“विनाकारण दु:खी राहण्यापेक्षा विनाकारण आनंदी राहूया….”
मधुश्री देशपांडे गानू
“जिंदगी हंसने गाने के लिये,
है पल दो पल
इसे खोना नहीं
खोके रोना नही…..”
आयुष्याच्या एका वळणावर हे लक्षात येतं म्हणा! पण तोपर्यंतचा प्रवास स्वतःपुरता स्वतःसाठी खडतर असतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःपुरतं स्वतःचे जग निर्माण करते. त्यात आपली प्रेमाची मोजकी माणसं, त्यांच्या कडू-गोड आठवणी, अगदी भौतिक चीजवस्तू काय काय सामावलेलं असतं. यातच माणूस गुरफटूनही जातो. या जगाचा त्याला अभिमानही असतो, क्वचित अहंकारही असतो. सगळेच तात्पुरतं आहे. जीवन क्षणभंगुर आहे. अगदी आपलं असं काही नाही हे माहीत असूनही आपण माझं-माझं करत काय काय आणि किती गोळा करतो ना स्वतःभोवती!!
खरंतर पुढच्या क्षणाची, श्वासाचीही शाश्वती नसते. वास्तविक आपल्या असण्याने अगर नसण्याने या जगाला काहीच फरक पडणार नसतो. हे जीवनचक्र तरीही अव्याहत चालूच राहणार असते. तरीही स्वतः स्वतःचे जग निर्माण करण्यासाठी किती कष्ट, मेहनत घेतो आपण. आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी खस्ता खातो. या छोट्याशा जगातली सुख-दुःख, आनंद, राग, लोभ सगळंच आपलं हक्काचं असतं.
प्रत्येक व्यक्तीच्या अशा छोट्याशा जगात अनेक घडामोडी घडत असतात. सुखाच्या, दुःखाच्या, आनंदाच्या, नैराश्याच्या. अनेक अनुभव घेऊन पचवून माणूस अनुभवाने समृद्ध होत असतो. पण काही व्यक्तींना मात्र प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता दिसते. आत्ता खास करून करोना काळात तर माणसांमधली ही नकारात्मकता प्रकर्षाने दिसली. प्रचंड नैराश्य, भीतीचे वातावरण पाहिले. त्यातूनही माणसं जिद्दीने पुढे जाताना दिसतात. सणवार आनंदाने साजरे करताना दिसतात. हेच तर आयुष्य आहे.
पण एकूणच बहुसंख्य माणसं स्वतःच्या आयुष्यातील दुःखाच्या, नैराश्याच्या नकारात्मक गोष्टीच बोलताना आढळतात. पाण्याने अर्धा भरलेला पेला त्यांना दिसतच नाही. अर्धा पेला रिकामा आहे एवढंच त्यांना दिसतं. कोणत्याही गोष्टीकडे, प्रसंगाकडे, व्यक्तीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतच नाही.
एखादी व्यक्ती आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंग पचवून पुन्हा नव्या उमेदीने उभी राहत असेल, एखाद्या क्षेत्रात सातत्याने काम करून यशस्वी होत असेल तर अशी “स्वतःच्या आयुष्यात दुःखी असलेली माणसं” त्यांचे कौतुक तर करत नाहीतच पण संधी मिळेल तेव्हा तुच्छतेने टोचून बोलणे, कुत्सित बोलणे, अपमान करणे पाठीमागे निंदानालस्ती करणे असं सगळं करतात.
यावरून फक्त प्रचंड असूया, मत्सर दिसून येतो. स्वतःमध्ये कोणतेही कौशल्यं नसणारी माणसं तुम्ही यशस्वी व्हायला लागलात की विनाकारण दुःखी होतात, कारण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीही बरं घडत नसतं. याला ते स्वतःच कारणीभूत असतात.
माणसं दु:खी होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची विचार प्रक्रिया. अशा दूषित विचारांनीच मग चिडचिड करणे, प्रचंड मत्सर, असूया वाटणे, स्वतःची सतत कोणाबरोबर तरी तुलना करणे, दुसऱ्याच्या आयुष्याची, सुखाची फुटपट्टी स्वतःला लावून पाहणे अशा गोष्टी विनाकारण करत राहतात. स्वतःला आहे तसे न स्वीकारल्यामुळे स्वतःचाही अपमान करतात आणि दुसऱ्याकडे जे आहे त्याचं कौतुक न करता आल्यामुळे दुसऱ्याचाही अपमान करतात. एखादी अत्यंत सुंदर स्त्री स्वभावाने कितीही चांगली असली तरी इतर स्त्रिया नकळत तिचा फक्त हेवाच करतात आणि स्वतः विनाकारण दुःखी होतात.
रोजच्या जगण्यात आज माणसाला अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. पण नीट शांतपणे विचार केला तर कित्येक ताण हे केवळ अति विचार, चुकीचे विचार यामुळेच आपण ओढवून घेतो. “लोक काय म्हणतील?” यामुळे तर सगळ्यात जास्त विनाकारण ताण येतो. अतिविचारांनी मग लोकांना नैराश्य येतं, निद्रानाश, अतिचिंता, चिडचिड अशा गोष्टी होतात. अगदी ज्या व्यक्तीचा तुम्ही प्रचंड मत्सर करता, राग-राग करता ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात मजेत जगत असते. पण तुम्ही मात्र तुमच्या चुकीचा विचारांनी स्वतःच स्वतःला दुःखाच्या खाईत लोटता.
सततची जीवघेणी स्पर्धा, सतत पुढे राहण्याची धडपड, सतत आर्थिक-सामाजिक तुलना, अपयशाची भीती आणि अस्वीकार, आत्मविश्वासाची कमी, कमीपणाची भावना, नातेसंबंधांमध्ये नाकारले जाण्याची भीती अशा अनेक कारणांनी माणूस स्वतःला दु:खी करून घेतो. तुम्ही तुमचा स्वतःकडे, इतरांकडे, समाजाकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर तुमच्या लक्षात येतं की आपण किती विनाकारण दुःखं ओढवून घेतली आहेत. ज्याला आपल्या आयुष्यात खरंच काही स्थान नाही.
आता विनाकारण आनंदी राहण्याचा काही सोप्या टीप्स पाहू.
१) स्वतः स्वतःसाठी स्वतःवर लक्ष केंद्रित करा. त्यावर सातत्याने काम करा. स्वतःची कधीच कोणाशीही तुलना करू नका.
२) माझ्या आनंदाचा स्त्रोत फक्त माझ्यामध्ये सामावलेला आहे. कोणत्याही बाह्य गोष्टींवर, माणसांवर तो अवलंबून नाही. हे वास्तव एकदा स्वीकारलं की तुम्ही आनंदी होता.
३) आवर्जून ध्यानधारणा करा. याने स्थिर, शांत, समाधानी वृत्ती तयार होते. तुम्हांला आतून आनंद मिळतो.
४) तुमची कुणी चेष्टा मस्करी केली, निंदानालस्ती केली तर शक्यतो प्रतिक्रिया देऊ नका. जे खालच्या पातळीवर आहेत त्यांना तिथेच राहू द्या. तुम्ही ही पातळी गाठायची गरज नाही. दुर्लक्ष करणे सर्वात उत्तम उपाय.
५) तुमच्या प्रेमाच्या माणसांचं, मित्र-मैत्रिणींचं मनापासून वेळोवेळी कौतुक करा. विनाकारण आनंदी होण्याचा सोपा मार्ग आहे हा.
६) सर्वात जास्त अपेक्षा स्वतःकडून करा. इतरांकडून अवास्तव अपेक्षा नको.
७) वास्तवाचा स्वीकार करून आत्ताचा हा क्षण सर्वोच्च आनंदाने जगा.
८) ज्या गोष्टींवर, माणसांवर आपले नियंत्रण नाही त्यावर अतिविचार करू नका.
९) स्वतःला आवडेल असे काम, छंद यात स्वतःला गुंतवून ठेवा. हा छंद व्यवसायात बदलून तुम्ही आर्थिक स्वतंत्र होऊ शकता. आणि तेंव्हा मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.
१०) परमेश्वराने हजारो करांनी सढळहस्ते ही सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. निसर्गात रमण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मन कसं प्रसन्न, आनंदी होतं.
११) आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला माझ्या प्रतिक्रियेची गरज नाही, हे तुमच्या लक्षात आलं की तुमची विनाकारण दु:खी होण्याची कारणं आपोआपच नाहीशी होतात.
१२) स्वतःवर भरभरून प्रेम करा. स्वतःला प्राधान्य द्या.
मग एका क्षणी तुमच्या लक्षात येतं की गतकाळाच्या आठवणी आता आपल्याला भिववत नाहीत. येणाऱ्या काळाची आपल्याला चिंता, हूरहूर वाटत नाही. आजचा दिवस, आत्ताचा क्षण महत्त्वाचा आहे, माझा आहे आणि मी तो आनंदाने, भरभरून जगणार. मग सगळं सहज सोपं सुंदर होतं. असा आतून आनंद झिरपला पाहिजे. यामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. आणि विनाकारण आनंदी राहायची मनाला, शरीराला सवयच होऊन जाते. बघा.. प्रयत्न करा आणि मला नक्की सांगा…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



,👏✍️छान, उत्तम आनंदी जगण्यासाठी, या जगा कडे थोड ” कर्न बहीरम, नयन बंदिस्तंम, वाचाल वाचा बंदिस्त्म, ते अतिसुंदरम, ते अतिसुंदर म !!
Khup chan lekh ahe…mast…
It felt great
Khup khup sundar 👌👌👌👌
आगदी बरोबर आहे, कदाचीत आणखी ऐक महत्वाची गोष्ट आहे आयूष्य रूपी मिळालेले हे धन पून्हा नाही ☺
Excellent!
Very Positive….. I like it…..