“व्यक्ती मेंटली आजारी असेल तर ती स्वतःला उध्वस्त करून घेते..”
मधुश्री देशपांडे गानू
“मना तुझे मनोगत मला कधी कळेल का??
तुझ्या परी गूढ-सोपे होणे मला जुळेल का??”
“कळत-नकळत” या मराठी चित्रपटातील श्री. सुधीर मोघे यांनी शब्दबद्ध केलेले एक अप्रतिम गीत. खरंच आपलंच मन पूर्णपणे आपल्याला कळलंय का? किती गूढ आणि अनाकलनीय वाटतं ना हे मन कधी कधी! नको त्या गोष्टींचा किती विचार करत असतं.. कधी आभाळाएवढं विशाल तर कधी मातीच्या सूक्ष्म कणाएवढं.. कसं सांभाळायचं हे मन?? त्याचं मनोगत खरंच कळतं का आपल्याला??
साधारणपणे ज्या विचार प्रक्रियेत माणसाला दीर्घकाळ छान वाटत राहतं ती मानसिक अवस्था त्याला आवडत असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या Comfort Zone” मध्ये राहायला आवडतं. ही चौकट मोडून बाहेर पडायला नाही आवडत कोणालाही. त्याच्यावर झालेले संस्कार, आई-वडील, नातलग, मित्र मैत्रिणी, सहकारी यांच्याशी असलेले आधारदायी व स्थिर नातं, समाजाप्रती असलेली बांधिलकी, स्वतःच्या आत्मप्रतिमेविषयी असलेली जागरूकता, स्वतःच्या इच्छा, स्वप्नं यांना पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न मेहनत यासाठी जाणीवपूर्वक कृती, प्रसंगांना धीराने सामोरं जाणं, स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्तीचा योग्य आदर राखणे, जीवनमूल्यांचा आदर करणे अशा अनेक स्तरांवर मनाचे आरोग्य अवलंबून असते.
आता या जाणिवा ज्याच्या शाबूत आहेत, स्थिर आहेत अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या आरोग्यपूर्ण असते. कोणीही आदर्श, अचूक, सर्वगुणसंपन्न नसतो. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात गुणदोष प्रत्येक व्यक्तीमध्ये असतातच. पण ते तुमच्या जीवन प्रवासात बाधा ठरत नाहीत. स्वतः मधले दोष ओळखून त्यात सुधारणा करण्याची तयारी असणं, जीवन मूल्य जोपासण्यासाठी प्रयत्नशील असणं हे मानसिक सुदृढता दर्शवतं.
पण सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. याला अनेक दृश्य-अदृश्य कारणं असतात. कोणतीतरी केव्हांतरी घडलेली लहानशी घटना, प्रसंग तुमच्या मनावर किती खोल आणि दूरगामी परिणाम करेल हे सांगता येत नाही. आजूबाजूची परिस्थिती, येणारे अनुभव, तुमचे नातेसंबंध, सामाजिक आर्थिक स्तर अशा अनेक बाह्य गोष्टींनी हा परिणाम होत असतो. पण तुमचं मनच कमकुवत असेल तर! मनाच्या अंतर्गत कमकुवतपणामुळे मग तुम्ही या सगळ्या गोष्टींना समर्थपणे सामोरे जाऊ शकत नाही. आणि तुमचे मानसिक आरोग्य बिघडते.
“मन हे अगदी एखाद्या खोल डोहाप्रमाणे आहे.” तळ गाठणंही कठीण आणि तळाशी काय काय साचलंय हे समजणंही कठीण..एक उदाहरण घेऊ. एक लहान मुलगी, आपल्या नोकरी करणार्या आईला आज तू कामावर जाऊ नको असा हट्ट धरून बसते. पण आईला तर जावंच लागणार असतं. मुलगी खूप हट्ट करते. अगदी आईचे पाय धरून ठेवते. तरीही कशीबशी समजूत काढून आई कामाला निघून जाते.
हा प्रसंग त्या मुलीच्या मनात इतका खोलवर परिणाम करतो की तिच्या कळत्या वयात आणि नंतर आयुष्यभरही ती स्वतःच्याच आईशी नीट सहज वागू शकत नाही. तिच्या मनात तो सल कायमस्वरूपी राहतो आणि तिच्या प्रत्येक वागणुकीत तो दिसतोच. खरंतर काळानुसार आणि प्रगल्भ विचारांनी या घटनेची तीव्रता कमी व्हायला हवी. पण त्या मुलीला ते आजही जमत नाही. आणि आई आणि मुलीचं नातं कायमचं उध्वस्त होतं. दुसरा एक अगदी सहज येणारा अनुभव.
अनेकदा तुमचे मित्र मैत्रिणी किंवा कोणी नातलग यांना तुम्ही फोन केलात, तर ते फक्त स्वतःचं रडगाणं ऐकवतात. प्रत्येक वेळी त्यांच्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टीच उगाळत राहतात. अशावेळी आपल्याला ऐकावासं वाटत नाही. आपल्या मनालाही नकळत उदासीन वाटू लागतं.
आज भरधाव आयुष्य जगताना अनेक लहान मोठ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागतं. प्रचंड ताण, स्पर्धा, सामाजिक आर्थिक टिकून राहण्याची धडपड, नातेसंबंध टिकवताना होणारी ओढाताण अशा अनेक गोष्टींनी माणूस ग्रासला आहे. मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीर सक्षम आरोग्यपूर्ण असेल तर एक वेळ मानसिक बळ येतं, आत्मविश्वास येतो. पण मन जर आजारी झालं तर मात्र शरीर अनेक आजारांनी पछाडलं जातं. आज मानसिक आजार जडलेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे. मानसोपचारतज्ञ, समुपदेशक यांचं काम खूपच वाढलं आहे. आजही मानसिक आजारांकडे गांभीर्याने आणि तत्परतेने पाहिलं जात नाही. कारण नुसतं शहाणपण सांगून उपयोग नसतो. तर योग्य आणि त्वरेने उपचार घेण्याची गरज असते.
मानसिक आजारी व्यक्तीला काहीही करावसं वाटत नाही. दैनंदिन कामं जमत नाही. एकलकोंडी होतात. समाजात मिसळणं, बोलणं जमत नाही. नैराश्य, निद्रानाश, अतिविचार, अस्वस्थपणा, असंबंद्ध बोलणं, चिडचिड, ताळमेळ न बसणारी वर्तणूक अशी अनेक लक्षणे दिसून येतात. कधीकधी अशा व्यक्ती हिंसकही होतात. शेवटी आत्महत्येचे विचार प्रकर्षाने येतात. आणि एखाद्या टोकाच्या क्षणी आत्महत्या घडतात ही.
अशा व्यक्ती स्वतःचे आयुष्य उध्वस्त करतातच पण त्यांची आपली जवळची, प्रेमाची माणसं त्यांचेही आयुष्य यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येते. या आजारी व्यक्ती दुराग्रही असतात. आपलं चुकतंय याची जाणीव नसते आणि असली तरी ही मान्य करत नाहीत. आपल्याला उपचाराची गरज आहे हेही मान्य करत नाहीत. त्यांना तो त्यांचा अपमान वाटतो. मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे “वेडं असणं” असा एक गैरसमज आहे. जो अगदीच चुकीचा आहे.
अशा वेळी कोणतीही भीड , लाज न बाळगता योग्य उपचार पद्धती घेणे, वास्तवाचा स्वीकार करून मला बरं व्हायचंय आणि त्यासाठी वेळ द्यायचा आहे या दृष्टिकोनातून योग्य ते बदल हळूहळू स्वतःमध्ये करणं हे खूप गरजेचे आहे. घरातील व्यक्तींनीही अशा मानसिक आजारी व्यक्तींना प्रेमाने सांभाळायला हवं. त्यांना अपमानास्पद वागणूक न देणे खूप महत्त्वाचं आहे. योग्य त्या उपचारांनी मानसिक आजार बरे होतातच. फक्त तुमची इच्छाशक्ती हवी. “आपलं मन शुद्ध, निर्मळ, नितळ करण्याची जबाबदारी आपलीच आहे.. हो ना!”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


