Skip to content

वाईट सवयी सोडण्यासाठी आपण काय-काय करू शकतो वाचा!!

वाईट सवयी सोडण्यासाठी आपण काय-काय करू शकतो वाचा!!


सौ. मिनल वरपे


मला रोज सकाळी लवकर उठायची, व्यायाम करण्याची सवय आहे तर मला दिवसभर मोबाईल घेऊन त्यामधे टाईमपास करण्याची सुद्धा सवय आहे. अशा प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या सवयी असतात.. कोणाला सतत टीव्ही बघण्याची तर कोणाला थापा मारण्याची, कोणाला आळस करण्याची तर कोणाला नको तेवढं बोलण्याची वाईट सवय असते.

कोणी वेळ मिळाला की लगेच पुस्तक वाचन करतात तर कोणी छान लिखाण करतात, कोणाला गायनाची आवड असते तर कोणाला वेळ मिळाल्यावर घर सजवण्याची सवय असते आणि या सवयींचा परिणाम आपल्या वर्तमानावरच नाही तर भविष्यावर सुद्धा होऊ शकतो. म्हणून आपल्या चांगल्या सवयी कोणत्या आणि वाईट सवयी कोणत्या हे लक्षात घेतलं पाहिजे. वाईट सवयी कायम आपलं नुकसान करतात म्हणून त्या सोडण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल काही सोप्या टीप्स पाहुयात :

१) सतत त्याच गोष्टीचा विचार करणे टाळावे :

आपल्याला जी सवय सोडायची असते आपण नेमकी त्याच सवयीबद्दल जास्त विचार करतो म्हणून ती सवय सोडणे आपल्याला कठीण जाते. आपल्याला जे करायचं नाही याचा सतत विचार करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे याकडे आपण जास्त लक्ष दिलं तर आपल्या सवयींमध्ये बदल होण्यास वेळ लागत नाही.

२) आपण आपलं मन दुसरीकडे गुंतवण्याचा प्रयत्न करायचा :

आपल्या काही सवयी कितीही सोडण्याचा विचार केला तरी त्या सोडणे आपल्याला खूप कठीण असते. मग अशावेळी आपण दुसऱ्या गोष्टीत मन वळवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच समजा जर आपल्याला सतत टीव्ही बघायची सवय असेल तर ती सवय टाळण्यासाठी आपण घरातील व्यक्तींशी गप्पा मारणे, बाहेर फेरफटका मारणे, पुस्तक वाचणे यासारख्या गोष्टीत आपला वेळ घालवू शकतो.

३) चांगल्या सवयी आत्मसात करायचा प्रयत्न करायचा :

आपल्या ज्या सवयी आपल तसेच आपल्या वेळेचं नुकसान करतात त्या सवयींमध्ये न अडकता आपण ज्या गोष्टी आपल्याला कायम आनंद देतील, ज्या सवयींचा परिणाम आपल्यावर होणार नाही, ज्या सवयी आपल्याला कायम सकारात्मक ठेवतील, ज्यामुळे आपल्या वेळेचा सदुपयोग होईल अशाच गोष्टींचा विचार केला आणि त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला आपल्या सवयी बदलता येतील.

४) परिणामांचा विचार :

आपल्याला बहुतेक वेळा आपल्या सवयी कधी वाईट वाटत नसतात. आपल्याला अनेकजण आपल्या चुकीच्या सवयी सांगतात पण आपण त्या मान्य करत नाहीत. आणि अशी एक वेळ येते जेव्हा आपल्याला आपल्या वाईट सवयींचा परिणाम दिसतो. अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालच तर अभ्यास करण्याची चांगली सवय सोडून कॉपी करणे, याला त्याला विचारून परीक्षा देण्याची सवय असेल तर अशा शॉर्टकटच्या वाईट सवयीमुळे प्रत्यक्ष आपल्याला किती माहिती आहे किंवा मुलाखतीच्या वेळी तसेच कामाच्या ठिकाणी अभ्यास नसल्याने आपल्याला मान खाली घालावी लागते..

काही वेळेस आपल्याला सगळे हसतात तर काहीवेळेस जॉब सोडावा लागतो.म्हणून आधीच अभ्यास करण्याची चांगली सवय असती तर बरं झालं असत आणि आपल्या वाईट सवयींचा आपल्याला पश्चाताप होतो. म्हणून आपल्या वाईट सवयींचा परिणाम आधीच लक्षात घेऊन त्या सोडल्या की आपला कायम फायदाच होणार.

५) वेळेचा योग्य उपयोग :

आळस करणे, कंटाळा करणे अशा नकोत्या वाईट सवयींमुळे आपल्याजवळ असलेली महत्वाची वेळ आपण सहज वाया घालवतो. ज्या सवयी आपल्या वेळेचा अपव्यय करतात त्या सवयी लक्षात घेऊन त्या योग्य वेळी सोडाव्यात जेणेकरून गेलेली वेळ पुन्हा मिळणार नाही याचं भान ठेवून आपण आपल्या वेळेचा योग्य तो उपयोग करू.

६) स्वतःवर ताबा मिळवणे :

सवय ही अशी असते जी एकदा लागली की सोडण खूप कठीण जाते. आपण एखाद्या गोष्टीपासून जेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करतो तेवढंच जास्त आपण त्या गोष्टीकडे वळतो. म्हणून त्या सवयीचे वाईट परिणाम, वाया जाणारी वेळ, चांगल्या सवयींचे फायदे यांचा विचार करून त्या वाईट सवयींपासून दूर राहण्यासाठी स्वतःवर ताबा मिळवता येतो. कोणी कितीही सांगितलं तरी जोपर्यंत आपला स्वतःवर कंट्रोल नसेल तोपर्यंत आपण ती गोष्ट बदलू शकत नाही.

७) योग्य अयोग्य याची खात्री करणे :

आपल्या सवयी योग्य आहेत की अयोग्य हे इतर कोणी आपल्याला सांगण्यापेक्षा आपलं आपल्यालाच ओळखता येते. ज्या सवयी आपल्याला आज आणि यापुढे कधी त्रास देणार नाही, ज्या सवयींमुळे आपलं कधीच नुकसान होणार नाही, ज्या सवयी आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतील अशा सवयी जर आपल्याला असतील तर नक्कीच त्या चांगल्या सवयी आणि या विरुद्ध असतील त्या वाईट सवयी. म्हणून त्या सवयींची योग्य ओळख करून चांगल्या सवयी आत्मसात करण्याचा, अबाधित ठेवण्याचा आणि वाईट सवयींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

८) वेळ देणे :

कोणतीही सवय ही लगेच बदलत नाही..वाईट सवय लागायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो आणि चांगली सवय लावण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो. आपल्याला जर आपल्या वाईट सवयी सोडायच्या असतील तर हळू हळू आपले प्रयत्न सुरू ठेवायचे.. कोणतीच सवय एकदमच आणि लगेचच बदलत नाही त्यासाठी आपल्याकडे धीर असणे गरजेचे.

काल नाही जमलं, आज सुद्धा नाही जमलं म्हणून कधीच जमणार नाही असे नसते.. म्हणून काहीवेळ स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण वाईट सवयी सोडण्याचा आपला प्रयत्न कधीच सोडू नये. आज नाहीतर उद्या नक्कीच आपल्या सवयीत बदल घडेल हा विश्वास आपल्याला कायम प्रेरणा देईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “वाईट सवयी सोडण्यासाठी आपण काय-काय करू शकतो वाचा!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!