सगळे आपलेच आहेत, हा सर्वात मोठा गैरसमज आहे??
सोनाली जे
” In the ocean of man I am alone “. असे एका पाश्चात्य लेखकाने म्हणले आहे.
” जन्म आणि मृत्यू यातले जगणे म्हणजे आयुष्य “.हा व. पु. काळे यांनी विचार मांडला आहे. बघा ना जन्माला येतो तेव्हा आपल्या अंगावर एकही कपडा नसतो , तसेच मरताना ही. पण मग आपण जगताना किती स्वार्थीपणा ने जगतो. हा माझा , ही माझी , हे माझे ते माझे. वस्तू असतील ,. व्यक्ती असतील , विचार असतील , भावना असतील. प्रत्येक गोष्टीत आपण मी मी , माझे माझे , आपले असेच तर करत असतो.
लग्न झाल्यावर मुलगी सासरी जाते . पण नवऱ्याच्या आई वडिलांना आपले आई वडील म्हणून समजणाऱ्या , तसे वागवीत असणाऱ्या किती सूना आहेत?? नाहीत असे मी म्हणत च नाही पण सगळ्याच आहेत का? नाही ना ? का ? कारण माझे आई बाबा माझे आहेत. त्यांनी जन्म दिला , आपल्याला वाढविले , शिक्षण दिले , खर्च केला , शिकवण दिली , प्रेम , माया दिली, ते रक्ताचे म्हणून आपले. आणि नवऱ्याचे आई बाबा म्हणजे सासू सासरे यांच्यात सुरुवाती पासून अंतर ठेवले जाते, सुरुवातीला कदाचित नवीन असते म्हणून , स्वभाव माहिती नसतात म्हणून , जवळीक कितपत आवडेल माहिती नसते , ही मानसिकता मुलींची असते साधारण त्यामुळे पटकन त्या आपले म्हणून नवऱ्याच्या आई वडिलांचा स्वीकार करत नाहीत.
आपण जो पर्यंत मनाने स्वच्छ असतो , इतरांच्या विष्यी चांगले विचार करत असतो , चांगल्या गोष्टी लक्षात ठेवत असतो , त्यांच्यातले चांगले गुण बघत असतो , त्यांच्याकडून काय शिकता येईल ते बघत असतो. त्या नात्यात , कुठे स्वार्थी पण आलेले नसते. अपेक्षा वाढलेल्या नसतात. त्या मर्यादित असतात. किंवा त्यांचे आणि आपले विचार , स्वभाव भिन्न असणार हे वास्तव स्वीकारले असते , जुळवून घेण्याची मानसिकता , तयारी असते तोपर्यंत सगळे आपलेच असतात.
नवीन लग्न होवून सून घरी येते, सुरुवातीला सगळे सुरळीत सुरू असते. हळूहळू सुनेला असे वाटू लागते की सासू आपल्या बरोबर नीट वागत नाही , बोलत नाही,सतत त्या सांगतील तसेच वागायचे , ती आपल्या नवऱ्याला हे सांगते आणि त्याला म्हणते आपण वेगळे घर घेवू आणि वेगळे राहू ,यावर नवऱ्याला हे काही पटत नाही, तो बायको ला म्हणतो आई चे बरोबर आहे. ती बरोबरच वागते .
यातून बायकोला म्हणजे सुनेला असे वाटते की , सगळे आपलेच आहेत, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. मग ती माहेरी येते आपल्या आईला सांगते , आई म्हणते अग थोडे दिवस जावू देत एकमेकांचे स्वभाव समजायला वेळ लागेल. तू समजुन घे त्यांना , मी जशी आई आहे तसेच त्यांना ही मान . त्या आपल्या च आहेत असे समज . पण हे मुलीला काही पटत नाही. ती म्हणते एव्हढे दिवस मी प्रयत्न करत होतेच की. पण त्या माझ्याशी नीट वागत नाहीत मग मी का त्यांच्याशी आपलेपणाने वागायचे?
असे उलट उत्तर ती आईला देते आणि आपल्या बाबांकडे जाते. त्यांनाही सासू ची तक्रार करते. तिचे बाबा आयुर्वेदिक डॉक्टर असतात त्यांना ती सगळे सांगते आणि म्हणते की बघा ना नवरा ही माझी बाजू घेत नाही. एव्हढे दिवस तो आपला आहे असे वाटत होते पण तो ही आपला नाही हे जाणविले. बाबा , आता तुम्हीच मदत करा माझी , माझ्या सासू बाईंचा त्रास मला नको आहे. मला माझ्या मताप्रमाणे , माझ्या इच्छेप्रमाणे जगायचे आहे.
तुम्ही माझ्या सासू बा असे काही तरी जहाल औषध द्या की त्यांचा मृत्यु होईल. बाबा म्हणतात असे झाले तर तुझ्यावर लगेच संशय येईल किंवा ते सगळ्यांच्या लक्षात येईल त्यापेक्षा मी तुला एक पुडी देतो त्यातले चूर्ण रोज थोडे थोडे त्यांच्या जेवणात घाल आणि त्यांना ते दे. रोज हळूहळू ते औषध पोटात गेल्यावर सहा महिन्याने त्यांचा मृत्यू होईल. पण तोपर्यंत तू रोज त्यांच्याशी चांगले वाग , गोड बोल, त्यांची काळजी घे , आणि त्यांना वेळेवर हे औषध दे म्हणजे कोणाला तुझ्यावर शंका किंवा संशय ही येणार नाही.
सून परत सासरी येते. बाबांनी संगितल्याप्रमाने सासू बरोबर गोड बोलते , वागते , त्यांची काळजी घेते , त्यांना कामात मदत करते, त्या सांगतील तसे ऐकते, आणि रोज त्यांना ते औषध जेवणातून देत असते.
सहा महिने पूर्ण होण्या आधीच ती मुलगी परत बाबांकडे येते आणि बाबांना रडत , त्यांच्या हाता पाया पडत बाबांना म्हणते बाबा माझ्या सासू बाईना वाचवा ..तुम्ही दिलेल्या औषधाने त्या पुढच्या महिन्यात मृत्यू पावतील. पण बाबा आता असे औषध त्या की त्या भरपूर जगतील..बाबा please. असे काही तरी करा. वाचवा त्यांना.
त्या आता माझ्याशी खूप चांगले वागतात. माझे खूप लाड , कौतुक करतात, आई सारखी माया आणि प्रेम करतात माझ्यावर , बाबा त्यांना काही होवू देवू नका.
तेव्हा बाबा आपल्या मुली ला जवळ घेतात आणि शांत हो म्हणतात. तू काही काळजी करू नकोस तुझ्या सासू बाईना काही होणार नाही. त्यांना मी जे औषध दिले होते ते फक्त पोट साफ राहण्याचे औषध दिले होते. त्याने त्यांना काही ही होणार नाही. फक्त मी तुला ते आधी सांगितले असते तर तुझ्या वागण्यात , विचारात बदल झाले नसते. म्हणून मी तुला खोटेच सांगितले. आणि तू त्यांच्या बरोबर चांगले वागू लागलीस , त्यांची , त्यांच्या खाण्या पिण्याची काळजी घेवू लागलीस तसे त्याही त्यांच्याकडून तुझ्या बरोबर चांगल्या वागू लागल्या, तुझी काळजी घेवू लागल्या. तुझे लाड करू लागल्या, तुझ्यावर मुली सारखे प्रेम करू लागल्या.
आपले कोणी नाही , आपली काळजी कोणी घेत नाही, आपल्याला समजून घेत नाही हे सगळे आपल्या विचारांवर अवलंबून असते , आणि आपल्या अपेक्षा , आपल्या अपेक्षे प्रमाणे समोरची व्यक्ती वागली नाही की ती आपली नाही असे आपण म्हणतो.त्या व्यक्तीने कसे वागावे हे आपण कोण ठरवणार ? आपण कसे वागायचे हे आपण ठरवू शकतो आणि आपल्या वागण्यातून , विचारातून, समोरच्या व्यक्तीला समजून घेवून, आपण समोरच्या व्यक्ती मध्ये बदल घडवून आणू शकतो आणि व्यक्तीला आपलेसे करू शकतो.
असं म्हणतात की नाती प्रतिसादामुळे टिकतात किंवा संपुष्टात येतात…. बाहेरच्या जगात सर्वत्र जो नियम लागू पडतो तोच नियम काही अंशी स्वतःसाठी सुद्धा असतो.इतरांकडून असलेल्या अपेक्षांच्या पिंजऱ्यात मन असं बंदिस्त होतं की मुक्त , स्वछंदी , अपेक्षाविरहीत जगण्याची मुळ प्रव्रुत्ती ते विसरून जातं.
आपण स्वतःला जो प्रतिसाद देतो त्यावरच तर मनाची खरी शक्ती अवलंबून असते…. पण कित्येकदा बाहेरची नाती जपण्याचा , अपेक्षाभंग सावरण्याचा खटाटोप स्वतःशी असलेल्या नात्याला, गरजेच्या भावनिक प्रतिसादाला दुर्लक्षित करतो…दुर्दैवाने आपल्या दुःखाचे खरं मूळ तिथेच असते.
सगळे आपलेच असतात ,पण आपले विचार , मन भरकटते आणि एखाद्या वेळेच्या अनुभवातून आपण ती व्यक्ती आपली नाही असे आपलेच तर्क लावून रिकामे , गैरसमज करून रिकामे.
अगदी एखादी रोजची मैत्रीण असेल , जी सकाळ संध्याकाळ रात्री आपली फोन करून , मेसेज करून चौकशी करत असते . पण अचानक असे काही होते एखादे दिवशी तीला मेसेज करणे जमत नाही . पण ती दुसरी मैत्रीण आपणहून तिला फोन किंवा मेसेज ही करत नाही , तिची चौकशी करत नाही की काय झाले तू रोज मेसेज करते आज का नाही केलास , बरी आहेस ना , काही प्रोब्लेम आहे का , बोल रिकामी हो. असे म्हणले तर ती रोज मेसेज करणारी मैत्रीण ही आनंदी होईल ना , तिला वाटेल ना की अरे आपण मेसेज करतो तिला रोज reply करणे जमत नाही पण आपण मेसेज केला नाही तर तिने आवर्जून आपली चौकशी केली.
पण याउलट त्या दुसऱ्या मैत्रिणीने काही चौकशी केली नाही , मेसेज केले नाही तर जी रोज मेसेज करणारी आहे ती तिच्या अडचणी मुळे मेसेज करणे थांबविते. यातून एकमेकांच्या विषयी गैरसमज च निर्माण होतात. एखादे वेळेस तरी तिने मेसेज करावा अशी अपेक्षा निर्माण होते.
खरेच असेही काही लोक आहेत की जे फक्त आपली गरज असेल तेव्हा गोड बोलतील , काम असेल तेव्हा गोड बोलतील , वाहवा करतील, मग ऑफिस मध्ये असेल , घरात असेल , जवळची नाती असतील , मैत्री असेल किंवा कोणाचा सल्ला घ्यायचा असेल तरी , किंवा अगदी बायको नवऱ्याकडून कधी पैसे काढण्याकरिता ही चांगले , गोड वागत असते . स्वार्थ साधणारे ही आहेत.
तुमच्याकडून तुमच्या मेहनतीने काढलेल्या नोट्स गोड बोलून वापरून पुढे जाणारे मित्र मैत्रिणी ही आहेत. गरज सरो वैद्य मरो असे वागणारे ही आहेत. तेव्हा ते खरेच आपले आहेत हा गैरसमज दूर होतो. आणि आपण कितीही त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला तरी अपयश च येते. कारण आपण भावनिक गुंततो, आपल्याला नात्याचे महत्व असते. आपल्याला माणसांची गरज असते. आपला स्वभाव माणसांना जपण्याचा , मदत करण्याचा असतो पण समोरच्यांचाचा फक्त गरजेपुरते वापरण्याचा असतो.
त्यामुळे वेळीच खरेच आपले कोण आहे आणि परके कोण आहे हे ओळखायला शिका. पण प्रत्येक वेळी आपल्याच चष्म्यातून इतरांना बघू नका कधी कधी त्यांच्या चष्म्यातून ही बघा. आणि मगच ठरवा. अनेकवेळा सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. सर्ड्यासारखे आपणच आपल्या मनाचे रंग बदलत असतो. आपल्या मूड प्रमाणे समोरच्या व्यक्तीचे वागणे कधी आनंदी , दुःखी , स्वार्थी वाटत असते.
आयुष्य एकदाच मिळते . आहे हे आयुष्य भरभरून जगा .कोणाविषयी मनात शंका , अढी निर्माण करून जगू नका , एखाद्या अनुभवावरून ती वाईट च किंवा चांगलीच असे मत तयार करू नका. सोने खूप तापविले की त्याला योग्य तो आकार देता येतो. तसेच आहे आपल्या लोकांचे , अनुभवांचे पटकन react व्हायची सवय असते आपल्याला. शांत आणि संयम राखा . स्वतः गोंधळून जावू नका. इतरांनाही गोंधळून टाकू नका.
आपला स्वार्थ आडवा आला किंवा समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा वाढल्या , वास्तवाचा स्वीकार केला नाही , तर आपलीच माणसे ही परकी वाटू लागतात. आपले मन आपण निरोगी आणि सुदृढ कसे करायचे याकरिता प्रयत्न करूयात.
आयुष्य सुंदर आहे. बोगद्यातून जाताना डोळ्यावरचा काळा चष्मा काढवा लागतो च.
प्रॉब्लेम्स नसतात कुणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो. असे व. पु. काळे यांनी मांडले आहे.
माणसं जपणे ही एक कलाच आहे आणि ती आत्मसात केली तर सगळे आपलेच आहेत , हा गैरसमज नाही सत्य आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


