शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा.
हर्षदा नंदकुमार पिंपळे
शब्द…शब्द… शब्द….!
प्रत्येकाची कोणती ना कोणती एक अशी जागा आपल्या आयुष्यात आहे. आपण बोलतो , बोलताना शब्द बाहेर पडतात आणि त्याच शब्दांमधून आपल्या भावना व्यक्त होत असतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शब्दांचं असं एक विशिष्ट स्थान आहे.
शब्द
कधी हसवतात
कधी फसवतात
कधी रडवतात
कधी घडवतात…
तर कधी हेच शब्द
विस्तीर्ण अशा आयुष्याला
एका चिमटीतही पकडतात…!!
खरचं , हे शब्द म्हणजे विचित्र असं रसायनच आहे. समजून घ्यावं तितकं कमीच आहे.या शब्दांची ताकद म्हणजे हजार हत्तींच बळ असतं.शब्दांमध्ये गोष्टी बदलण्याची प्रचंड ताकद असते.शब्द हे धारदार शस्त्रासारखे असतात तर कधी अगदी रेशमी वस्त्रासारखे असतात. त्यामुळे नेहमी शब्द जपून वापरले पाहिजेत असही म्हंटलं जातं.कारण एकदा बोललेला शब्द आपल्याला मागे घेता येत नाही.इतकच नाही तर आपण एखाद्याला शब्द देतो की मी हे करेन – ते करेन…
इतरांच्या मनात एक वेगळीच आस आपण एखादा शब्द देऊन निर्माण करत असतो.पण आपण कितपत ती निर्माण केलेली आस पूर्ण करतो….? सहसा आपल्याकडून केवळ आस निर्माण केली जाते.पण आपण साथ द्यायची मात्र विसरतो.मान्य आहे की , दोन-चार चांगल्या शब्दांनी आधार मिळतो.पण त्याच केवळ आधारापेक्षा साथ दिली तर समोरच्या व्यक्तीला लढायला बळ मिळेल. एक सार्थ असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होईल.
‘Actions speaks louder than words’ असं म्हंटलं जातं.हे अगदी खरं असलं तरीही ते किती जण आपल्या आयुष्यात तंतोतंत पाळतात ते काही माहीत नाही. कारण कित्येकजण केवळ शब्दांचे खेळ खेळतात. शब्दांच्या झालरीमध्ये इतरांना गुंडाळायच कसं हे कित्येकजणांना खूप छान जमतं.कधी कधी एखाद्याला दुसऱ्यासाठी करायची काही इच्छाच नसते.पण काही करायच म्हणून ते एखादा शब्द देऊन आस निर्माण करतात. आणि नंतर मात्र ‘मी कधी असं बोललो’ असं बोलून तीच माणसं बिंधास्त पाठ फिरवून निघून जातात.
आयुष्यात कितीतरी प्रसंग असे येतात जेव्हा आपली जगण्याची किंवा काही करण्याची इच्छा मरगळलेली असते.सगळ्या आशा आकांक्षा गळून पडलेल्या असतात तेव्हा मात्र आपल्या आयुष्यात अचानक कुणीतरी येतं आणि आपल्याला ‘मी आहे , नको काळजी करू…मी करेन काहीतरी ‘
असं बोलून नवीन आस आपल्यात निर्माण करतो.पण ऐनवेळेला आपण त्याला जेव्हा आवाज देतो तेव्हा मात्र त्याचा उपयोग केवळ शून्य असतो.उगाचच एखादी आस निर्माण करून ही माणसं निघून जातात… साथ द्यायला त्यांचे हात का कोणास ठाऊक पण कचरतात. कधी कधी वाटतं अशी खोटी आस निर्माण करून अविश्वास तरी का दाखवतात ही माणसं…?
कुणीतरी ती आस घेऊन कळत नकळतपणे जगत असत याचं भान आस निर्माण करणाऱ्या प्रत्येकाला हवं.कारण केवळ आस निर्माण करणं महत्वाच नसतं.महत्वाची असते ती साथ…तो विश्वास…!
उदाहरण सांगायच झालं तर…
एक बाई एकदा असच वणवण भटकत होती. तिच्या आयुष्यात विचीत्र असं कोलाहल माजलं होतं.तिला काय करावं काही सुचेनासं झालं होतं.अशातच तिला कुणीतरी शब्द देतं….आणि तोच शब्द अर्ध्यावर सोडून जातो.अशावेळी तिची अवस्था काय झाली असेन याची कल्पना तर आपण नक्कीच करू शकतो.कारण तिने त्या शब्दांवर विश्वास ठेवलेला असतो.
तिच्या मनातही कुठेतरी आस असते , विश्वास असतो की समोरचा आपल्याला काहीतरी सोबत करेन.पण जेव्हा हाच विश्वास चुकीचा ठरतो तेव्हा मात्र मनाची अवस्था बिकट झालेली असते.आस निर्माण करून पाठ फिरवण्याला काहीच अर्थ राहत नाही.
ही झाली एक बाजू…पण काही असेही असतात की ते शब्द देऊन आस निर्माण करतात आणि वेळेला साथही देतात. एक नवा विश्वास ते निर्माण करतात.
म्हणूनच..एकवेळ शब्द देऊन आस निर्माण करू नका…पण साथ देऊन विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा.कारण त्या विश्वासाच्या जोरावरच कितीतरी जणं आयुष्य जगत असतात.
आणि महत्वाच म्हणजे कुणी आपल्याला शब्द देईल , साथ देईल याचा विचार करण्यापेक्षा किंवा त्या शब्दांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपणच आपले प्रयत्न केले पाहिजे. आपणच आपल्यामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. कारण आयुष्य आपलं आहे.इतरांच्या सोबतीची वाट किती काळ बघणार…. नं…?
कधी कधी कुणी मुद्दाम तसं वागतं तर कधी कधी कुणाकडून नकळतपणे घडून जातं. so…एकच सांगेन की, तुम्ही स्वतःही इतरांशी असं वागू नका.आणि स्वतःवरही कधी अशी वेळ आली तर स्वतःच स्वतःची सोबत होऊन स्वतःमध्ये विश्वास निर्माण करायचा प्रयत्न करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Lekh khup chan ahe