Skip to content

लोक काय म्हणतील? हे पान आयुष्याच्या Dictionary तून फाडून टाका.

लोक काय म्हणतील? हे पान आयुष्याच्या Dictionary तून फाडून टाका.


डॉ. रोहिणी कोरके


मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला समाजात रहायला, मिसळायला, भावना व्यक्त करायला आवडते. त्यामुळे मनुष्य नेहमी’ समाजाला घाबरून राहतो. समाजाने घालून दिलेल्या मर्यादा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहतो. त्याला सतत भिती वाटत असते. की कोणी आपल्याला काही बोलणार तर नाही ना? नावे तर ठेवणार नाही ना ? कोणी आपल्यावर बहिष्कार तर टाकणार नाही ना ?

असे विचार मनात येतात कारण त्याला एकटेपणाची भिती वाटत असते. आयुष्यातील कोणत्याही बऱ्यावाईट परिस्थितीत आपल्याला कोणाचीतरी सोबत असावी असे वाटत असते. त्यामुळे कित्येकदा मनुष्य मनाचे न ऐकता बुध्दीने विचार करून वागतो.त्यामुळे मन मारून जगावे लागते. आणि ज्या गोष्टी आपण मनासारख्या जगू शकत नाही त्याची रुखरुख आपल्याला लागून राहते.

काय होईल हो आपण ‘लोक काय म्हणतील? हे वाक्यच आपल्या आयुष्यातून Delete केले तर तसं बघायला गेलं तर मनुष्य जन्माला येताना एकटा अन् जातानाही एकटाच जातो. कोणी कितीही प्रिय व्यक्ती असला तरी आपल्यासोबत तो येत नाही, येऊ शकत नाही. जन्मापासून मृत्युपर्यंत आपल्याला जी काही साथ, संगत भेटते ती समाजाची. असे म्हणतात 84 लक्ष योनिमधून गेल्यानंतर एकदा मनुष्यजन्म मिळतो. आणि तेही आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्षांचे.

मग या एवढ्याशा आयुष्यात आपण आपल्याला हवे तसे का जगू नये? आपण अशा पद्धतीने जगू शकतो का ? तर नक्कीच जगू शकतो. याचा अर्थ असा नाही की समाजाच्या कोणत्याच मर्यादा आपण पाळू नये. आपणही या समाजाचा एक घटक आहोत आणि आयुष्यात कधी ना कधी आपल्याला समाजाची गरज भासणार याचे भान ठेवायला हवे. आपले दैनंदिन व्यवहार,देवाण ,घेवाण यामध्ये समाजाचा मोठा वाटा आहे. म्हणूनच आपण आपले वर्तन योग्य पद्धतीचे ठेवले पाहिजे…

पण मग मनासारखे जगायचे कसे हा प्रश्न तुम्हाला पडेल ?तर याचे उत्तर असे आहे की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत समाजाचा विचार करत बसू नका.तसेच आयुष्यातील अगदी महत्वाच्या निर्णयांमध्ये आपल्या मनाला पटतील त्या पद्धतीने निर्णय घ्या. म्हणजे तुमचे काम सोपे होईल.

उदाहरणार्थ प्रत्येकाने कपडे कसे घालावे, कशा पद्धतीचे वापरावे,कसे कपडे आपल्याला suit होतील याची आवड निरनिराळी असू शकते. इथे लोक काय म्हणतील याच विचार करत बसू नका. तुम्हाला चांगले आणि comfortable वाटतील असे कपडे तुम्ही निवडा.हे झाले छोट्या गोष्टीचे उदाहरण.

तसचं तुमचं व्यवसाय क्षेत्र निवडताना तुम्ही इतरांचा विचार अजिबात करू नका, तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आणि संधी असेल असेच क्षेत्र तुम्ही करियर म्हणून निवडा मग भले तुमची कमाई इतरांच्या दृष्टीने कमी असली तरी चालेल पण तुम्हाला तुमचे काम कंटाळवाणं नाही वाटणार! तुम्ही कामांचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.एक दिवस तुम्ही यशस्वी व्यक्तींच्या यादीत नक्की असणार आणि आनंदी जीवन जगू शकणार.

तुम्हाला तुमच्या मुलाला मातृभाषेतून शिक्षण दयायची इच्छा असल्यास त्याला बिनधास्त मराठी Medium च्या शाळेत टाका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कारण आजकाल 90% पालक आपल्या मुलासाठी English Medium चा विचार करतात. त्यामुळे आपण काही चुकीचं करत असल्याचं आपले मिञ मैत्रिणी आपल्याला भासवतात.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा इतरांपेक्षा काही वेगळं व्हायचे असेल तर वेगळ्या पद्धतीने जगायला शिका.याचा अर्थ आपल्याला समजातून बाहेर पडायचं का? तर नाही आपल्याला समाजात राहूनच आपल्या पद्धतीने जगता आले पाहिजे आपले चांगले विचार इतरांना पटवून देता आले पाहिजे. आपले चुकीचे विचार इतरांच्या मदतीने दूर सारता आले पाहिजेत.

महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले यांसारख्या व्यक्तींचे विचार वेगळे होते. या लोकांनी ‘लोक काय म्हणतील?’ याचा विचार केला असता तर आजही समाजातील महिला निरक्षर राहिल्या असता आणि आपला देश इतकी प्रगती करू शकला नसता

म्हणून आपणही ‘लोक काय म्हणतील?’ हा शब्द आयुष्याच्या Dictionary तून फाडून टाकला पाहिजे आणि समाजात राहून मनसोक्त आयुष्य जगण्या आनंद घेतला पाहिजे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “लोक काय म्हणतील? हे पान आयुष्याच्या Dictionary तून फाडून टाका.”

  1. बरोबर बोलला आहात .आपण लोक काय बोलतील या विचाराने मरतो .कधी कधी वाटते ते गेले खड्डयात असा विचार करायला हवा .

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!