संमोहन शास्त्राबद्दल या ५ गोष्टी आपल्याला माहिती आहेत का ?
टीम आपलं मानसशास्त्र
संमोहन शास्त्र हि एक मानसशास्त्रातीलच एक उपशाखा आहे. या शास्त्राबद्दल अनेकांच्या मनात कमालीचे कुतूहल पहायला मिळते. अनेक देशी-परदेशी चित्रपटांमधून देखील संमोहन शास्त्र आणि त्याचे बारकावे आत्तापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत.
या शास्त्राबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल जरी असले तरी हे शास्त्र समजून घेणे हे फार क्लिष्ट आहे. कारण या शास्त्राचा थेट संबंध अबोध मनातील (Unconscious Mind) मनोव्यापारांशी आहे. ज्या अबोध मनाबद्दल मानव अनभिज्ञ आहे.
त्यामुळे या संमोहन शास्त्राबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज जास्त पसरलेले आहे. ते पाहूया..
१) संमोहन शास्त्र हे काहीच कामाचे नाही.
खरं पाहायला गेलं तर संमोहन हे सर्वांसाठीच उपयुक्त असे शास्त्र नाही. तसेच त्याने व्यक्ती लगेचच बरा होईल, हे सुद्धा सांगता येत नाही. काही ठराविक मानसिक स्थितीत व्यक्तीला या शास्त्राचा नक्कीच फायदा होतो.
जसे कि, चिंता. डिप्रेशन, PTSD, मनोशारीरिक आजार इत्यादी.
२) प्रत्येक व्यक्ती संमोहित होते.
ज्या व्यक्तीची पकड तिच्या मनावर सर्वात अधिक आहे, त्या व्यक्तीला संमोहित होण्यास पुष्कळ वेळ लागू शकतो. तसेच काही व्यक्ती तर संमोहित सुद्धा होत नाहीत. याचा अर्थ असा नाही कि ती व्यक्ती कधीच संमोहित होऊ शकत नाही. मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत गेल्यानंतर संमोहित होण्यास मदत मिळते.
म्हणजेच उपचाराची गरज असेल त्या वेळी ती व्यक्ती खरंच संमोहित होईलच याची काहीच शाश्वती नसते. अर्थात हे संमोहन करणाऱ्या तज्ञांवर सुद्धा अवलंबून आहे.
३) संमोहित झाल्यानंतर व्यक्तीकडून हवं ते करता येतं.
या विधानाला तूर्तास तरी कोणतेही तथ्य नाही. एकदा व्यक्ती संमोहित झाली कि ज्या सूचना तिला दिलेल्या असतात केवळ तेवढ्याच गोष्टींबद्दल ती व्यक्ती आपल्याला प्रतिसाद देईल. पूर्णतः प्रत्येक गोष्ट ती आपली ऐकलंच हा दावा खोटा आहे.
४) विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती पटकन संमोहित होतात.
हे विधान जरी खरे असले तरी याला सुद्धा एक दुसरी बाजू आहे. पटकन विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती एका ठराविक अवस्थेत उलट सुद्धा वागायला लागतात. म्हणजेच एखादी संमोहन करणारी स्थिती विश्वास ठेवण्यासारखी नसल्यास या विश्वास न ठेवण्यासाठी जास्त संवेदनशील होऊ शकतात.
म्हणून हळव्या मनाच्या, पटकन विश्वास ठेवणाऱ्या सगळ्या व्यक्ती संमोहित होत नसतात.
५) कुतूहल म्हणून संमोहन शिकायला हवं.
वर उल्लेखलेल्या प्रमाणे संमोहन हे अतिशय क्लिष्ट असे शास्त्र आहे. काही विशिष्ट ठराविक लोकांनाच अत्यंत सफाईदारपणे या शास्त्राचा वापर करता येतो. संमोहनाच्या संकल्पना अर्धवट शिकलेल्या व्यक्ती किंवा अति आत्मविश्वासात असणाऱ्या व्यक्ती खूप गंभीर समस्या निर्माण करू शकतात. म्हणून संमोहनाकडे कुतूहलाने पाहण्यापेक्षा एक आव्हानात्मक शास्त्र म्हणून पाहायला हवं.


