शनही मिळत असतं.
समाजात काही व्यक्ती अशा दिसतात, त्या अगदी सुरुवातीपासूनच अत्यंत हुशारीने, तर्कसंगत बुद्धीने, वास्तववादी विचारांनी अचूक निर्णय घेतात. एखादी संधी आली तर लगेच त्याचा स्वीकार करून त्यावर प्रामाणिक मेहनत घेतात. जीवनात यशस्वी होण्याचे नवनवीन मार्ग सतत शोधत राहतात. अशा व्यक्तींचं आयुष्य अगदी आखीव-रेखीव, यशस्वी असतं. त्यांच्या जीवनाचा यशस्वितेचा आलेख नेहमी चढता असतो. अशा व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी असतात.
पण सगळ्यांनाच असं आखीव-रेखीव अगदी अचूक जगणं जमतच असं नाही. उलट बहुसंख्य लोक आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन, अत्यंत रागाच्या, संतापाच्या आवेगात, दुःखाचा तीव्र लाटेत घेतात. असे घेतलेले निर्णय हे बहुदा चुकीचेच असतात. कारण ते क्षणिक भावनेच्या भरात घेतलेले असतात. अशा एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्याला चुकीची कलाटणी मिळू शकते.
असा एक चुकीचा निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्यावर विपरित परिणाम करू शकतो. या निर्णयामुळे तुम्हांला अनेक लहान मोठ्या अडचणींना, संकटांना तोंड द्यावे लागते. तुम्हीं तुमचा आत्मविश्वास गमावून बसता. अनेकदा तुमचं सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, नुकसान होतं. अशा परिस्थितीत तुम्ही हतबल होता. तुमची साधक-बाधक विचार करण्याची क्षमता कमी होते. आणि परत एखादा चुकीचा निर्णय तुम्हीं घेण्याची शक्यता वाढते. आणि मग सगळंच चुकत जातं.
सततच्या चुकीच्या निर्णयांमुळे तुमचा प्रचंड मानसिक कोंडमारा होतो. तुमचा स्वतःबद्दल, आयुष्याबद्दल अपेक्षाभंग होतो. आणि तडजोड म्हणून, नाईलाज म्हणून तुम्हांला प्राप्त परिस्थिती स्वीकारावी लागते. सतत मनाविरुद्ध वागण्याने तुमचा मानसिक, भावनिक कोंडमारा होतो. जो असह्य असतो. अशा वेळी तुम्हाला नैराश्य येऊ शकतं. प्रचंड चिडचिड, निद्रानाश, अतिताण, अति चिंता, अनेक शारीरिक आजार होऊ शकतात. ज्यामुळे तुमची निर्णय क्षमता कमालीची खालावते. आणि या दुष्टचक्रात तुम्ही अडकून राहता.
अगदी सहज आढळणारे उदाहरण घेऊ. तारुण्याच्या ऐन भरात, वरवरच्या दिखाव्याला भुलून, फार विचार न करता अनेकजण प्रेमविवाह करतात. जेव्हा वास्तवाचे चटके बसू लागतात तेव्हा चित्र काही वेगळं असतं. पैशासाठी छळ, शारीरिक, मानसिक हिंसा, संशय कोणत्याही विकोपाला काहीवेळा हे नातं जातं. यात बळी ठरलेली व्यक्ती बर्याचदा असा विचार करताना दिसते, ” मी निर्णय घेतलाय ना आता मला सहन केलं पाहिजे. माझ्या निर्णयाचे परिणाम मला भोगले पाहिजेत.” म्हणजे परत एक चुकीचा निर्णय.. खरंतर अशा वेळी ताबडतोब कोणालातरी सांगणं, कळणं, कोणाची तरी मदत घेणं हे अत्यंत गरजेचं आहे.
आज कोविड काळात या आजाराची अत्यंत भीती, आपली प्रेमाची माणसं अचानक गमावल्याचे अतीव दुःख, नोकरी-व्यवसाय गमावलेले हजारो लोक आपण पाहतो आहोत. अशावेळी मागचा-पुढचा कोणताही विचार न करता, उद्याची कोणतीही आशा दिसत नाही असं वाटून सहज आत्महत्या करणार्या घटना समोर येत आहेत. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य संपताना दिसत आहेत.
आपल्या समाजात एक सहज गैरसमज आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात काही वैयक्तिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक समस्या असेल तर त्यावर आपल्याकडे एकच उपाय आहे, “लग्न करून देणे”. समाजाच्या, आईवडिलांच्या दबावाखाली अशी कितीतरी लग्नं आजही आपल्याकडे होतात. आणि आयुष्यभर केवळ कर्तव्य म्हणून संसार होत राहतात. एखादी मानसिक आजार असलेली व्यक्ती, तिचं लग्न लावून दिलं तर बरी होईल की योग्य उपचार घेऊन?? अशा वेळी आपण आणखी एका व्यक्तीचं आयुष्य पणाला लावतोय हे लक्षात येत नाही का??
अगदी व्यवस्थित चालू असलेली नोकरी सोडून अनेक जण व्यवसायात उतरतात. आणि या निर्णयामुळे आयुष्यभराचं नुकसान करून घेतात. कारण जो व्यवसाय करायचा त्याचा सखोल अभ्यास, नफा-तोट्याचे गणित, साधक-बाधक विचार, स्वतःची शारीरिक, मानसिक , आर्थिक कुवत, क्षमता आणि अशा अनेक बाबींचा संपूर्ण विचारच केलेला नसतो.
मान्य आहे कोणत्याही व्यक्तीचे सगळे निर्णय बरोबरच असतात असं नाही. प्रत्येक जण आयुष्यात चुका या करतोच. पण मग अशा एका चुकीच्या निर्णयाने खचून न जाता, त्या निर्णयातून अनुभव घेऊन, त्यातून शिकून, तावून सुलाखून परत नव्याने सुरुवात करण्याची जिगर हवी. वेळप्रसंगी तज्ञांचा, थोरामोठ्यांचा सल्ला ऐकण्याची मानसिकता हवी.
स्वतःची चूक कबूल करण्याचा मोठेपणा हवा. भूतकाळात न राहता आजचा दिवस मी किती सक्षमतेने जगेन हा विचार हवा. म्हणजे सतत चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत. आणि नक्कीच जीवन जगण्याचा, त्याचा आनंद घेण्याचा योग्य मार्ग तुम्हाला सापडेल….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


