संवाद आपलाच आपल्याशी थांबला की खूप एकटेपणा जाणवतो….!!
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
आजुबाजुला इतक्या गोष्टी घडत असतात की कधीकधी आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही.आणि त्याच गोष्टींचा आपल्या आयुष्यावर , मनावर कळत नकळतपणे परिणाम होत असतो.आपलं आयुष्य हे काही संथपणे वाहणारं आयुष्य राहीलं नाही. समुद्राच्या लाटा एकमेकांवर जशा एकामागून एक आदळत जातात तसच हे आयुष्य झालय.
आणि अशा या धकाधकीच्या जीवनात आपलाच आपल्याशी संवाद हा अजाणतेपणे थांबतो.आपण इतरांच्या दुनियेत इतके हरवतो की त्या दुनियेत आपण स्वतःसुद्धा आहोत हे विसरून जातो.आणि दुसऱ्याशी जसा संवाद साधणं गरजेचं असतं तसच स्वतःशी संवाद साधणही तितकच महत्त्वाच असतं. ‘आत्मसंवाद’ नावाची काही संकल्पना असते हे या रोजच्या धावपळीच्या जीवनात असं सहजपणे कुणीही म्हणजे अगदी कुणीही विसरू नये.
आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलत नाही. संवाद साधायच सोडून देते.तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. हळुहळू आपली माणसं आपल्याशी संवाद साधत नाही याची जाणीव होऊन एकटेपणा जाणवतो.अगदी तसच….आपल्या सर्वात जवळची व्यक्ती कोण असेल तर ती आपण ‘स्वतः’ आहोत. आणि आपला आपल्याशीच जेव्हा संवाद थांबतो तेव्हाही असाच किंवा याहून जास्त एकटेपणा आपल्याला जाणवत असतो.मन चलबिचल होऊन एका जागेवर मुळीच स्वस्थ बसत नाही.
संवाद आपलाच आपल्याशी थांबला की खूप एकटेपणा जाणवतो….हे त्यादिवशी घडलेल्या प्रसंगामुळे मला अगदी तंतोतंत लक्षात आलं.कसं ते पाहुयात———
ढग काळे दाटून आले…
तो बरसला नाही…
तोच तो छळणारा एकटेपणा तो अजूनी विसरला नाही…!!
कळलेच नाही असा कसा हा संवाद थांबला
नयनाश्रुंचा पूरही ओसरला नाही…!!
संवाद….अव्याहत, अविरत, निरंतर चालणारा हा संवाद त्यादिवशी मात्र अचानक थांबला………एका उदास वळणावर…!!
‘स्वामी विवेकानंद’ यांनी खूप सुंदर सांगितलय—की—- “Talk to yourself once in a day. Otherwise , you may miss a meeting with an excellent person in this world” आणि हेच निहार मला आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना सांगायचा. कारण आम्ही नेहमी आमच्या धुंदीत असायचो.पण निहार मात्र कधी वेळ काढून स्वतःशीच तासनतास मनमोकळ्या गप्पा मारायचा.
सुसंवाद साधायचा.पण अचानक त्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे तो स्वतःशी संवाद साधणच विसरून गेला होता. आमच्यासोबतही तो फारसा वेळ घालवत नव्हता. त्याच्याकडे पाहिल्यावर तो उदास आणि एकटा एकटा भासायचा.त्याच्याकडे पाहून समजत होतं की त्याचा त्याच्याशीच संवाद साधणं किती गरजेचं आहे.कारण त्याचा एकटेपणा हा त्याशिवाय लुप्त होणार नव्हता.
मावळत्या संध्याकाळी त्या समुद्रकिनारी शांतपणे स्वतःशीच संवाद साधणारा , धावपळीतून स्वतःसाठी हक्काचे चार क्षण बाजूला काढणारा निहार इतरांच्या विश्वात इतका गढून गेला होता की स्वतःला तो जवळजवळ विसरलाच होता.त्याला त्याक्षणी खरच स्वतःशी संवाद साधण्याची खूप गरज होती. पण ते शक्यच झालं नाही. हळुहळू त्याचा एकटेपणा वाढतच गेला.
मित्रांनो , आपण आयुष्यात काय गमावलं…?काय कमावलं..? कुठे आणि काय चुकलं..?? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आपल्या स्वतःकडेच असतात.आणि ति उत्तरं शोधण्यासाठी स्वतःशी संवाद खूप महत्त्वाचा असतो. मी ठीक आहे.मी मजेत आहे. मी बरा आहे…….हे जे काही असतं ते केवळ आपल्या स्वतःला माहीत असतं.स्वतःशी बोलणं झालं की जगण्यातला एकटेपणा थोडा दूर होऊन डोक्यावरची ओझी थोडी का ते हलकी होतात.मी आज हे केलं…
मी आज इथे चुकलो…आजचा दिवस खरच काय सुंदर होता…आज मी हे करून दाखवलं….या अशा गोष्टी आपण स्वतःला सांगताना एका वेगळ्याच भूमिकेत असतो.एका दीर्घ श्वासानंतर हुश्श होऊन…आज जरा बरच बरं वाटलं स्वतःशीच बोलून….!! हे आपण अगदी सहज बोलून जातो.इतका आधार वाटतो नं तेव्हा स्वतःचाच स्वतःला…पण जेव्हा हाच संवाद जेव्हा थांबतो तेव्हा मात्र अगदी एकट एकट वाटायला लागतं….आजुबाजुला कितीही जवळची माणसं असली तरीही मन मनालाच खात रहातं.
माझा माझ्याशीच संवाद थांबला ही गोष्ट सहनच होत नाही….त्यामुळे हा आपल्याशीच आपला मोकळा संवाद होणं आवश्यक आहे.. नाहीतर सगळं असूनही एकटेपणा वाढत राहील….. जाणवत राहील.दुसऱ्याशी जितका संवाद महत्त्वाचा तितकाच आत्मसंवादही महत्त्वाचा असतो हे लक्षात घेऊन एकदा तरी स्वतःशी संवाद साधत रहा….तो थांबू देऊ नका…संवादाशिवाय हे आयुष्य अपूर्ण आहे. संवाद नसेल तर आयुष्य अबोलीसारख अबोलच भासेल……!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


