Skip to content

व्यक्तीचा स्वभाव तेव्हाच बदलतो, जेव्हा त्याची बाजू कोणी समजूनच घेत नाही.

व्यक्तीचा स्वभाव तेव्हाच बदलतो, जेव्हा त्याची बाजू कोणी समजूनच घेत नाही.


गीतांजली जगदाळे


जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला स्वतःचा असा एक स्वभाव आहे. प्रत्येकाच अद्वितीय (unique) अस व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या स्वभावांत, विचारांत खूप वेळा भिन्नता जाणवते. पण तरीही जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो, काही ठरवतो किंवा काही करतो तेव्हा समोरच्या माणसाने किंवा कोणीतरी का होईना आपल्याला त्यासाठी समजून घ्यावं एवढी माफक अपेक्षा मात्र असते.

काही वेळा आपले निर्णय, आपल्या गोष्टी समोरच्याच्या विचारांपेक्षा कितीही वेगळ्या असल्या तरी त्या समजून घेतल्या जातात. मात्र प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही. आणि कधी कधी तर काही लोकांच्या आयुष्यात जास्त प्रमाण न समजून घेणाऱ्या लोकांचं च असत.

कधी कधी माणसाला आयुष्यात काही निर्णय नाईलाजास्तव घ्यावे लागतात किंवा कधी तो मनासारखं जगता यावं म्हणून ही काही गोष्टींची निवड करत असतो पण त्यावेळी त्याला कोणीतरी समजून घ्यावं अस वाटत असत पण जेव्हा तसं होताना दिसत नाही तेव्हा मात्र त्याला थोडा त्रास होतो, वाईट वाटत आणि हीच गोष्ट जेव्हा वारंवार घडताना दिसते तेव्हा मात्र त्याचा परिणाम स्वभावावर होताना दिसतो.

उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी आपल्या करिअर ची निवड आपल्याला दहावी, बारावीला मिळालेल्या गुणांकडे बघून न करता, किंवा आई वडील सांगतायत त्या शाखेकडे न जाता आपली आवडीची शाखा निवडतो तेव्हा काही पालक त्यांना समजून घेत नाहीत. पण असं एकदाच घडलं तर फार काही बिघडत नाही पण जेव्हा असं सतत घडत राहतं, त्या मुलांच्या निर्णयांवर कधी विश्वास दाखविला जात नाही तेव्हा मात्र त्या मुलांच्या मनावर, स्वभावावर याचा परिणाम दिसायला लागतो आणि तो नक्कीच चांगला नसतो.

यामुळे कधी-कधी व्यक्तीच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. कारण कोणताही निर्णय घेण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीला समोर जाण्यासाठी मानसिक आधाराची गरज असते. तो काही वेळा मिळत नसला तरी चालून जात पण नेहमी नेहमी तसं होत असल्यास त्याचा खोलवर परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर होऊ शकतो.

आता एक दुसरं वेगळं उदाहरण बघूया.. एक कुटुंब आहे, त्यात आई ही गृहिणी आहे, बाबा बाहेर काम करतात आणि त्यांना दोन छोट्या मुली आहेत. पण बाबांचा पगार कमी असल्यामुळे बाबाना फार पैसे घरात देता येत नसतात. पण अशा वेळी होतं, अस की आईला असं वाटत की घरात सामान भरायचंय, मुलींच्या शाळेची फी भरायचीये, सण येतोय त्यामुळे आणखीही थोडे फार खर्च आहेत, त्याच बरोबर मुलींना वाटत,

आता सण येतोय म्हंटल्यावर आई बाबांनी आपल्याला छान नवीन कपडे घ्यावेत. बाबांना ही हे सगळं द्यायची इच्छा आहे पण पैशानं अभावी हे सगळं देता येत नाहीए. आयुष्यभर काबाड कष्ट केलेल्या त्यांच्या बायकोला त्यांना हे सांगताही येत नाहीए आणि मुली लहान असल्यामुळे त्यांना सांगावस वाटत नाहीए. पण तरी अशावेळी त्यांची परिस्थिती कोणीतरी समजून घ्यावी असं त्यांना वाटत असत. पण तसं कोणी नसल्याने त्यांची चिडचिड व्हायला लागते, बाकीचं बोलणं-चालणं, व्यक्त होणं यात फरक पडतो आणि घरच सगळं वातावरणच बदलून जात.

पण कधी कधी काही वेळा या न समजून घेण्याचा दोष कोणालाच देता येत नाही कारण प्रत्येक व्यक्ती काही वेळा आपापल्या जागी योग्य असतो. मग सगळेच योग्य असल्यावर समजून कोण घेणार आणि कसं?

पण अशा वेळी जर आपण थोड्या वेळापुरतं का होईना आपली जागा सोडून त्या माणसाच्या जागेवर उभं राहून त्याच्या बाजूने विचार केला तर कदाचित नेहमी नाही पण काही वेळा तरी आपल्याला त्याला समजून घेता येईल. आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं याची गरज प्रत्येकाला आयुष्यात जाणत्या न कोणत्या टप्प्यावर पडतेच.

आता वर पाहिलेल्या उदाहरणांवरून जर त्या मुलाच्या आई वडिलांनी त्याच्या जागी उभा राहून विचार केला की याला हेच निवडणं का गरजेचं वाटलं तर कदाचित ते त्याच्या निर्णयाची रिस्पेक्ट तरी करू शकतील मतभेद जरी राहिले तरी त्याची बाजू समजल्यावर त्याला प्रोत्साहन देऊ शकतील. आणि इकडे बायकोने जर आपल्या नवर्याच्या बाजूने थोडा विचार केला तर आपला नवरा पैसे असून सुद्धा आपल्याला देत नाहीए असं नाहीए, त्यामुळे त्याच्यावर चिडचिड न करता त्याला समजून घेऊन, थोडा धीर दिला तर त्याला हि बरं वाटेल आणि कमीतकमी घरच वातावरण तरी छान राहील.

प्रत्येकाच्या स्वभावावर या गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने परिणाम होऊ शकतो. पण जास्त प्रमाणात हा परिणाम त्रासदायक असतो. पण तेच जर आपण थोडा वेळ काढून समोरच्याच्या वागण्याचा विचार केला आणि वेळ पडली तर त्याच्या जागी उभं राहून त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कितीतरी माणसांचे स्वभाव म्हणजे स्वभावातल्या चांगल्या गोष्टी तरी फक्त समजून न घेतल्याने बदलणार नाहीत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “व्यक्तीचा स्वभाव तेव्हाच बदलतो, जेव्हा त्याची बाजू कोणी समजूनच घेत नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!