विचारांची देवाणघेवाण होत राहिली, तर मनातले असंख्य भ्रम दूर होतात.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
माणसाचे विचारच खरा माणूस घडवतात. जसे आपले विचार तसेच आपले आचरण आणि त्यानुसार आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत, माणूस म्हणून कसे आहोत हे जगाला दिसत असत, त्यानुसार लोक आपल्याला ओळखू लागतात. पण ज्याचे विचार जसे तसं जग त्याला दिसतं, हे ही तितकंच खरं! माणसाचे विचार हे त्याच्या बाल्यावस्थेतूनच आकार घेऊ लागतात.
पालकांचे संस्कार, त्यांचं वागणं, सभोवतालचा परिसर, त्यातील माणसे याचा माणसाच्या विचारांवर खूप मोठा प्रभाव असतो. पण शेवटी माणूस कुठेही जन्मला, वाढला तरी देखील एका ठराविक वयानंतर संगत आणि वातावरण बदलल्यास त्याच्या विचारांमध्येही बदल पाहावयास मिळतो. शेवटी आपण कोणते विचार आत्मसात करायचे हे आपल्यावर अवलंबून असत.
आजकाल समाजात कितीतरी माणसं अविचारी असल्याचं आढळतं. आणि ते अविचारी असल्याचं त्यांच्या वर्तणुकीतून ते स्वतःच दाखवून देत असतात. सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात मौल्यवान देणगी ही माणसालाच मिळालेली आहे, ती या विचार करण्याच्या क्षमतेच्या स्वरूपात. पण आपण या देणगीचा वापर करतो का? आणि करत असू तर कशापद्धतीने करतो? इतरांचं नुकसान करण्यासाठी की कोणाच्या चांगल्यासाठी?
हे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून त्याची प्रामाणिक उत्तरे द्यायला हवीत. कारण विचारांनी फक्त माणूसच घडत नाही, त्याने एक समाज घडतो ,आणि पर्यायाने एक देश घडत असतो. त्यामुळे आपण जे विचार करतो किंवा करत नाही हे आपल्यापुरतेच मर्यादित नसून त्याचा समाजावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आपण विचार करत नसलो तरी त्याने समाजाचे , आपले आणि देशाचेच नुकसान होत असते. आणि विचार करत असलो तरी तो चांगल्या पद्धतीचा आहे की नाही हे देखील तेवढेच महत्वाचे ठरते.
आपल्याला आपल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्याचा कायद्याने हक्क आहे. त्याचप्रमाणे आपण लोकशाहीत राहत असल्याने आपले विचार आणि मते मांडण्याचाही तेवढाच अधिकार आहे. त्यामुळेच मला असे वाटते की माणसाने गरज असेल तिथे प्रत्येक ठिकाणी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करायला हवा.
आपले विचार मांडण्याबरोबर तेवढ्याच उत्साहाने समोरच्या माणसाचे विचार ऐकायला हवेत. कदाचित ते आपल्या विचारांशी मिळतेजुळते असू शकतात , कदाचित पूर्णपणे विरोधी विचार देखील असू शकतात. यापैकी कोणतेही विचार असले तरी आपण त्या विचारांचा आदर केला पाहिजे. जरी ते विचार चुकीचे वाटले, नुकसान करणारे वाटले तरी त्या माणसाला नम्रपणे तू चुकीचा आहेस किंवा तुझे विचार चुकीचे आहेत हे पटवून देण्यापेक्षा ते त्याला स्वतःला आणि पर्यायाने इतरांना देखील कसे घातक आहेत, हे समजून सांगायला हवे.
पण अशा वेळी समजून सांगणाऱ्या व्यक्तीने हे देखील लक्षात घ्यायला हवे की, आपण ज्या वातावरणात वाढलो, ज्यामुळे आपले विचार आज असे आहेत, तशाच ठराविक पण वेगळ्या वातावरणातून समोरचा माणूस आलेला आहे. आणि त्यामुळे त्याचे विचार आज आहेत तसे असणार आहेत. त्यामुळे ते विचार खरंच वाईट किंवा चुकीचे जरी असले तरी सर्वोस्वी त्या माणसाचा दोष असेलच असं नाही. त्यामुळे सर्वात आधी तरी त्याची चूक नाही हे लक्षात घेऊन जमेल तेवढं त्याला समजून सांगायची प्रक्रिया प्रत्येकाने करावी.
या गोष्टी अवघड वाटल्या तरी या गोष्टींची आपल्या सगळ्यांना गरज आहे. कारण जेव्हा कुठेतरी एखादी वाईट गोष्ट काही वाईट विचारांमुळे घडते, तेव्हा आपल्याला कळत की समाजात अशा वृत्तीची किंवा विकृतीची देखील माणसे आहेत. पण विकृती ही अचानक एका रात्रीतून उद्भवलेली नसते. ते वाईट विचार जेव्हा छोट्या स्वरूपात या माणसांच्या डोक्यात असतात तेव्हाच जर चांगले विचार सांगून आपण त्याची पाळेमुळे खोडून काढली तर नक्कीच ती माणसे विकृत होण्यापासून परावृत्त होऊ शकतात.
आपण समाजात वावरताना अनेक भिन्न लोकांना भेटत असतो. काही लोकांचं आपल्याला पटत तर काहींचं पटत नाही. आता पटण न पटण हे देखील विचारांवरच अवलंबून असत. म्हणूनच गरज पडेल तिथे आपले विचार प्रामाणिकपणे मांडणं आणि अन्याय होत असेल तर तिथे ही मूक गिळून न बसता या गोष्टींचा विरोध करणं खूप महत्वाचं आहे.
विचार करणे हे खरंच खूप मोठं शस्त्र आहे. पण आपले विचार कितीही स्ट्रॉंग असले तरी तेच योग्य आणि बाकी लोकांचे विचार मात्र अयोग्य असा अहंकार मनात असता काम नये. समोरच्याने मांडलेल्या विचारांचं स्वागत खुल्या मनाने करणं खूप गरजेचं असत. कारण नेहमी बरोबर असणारा माणूस ही चुकू शकतो आणि नेहमी चुकणारा.
माणूस देखील कधीतरी बरोबर असू शकतो. आणि विचारांनी आपल्या ज्ञानात भर पडत असते. त्यामुळे आपल्या विरोधी विचार असले तरी त्यावर सुद्धा एकदा विचार करून मग निष्कर्षास पोहचणे कधीही योग्य ठरेल.
विचारांची देवाणघेवाण करण्याचा अजून एक फायदा असाही असतो की, बरेच गैरसमज त्याने दूर होतात. मग ते आपल्याबद्दल कोणाला तरी असणारे गैरसमज असोत, किंवा एखाद्या विषयाच्या ज्ञानाविषयीचे गैरसमज असोत. पण या गैरसमजांनी जे नुकसान होऊ शकत ते विचारांच्या देवाणघेवाणीने नक्कीच टळू शकत.
विचारांमध्ये खूप मोठी ताकद असते. विचारच माणसाला घडवतात आणि बरबाद ही करतात. त्यामुळे चांगले विचार शेअर करणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. विचारांनी नव्या वाटा खुल्या होतात, तर कधी नवीन दिशा कळतात, आणि कधी कधी तर काही लोकांचे विचार ऐकून आयुष्याची दिशाच बदलून जाते. प्रत्येकाच्या विचारांनुसार आयुष्य हे वेगळं असत आणि त्याचीच थोडीशी झलक आपल्याला समोरच्याच्या विचारांमुळे कळत असते.
त्यामुळे विचार करा, चांगले विचार करा, ते इतरांसोबाबत ही शेअर करा आणि चांगलं आयुष्य जगा!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खुप छान