सकारात्मक दृष्टिकोन ठेवताना बहरणारे आयुष्य !!
टीम आपलं मानसशास्त्र
परवा वाचनात एक लेख आला त्याचा आधार घेवून काही सकारात्मक गोष्टी लिहीत आहे.
आपले आयुष्य खूप सुंदर आहे. आणि हे खूप मर्यादित आहे. कोणी चिरंजीवी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ आणि उतार हे आहेतच. पण म्हणून त्यात अडकून पडून जगू नका. हे सगळे क्षणिक आहे. दुःख असेल तर त्याचे सुखात रूपांतर करण्याकरिता सतत मनाला बजावा. पूर्वी संत साधू हेच तर प्रयत्न करत ना की कशात अडकून पडू नका. आणि हे ही दिवस जातील हेच ते सांगत.
अर्थात ते त्या पातळीपर्यंत पोहचण्या करिता त्यांना ही सामान्य जीवन आधी जगावे लागले असते. पण सगळे च लोक संत होणे ही शक्य नाही.
पण आपल मन आपण सतत फ्रेश ठेवणे , नावीन्य याचा ध्यास ठेवणे ..आणि सगळ्यात आपला आनंद आपण दुसऱ्यात शोधण्यापेक्षा आपल्या मनाला सतत बजावणे की आपण आपल्या आनंदाची , सकारात्मक गोष्टींची निर्मिती करू शकतो. लोकांच्या मध्ये आपल्याला बदल घडविणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्यात बदल घडवू शकतो.
बरेचदा लोक आपल्याला त्यांच्या मूड प्रमाणे , त्यांच्या प्रायोरिटी प्रमाणे घेतात. काही गोष्टी आपण असे करू तसे करू असे म्हणून तात्पुरती आश्वासने देतात आणि विसरून जातात. अर्थात त्याला कारणे ही असतात. कारण म्हणजे प्रत्येकाला मर्यादा आहेत. त्याच्या priority , कर्तव्य आहेत आणि पैसा हा मर्यादित आणि खर्च जास्त . त्यात व्यक्ती सगळ्यात पहिल्यांदा त्याचा आणि कुटुंब आणि भवितव्याचा विचार करणार .
पण मग ज्यांना कमिटमेंट केल्या असतात त्यांना याचा त्रास होतो. आपले जीवन आणि आपल्या सोबतचे आहेत त्यांचे जीवन हे आनंदी , सुखी , सकारात्मक बनवायचे असेल तर माणसांशी संवाद साधला पाहिजे. मग तो प्रत्यक्ष असेल. किंवा अप्रत्यक्ष .
एक जगावेगळा वनस्पतिशात्रज्ञ आणि त्याने केलेले प्रयोग जसे वनस्पती तसे आपण व्यक्ती वर ही करू शकतो.
आज मी तुम्हाला एका जगावेगळ्या माणसाची ओळख करून देणार आहे. त्याचं नाव आहे ल्युथर बरबँक. हा अमेरिकन वनस्पती शास्त्रज्ञ. गेल्या शतकात होऊन गेला. १८४९ ते १९२६ हा त्याचा जीवनकाल. त्यांचा जन्म अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स प्रांतातला. पण आपल्या प्रयोगांना अनुकूल असलेल्या कॅलिफोर्नियातील सांता रोझा येथे त्यांनी आपल्या वनस्पतींवरील संशोधन कार्याला सुरुवात केली. त्या काळात या माणसाने वनस्पतींवर जे प्रयोग केले आणि त्याचे असे आश्चर्यकारक परिणाम मिळवले की आजही त्याच्यावर आपला विश्वास बसणे कठीण जाते.
त्याला वनस्पतींचा जादूगारच म्हटले पाहिजे. आपल्या अनेक वर्षांच्या परिश्रमाने त्यांनी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे आदींवर प्रयोग करून त्यांच्या जवळपास आठशे नवीन जाती निर्माण केल्या. त्यांच्या नावावर पंधरा पेटंट्स जमा आहेत. खरे म्हणजे त्यांचे कार्य त्याहूनही कितीतरी मोठे आणि विस्तृत आहे.
त्यांनी जी पेटंटस मिळवली, त्यात केवळ प्लम फळांच्या १३३ जातींचा तर लिलीच्या ५० प्रकारच्या जातींचा समावेश आहे. प्लमचा नवा संकरित प्रकार साध्य करण्यासाठी बरबँक यांनी प्लमचे तब्बल ३०,००० प्रकार अभ्यासले. देशी आणि परदेशी वनस्पतींच्या संकरातून नवे, उपयुक्त वनस्पतींचे प्रकार विकसित करणे ही त्यांची खासियत होती.
काटे नसलेले गुलाब, काटे विरहित निवडुंग एकाच झाडावर अनेक प्रकारची फळे आणि फुले ही तुम्हाला त्यांनी जेथे प्रयोग केले त्या सांता रोझामध्ये आजही पहायला मिळतील. त्यांनी अनेक नवीन प्रकारच्या भाज्या, फुले त्यांनी विकसित केली. जी आज अमेरिकेत त्यांच्या नावाने ओळखली जातात.
पण मला तुम्हाला या माणसाचे एक आगळेवेगळे वैशिट्य सांगायचे आहे. हा माणूस म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञाच्या रूपात असलेला संतच. याने केवळ माणसांवरच प्रेम केले नाही, तर पाळीव प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्यावर भरभरून प्रेम केले. इतके की जणू त्यांची भाषा त्यांना समजत होती.
त्यांनी आपल्या बागेत एक गुलाबाचे रोप लावले होते. त्या गुलाबाशी ते रोज बोलत. त्याच्या जवळ बसायचे. म्हणायचे, ‘ अरे, आपण दोघे जरी वेगवेगळ्या रूपात असलो तरी आपला आत्मा एकच आहे. तुला काट्यांची जरुरी नाही. तू आपला हा स्वभाव सोडून दे. जगाला सुगंध आणि सौंदर्य देण्यासाठीच तर तुझा जन्म झालाय ना.
मग काट्यांची आवश्यकता नाही. ‘ हळूहळू या गुलाबाला फांद्या फुटू लागल्या. कळ्या आल्या. आणि त्यांची मोठमोठी गेंदेदार फुले झाली. पण आश्चर्य म्हणजे या झाडावर एकही काटा आला नाही. आपण जसे प्रेमाचे भुकेले असतो, तशीच झाडेही असतात. त्यांच्याशी आपण संवाद साधत गेलो तर आपल्याला हवे तसे परिणाम आपण त्यांच्याकडून मिळवू
शकतो.
हाच व्यक्तींवर केला तर खरेच सुसंवाद आणि त्यातून व्यक्तीमध्ये बदल घडून येतो.
एकदा त्यांनी आपल्या बागेत एक अक्रोडाचे झाड लावले. अक्रोडाच्या झाडाला फळे येण्यासाठी किमान ३२ वर्षे लागतात. ते रोज त्या अक्रोडाच्या झाडाशी बोलत असत. ते त्याला म्हणायचे, ‘ अरे, तुला फळ येण्यामध्ये अडचण काय आहे ? मी तुला सगळ्या गोष्टी देतो आहे. तसे आपण दोघे एकच आहोत.
आणि मला तुझी फळं चाखायची आहेत. पण ३०-३२ वर्षे थांबण्याइतका वेळ माझ्याकडे नाही रे. ‘ आणि त्यांच्या त्या संवादाचा त्या झाडावर अक्षरशः जादूसारखा परिणाम झाला. ते भराभर वाढू लागले. आणि सोळाव्या वर्षीच ते फळांनी बहरले. ती फळेही खूप गोड होती. आणि आता त्याला दरवर्षी फळे येऊ लागली.
तसेच व्यक्तीमध्ये ही परिवर्तन लगेच घडवून आणायचे असेल तर आपण कळत नकळत सतत ते त्या व्यक्ती पर्यंत पोहचविले पाहिजे.
निवडुंगाला काटे असतात हे आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या बागेत त्यांनी काटेविरहित निवडुंग विकसित केला. आता त्याचा वापर जनावरांसाठी खाद्य म्हणून होऊ शकणार होता. त्या निवडुंगाशी देखील ते रोज संवाद साधत असत. ‘ अरे, आता तुला काट्यांची जरुरी नाही. हा आपला स्वभाव सोडून दे.
कुठलीही भीती बाळगू नकोस. मी तुझा मित्रच आहे. ‘ आणि खरोखरच निवडुंग काटेविरहित झाला. ज्या झाडांना फळे येण्यासाठी अनेक वर्षे लागतात, त्या झाडांवर कलम करून त्यांनी खूप लवकर फळे प्राप्त केली. शिवाय त्यांच्यातील चांगले गुणधर्म असणारी झाडे विकसित केली. त्यांच्यातील नको असणारे गुणधर्म टाळले.
तसेच जर व्यक्ती मध्ये बदल घडवून आणताना त्याला चुकीचे मार्ग आहेत त्यावर जावू नको. द्वेष , तिरस्कार सोडून दे..आणि इतरांकडून अपेक्षा सोडून स्वतः मध्ये ताकद आणि क्षमता निर्माण कर. तर नक्की तो खूप ताकदवान होवून प्रगती करेल.
भारतातील थोर महर्षी स्वामी योगानंद हे बरबँक यांच्या सांता रोझा मध्ये त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. ते पुढे या थोर अमेरिकन शास्त्रज्ञाकडे आकर्षित झाले. बरबँक सुद्धा स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले. त्यांनी स्वामींकडून क्रियायोगाची दीक्षा घेतली. आणि पुढे आयुष्यभर त्या प्रमाणे आचरण केले.
बरबँक ही निसर्गाशी अतिशय एकरूप झालेली व्यक्ती होती. त्यामुळे निसर्गाने आपली काही रहस्ये आणि गूढ शक्ती त्यांना आधीच प्रदान केली होती. त्यांची आई अतिशय श्रद्धाळू ख्रिश्चन स्त्री होती. पण तिच्या निधनानंतर तिच्या अस्तित्वाचा आभास त्यांना आपल्या या दिव्य शक्तीद्वारे होत असे. किंवा त्यांच्यात बोलणेही होत असे.
स्वामी योगानंदांना त्यांच्या बागेतील निवडुंगाचे एक रोप हवे होते. तेव्हा बरबँक यांच्या बागेतील एक कामगार ते तोडू लागला. लगेच बरबँक यांनी त्याला थांबविले. ते स्वतः त्या झाडाजवळ गेले. त्याच्या काही फांद्या त्यांनी त्या झाडाशी बोलत हळुवारपणे तोडल्या. ते त्या झाडाला म्हणत होते, ‘ अरे, मी तुला तोडतो आहे असे समजू नकोस.
तर तुझा आणखी विकास आणि विस्तार होण्यासाठी मी तुला दुसरीकडे पाठवतो आहे. तेव्हा तू आनंदाने जा. आपला संबंध इथे संपणार आहे असे समजू नकोस. तुझे आणि माझे नाते कायम राहील. ‘ मग त्यांनी त्या निवडुंगाच्या काही फांद्या स्वामीजींजवळ दिल्या. आणि नंतर त्या उत्तम प्रकारे लागल्या.
आयुष्यात पुढे जाताना अनेक लोकांना नाईलाजाने मागे सोडावे लागते पण तेव्हा नवे लोकही आयुष्यात नकळत जोडले जात असतात..आणि मागे सोडून गेलो म्हणजे त्यांचा संबंध कायम संपला असे नसते तर प्रगती करिता. विकास होण्याकरिता ती गरज असते. मुलांना पुढील शिक्षकणाकरिता दुसरीकडे पाठवावे लागते. तर कधी स्वतः प्रगती करण्याकरिता दुसरीकडे जावे लागते.
दुःख असते सोडून जाण्याचे पण दुसरीकडे प्रगती होत असते. त्या दुःखाचा विचार सकारात्मकतेने करा. नवीन संधी , नवीन गोष्टी शिकता येतात. नवी माणसे जोडली जातात. जुनीच माणसे थोड्या स्पेस मूळे नव्याने समजतात. विकास , क्रांती होत असताना काही गोष्टी मध्ये बदल हा घडवून आणावाच लागतो.
मग ती विचारांची क्रांती असो , अथवा प्रगती ची. अथवा नाविन्याची. तुम्ही तुमच्या बाजूने चांगल्या सकारात्मक विचारांचे परिवर्तन आणि देवाणघेवाण तुमच्या समोरच्या व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणते आणि आयुष्य positive गोष्टी नी बहरताना दिसते. व्यक्ती आनंदी , उत्साही , सुखी , प्रगती करताना , नावीन्य आणि शांतता याने समृध्द होतो.
आपल्या ‘ द ट्रेनिंग ऑफ द ह्युमन प्लॅन्ट ‘ या पुस्तकात ते म्हणतात, ‘ आपल्या शिक्षण पद्धतीत नवीन प्रकारच्या बदलांची जरुरी आहे. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मी जसे फळे आणि फुले यांच्यात उच्च प्रतीचे गुणधर्म आणण्याकरिता काही धोक्याचे आणि धाडसाचे प्रयोग केले. पण त्यात मला यशही आले. शिक्षण पद्धतीत अशाच नवनवीन आणि धाडसाच्या सुधारणा कराव्या लागतील. ‘ आज आपण, आपली मुले आणि आपली शिक्षणपद्धती निसर्गापासून दूर जाते आहे या गोष्टीची त्यांना खंत वाटत होती.
थोडक्यात सांगायचे तर बरबँक यांनी निसर्गावर प्रेम केले, संवाद साधला. कबीरांच्या भाषेत सांगायचे तर ‘ ढाई अक्षर प्रेमका ‘ हाच त्यांचा मंत्र होता. या मंत्रामुळे आपण फक्त माणसाशीच नव्हे तर निसर्गाशी सुद्धा संवाद साधू शकतो. त्याच्यात हवा तसा बदल घडवून आणू शकतो. आपणही प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ?
आता प्रत्येक व्यक्तीची काही तरी अपेक्षा असते पण ती चांगली असो . तर वाईट नाही . आणि ती पूर्ण झाली नाही तर त्रास होतो त्या व्यक्ती ला आणि तिच्या सोबतच्या इतर व्यक्तींना ही. मर्यादा असतात. आर्थिक असतील , स्पर्धा , शैक्षणिक , परिस्थिती , किंवा नशीब साथ देत नसेल.
प्रत्यक्ष संवाद साधत रहाच. पण त्या व्यक्तीला अप्रत्यक्षरीत्या ही positive vibes पाठवत रहा. आयुष्यात जे आहे त्याकडे ही बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि जे पाहिजे त्याकरिता तुमचे प्रयत्न योग्य दिशेने जावोत ही सदिच्छा ठेवा. तुमची योग्यता वाढू देत. आणि नशीबाची ही साथ .
मुले परीक्षेला जाताना पालक आशीर्वाद आणि शुभेच्छा देत असतात. पेपर चांगला जावो. All d best. चांगला जाईल पेपर . यामागे हीच सकारात्मक भावना , दृष्टिकोन आणि positive vibes तर आपण पाठवत असतो. आणि मुलांना ही हा मानसिक आधार वाटतो आणि ते आत्मविश्वासाने पुढे जातात. आणि परिणामी पेपर चांगला जातो.
सांगायचे तात्पर्य काय प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून बघत असतो . म्हणूनच जे चांगले आहे , योग्य आहे हे ठरविणे अवघड पण त्यात ही सर्वसामान्य असे काही योग्य आणि अयोग्य असे distribution केले आहेच. आणि प्रत्येकाचा बरा वाईट अनुभव हा अंदाज घेण्याकरिता उपयोगी पडतो.
त्यातून चांगल्या करिता मनात सतत चांगले , सकारात्मक विचार करा. मग समोरच्या व्यक्ती मध्ये सुधार व्हावे याकरिता ही मनात सतत चांगल्या आणि सकारात्मक भावना , vibes , त्याच्यात जे बदल घडून यावे वाटतात ते खूप strongly pass करा. त्यात दोष सतत मांडत बसू नका. तसे झाले तर दोष च वाढतील.
आयुष्य सुंदर आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या प्रती आपले ही कर्तव्य आहे. एका व्यक्तीने जरी एका व्यक्ती करिता चांगले होण्याची कामना मनापासून केली .तशी सतत सकारात्मक विचारांची निर्मिती केली आणि ते vibes पोहचविले तर नक्की समाज खूप चांगला घडेल .
सकारात्मक दृष्टिकोन ठेवताना बहरणारे स्वतः चे आणि आपल्या सोबत इतरांचे ही आयुष्य सुंदररित्या फुलविण्यास मदत करते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


