Skip to content

“विनाकारण आलेल्या नैराश्यावर अशी मात करा.”

“विनाकारण आलेल्या नैराश्यावर अशी मात करा.”


मधुश्री देशपांडे गानू


“रुक जाना नहीं, तू कही हार के

काटोंपे चल के मिलेंगे साये बहार के, ओ राही…. ओ राही…”

सगळ्यांना माहीत असलेलं, आवडीचं गाणं. अंताक्षरी खेळताना प्रत्येकाने कधीतरी म्हंटलं असणारच. पण याचा अर्थ किती जणांनी समजून घेतला आहे? जीवन हे सुख दुःखांनी विणलेला ताना-बाना आहे. याला समर्थपणे सामोरं जायचं असतं.  सर्वात प्रथम परमेश्वराने अतिशय सुंदर अशा मनुष्य प्राण्याच्या जन्माला घातले याबद्दल आपण ऋणी असायला हवे. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते भरभरून जगण्याची कला आपल्याकडे हवी.

आजच्या स्पर्धात्मक युगात अगदी जन्मापासूनच कसलीतरी जीवघेणी स्पर्धा आपल्या मागे लागते. एक जाहिरात आहे बघा तेलाची.. एका आईचं मूल त्या तेलाने लवकर चालायला लागतं. तर दुसरीचं दुसरं तेल लावल्यामुळे अजून चालत नाही. पहिली आई अगदी स्पर्धा केल्यासारखे विचारते , “चालायला लागला का गं हा?”. दुसऱ्या आईला लगेच ताण येतो. अरे!  ही काय जाहिरात आहे?? यात सुद्धा स्पर्धा? प्रत्येक व्यक्ती ही दुसरी पेक्षा वेगळी असते. प्रत्येकाचे आयुष्य, आयुष्याचा आलेख, प्रगतीचा आलेख हा वेगळा असतो. किती स्पर्धा आणि कशातही??

आता तर सगळीकडेच रॅट रेस आहे. आम्हाला सगळं हवं आहे. ते पण इन्स्टंट, आत्ताच्या आत्ता. भरपूर पैसा हवा आहे. त्याकरता ऊर फुटेस्तोवर धावायचंय. पण तो पैसा उपभोगायला आमच्याकडे वेळ नाही. नाती आहेत पण ती निभवायला वेळ नाही. कशाशी तरी , कोणाशी तरी सतत स्पर्धा करत राहायचं. स्वतःच्या आयुष्याला कोणाच्यातरी आयुष्याची फुटपट्टी लावायची. त्याच्या मोजमापा प्रमाणे आम्हांला आमचं आयुष्य घडवायचं आहे. सतत पहिलं यायचंय. मग अकाली, आकारण येणारे अनेक ताण.

एका मुलीला दहावीच्या परीक्षेत 91 टक्के मार्क मिळाले. ती खूप आनंदात होती पण थोड्या वेळाने एका नात्यातल्या मुलीला 95 टक्के मिळाल्याचे समजले. झालं! लगेच ती मुलगी, तिचे आई-वडील सुतकी चेहरे करून बसले. सगळ्या आनंदाचा विचका झाला त्यांच्या. म्हणजे त्या मुलीने वर्षभर कष्ट करून 91 टक्के मिळवले त्याची किंमत एका क्षणात शून्य झाली?? तिच्या पालकांची हीच मनोवृत्ती असावी?? मग नापास होणाऱ्या, कमी मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना किती अवहेलना सहन करावी लागत असेल?  का? प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणविशेष असतातच. पण ते फक्त मार्कांमध्ये मोजायचे अशी आपली विकृत मानसिकता झाली आहे. त्या मुलांमध्ये असलेले इतर चांगले गुण व्यर्थ होतात?

हल्ली संयम, सहनशक्ती, ऐकण्याची क्षमता, मोठ्यांचा आदर, पैशाची किंमत काहीच उरलं नाहीये नवीन पिढीत. सोशल मिडिया ने सगळं सवंग केलंय. कारण ते आपणच त्यांना नकळत शिकवलंय. पैसा फक्त महत्त्वाचा. तो कसाही मिळवला तरी समाजात मान मिळतो, हे रूढ झालंय. संस्कारांना काहीही स्थान नाहीये का आज??

या सगळ्यामुळे शुल्लक कारणांनी कोणीही आत्यंतिक तणावाखाली येत आहेत. जीवन जगण्याच्या बेगडी, अवास्तव, भौतिक अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. गेल्या दोन दिवसातल्या तीन घटना बघा..

१) पंधरा वर्षांच्या मुलीला आई अभ्यास करत नाही म्हणून ओरडली तर तिने कराटेच्या बेल्ट ने आईचा गळा आवळून खून केला.

२) लहान मुलगा अभ्यास करत नाही म्हणून आईने त्याचा जीव घेतला आणि मग आत्महत्या केली.

३) उशीरा उठली म्हणून आजी ओरडली, हे सहन न होऊन एका तरुणीने आत्महत्या केली. अरे! काय आहे हे??? कुठे चालला आहे समाज?  आपल्याच आई वडिलांनी, आजी-आजोबांनी तुमचं चुकलं तर तुम्हाला सांगायचं नाही? बोलायचं नाही? मग हे सगळं काय  अनोळखी माणूस येऊन सांगणार का? ते ऐकण्याचीही तुमच्यात सहनशक्ती उरलेली नाही? या अशा घटनांचा संपूर्ण सामाजिक मानसिकतेवर किती विपरीत परिणाम होतोय..

किती विनाकारण कोणत्याही गोष्टींनी हल्ली नैराश्य येतं. प्रेमात अपयश आलं, कर आत्महत्या. नोकरी, व्यवसायात अपयश, कर आत्महत्या. किंवा नैराश्य येऊन मानसोपचारतज्ञा चे उपचार. आम्ही नकार पचवू शकत नाही. अरे ज्या आई-वडिलांनी जन्माला घातलं त्यांचा एकदाही विचार करावासा वाटत नाही. आपण जे करतोय ते आपल्या आई-वडिलांना आवडेल का? असा पुसटसा विचारही तुम्हाला शिवत नाही. इतकी सद्सद्विवेकबुद्धी गहाण पडलींय का अनेकांची आज ??

ऑलिंपिक मध्ये यशस्वी झालेले खेळाडू पहा. किती विपरीत परिस्थितीत , कठीण परिस्थितीत जिद्दीने, अत्यंत कष्टाने, मेहनतीने ते आजवर येथे पोहोचले आहेत. आयुष्य खरच खूप सुंदर आहे , पण ते आपण सुंदर बनवण्यासाठी त्यामागे कष्ट जिद्द ही हवीच. एखादा अपमानही आपण पचवू शकत नाही?? घडणारी नकारात्मक घटना आपल्याला काहीतरी शिकवते हे आपण लक्षातच घेत नाही. अत्यंत स्वार्थी वृत्ती, मीपणा, अहंकार बोकाळला आहे. कोणाचं ऐकून घेण्याची क्षमता प्रकर्षाने कमी होतेयं. आपण आपली चूक मान्य करत नाही आहोत.

अशा वेळी एखादा वाईट प्रसंग, एखादी दुर्दैवी नकारात्मक घटना घडली तर सर्वात प्रथम त्याकडे त्याही परिस्थितीत मन शांत ठेवून पाहायला हवं. कठीण आहे , अशक्य नाही. निराश न होता परत प्रयत्न केले पाहिजेत. क्षणिक आलेला राग आवरता यायला हवा. मनावर ताबा हवाच. निराशेच्या गर्तेत न जाता लवकरात लवकर वास्तवाचा स्वीकार करून पुढे जायला हवं. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत.

चांगलं संगीत ऐका. निसर्गात फिरा. निसर्गाला गुरु माना. निसर्ग खूप काही शिकवतो. एखादा छानसा छंद, तुमची आवड जोपासा. रोज सकाळी स्वतःबद्दल 5 सकारात्मक विधाने लिहा. रोज रात्री झोपताना  दिवसभरात घडलेला एक चांगला प्रसंग लिहा. सकारात्मक विचार करण्याची, सकारात्मक वाचण्याची मनाला सवय लावा. ध्यानधारणा हा सर्वात प्रभावी उपाय आहे. परमेश्वरावर निदान त्या अदृश्य शक्तीवर विश्वास हवा. “जे घडतं ते चांगल्यासाठी” यावर विश्वास ठेवा. आणि प्रयत्न करत राहा. सर्वात प्रथम स्वतःला आहात तसे स्वीकारा आणि स्वतःवर निरतिशय प्रेम करा. बघा! परिस्थिती बदलायला सुरुवात होते की नाही..

या सगळ्या विश्वासाच्या आणि सरावाच्या गोष्टी आहेत. हळूहळू नक्की प्रयत्नांती सकारात्मक बदल होणारच. इतकं सुंदर मौल्यवान आयुष्य एका चुकीसाठी, कोणा चुकीच्या माणसासाठी, एका अपयशासाठी पणाला लावू नका. आयुष्य भरभरून जगा. आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. आत्मविश्वासाने जीवनाला आनंदाने सामोरे जा. यशस्वी व्हा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on ““विनाकारण आलेल्या नैराश्यावर अशी मात करा.””

  1. very nice lekh tumhi khup changl kam kartat ashprakarche motivational lekh takun .kharach ajcha sataparishitiwar adharit lekh ahe apla .👌👌

  2. Khup chan asech massage takat ja amhala jagnyachi navi prerna milte

  3. योगेश सोसे

    सुंदर लिहलय…. खरच नैराश्यात जगणाऱ्या लोकांसाठी संजीवनी आहे… आपले शब्द सॅल्युट आणि खूप खूप शुभेच्छा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!