Skip to content

” लोकांचा विचार न करता मनासारखी कृती केल्यास भरपूर आनंद मिळतो..”

” लोकांचा विचार न करता मनासारखी कृती केल्यास भरपूर आनंद मिळतो..”


मधुश्री देशपांडे गानू


“कुछ तो लोग कहेंगे..

लोगों का काम है कहना…”

प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे नेहमी सांगतात,” लोक काय म्हणतील? असं काही अस्तित्वातच नसतं.” हे मी आधीही सांगितलं आहे. आणि लोक म्हणजे कोण? आपणच ना! पण तरीही आपण सर्वात जास्त विचार आणि स्वतःची ऊर्जा या एका प्रश्नावर खर्च करतो. कित्येक सुंदर, मनाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आपण या एका प्रश्नाच्या दडपणाने कधी करतच नाही. आणि आपल्याला हव्या असलेल्या आनंदी क्षणांना मुकतो.

किती दडपण असतं आपल्यावर अगदी लहानपणापासूनच.. सतत दुसऱ्यांचा विचार, दुसऱ्यांना काय वाटेल?, लोक काय म्हणतील?, मला नाव तर ठेवणार नाहीत ना! सतत हाच विचार आपण करत असतो. याचा मला वाटतं सर्वात जास्त त्रास स्त्रियांना होत असेल. पुरुषांनाही नक्कीच होत असणार. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक दडपण असतंच.

पण स्त्रियांनी अगदी कपडे कोणते घालावेत? कुंकू लावावे की नाही? मंगळसूत्र घालावे की नाही? इतक्या सोप्या, सहज, साध्या गोष्टींमध्ये बदल करायचं म्हटलं तरी स्त्रियांना प्रचंड दडपण येतं. खरंतर हे सगळं इतकं वैयक्तिक आहे. तरीही आपण या छोट्या-छोट्या आनंदाला केवळ लोक काय म्हणतील? हा विचार करून मुकतो.

आपलं आयुष्य, आपला दिनक्रम, आपले सुख दुःख, आपल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं ही सगळी आपली असतात. त्याची जबाबदारी ही पूर्णपणे आपलीच असते. मग लोक कुठून आले?? आपल्या जगण्यात कशाला प्राधान्य द्यायचं, आपली प्रेमाची माणसं, मित्र-मैत्रिणी ही आपली निवड असायला हवी ना! आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत गेल्या, आपल्या आजूबाजूला आपल्याला हवी असलेली माणसं असली तरच आपण आनंदी होऊ ना!

चांगलं-वाईट, सुख-दुःख, आनंद, नैराश्य ही व्यक्तीसापेक्ष विशेषणं आहेत. मला जी गोष्ट चांगली वाटते ती दुसऱ्या कोणाला वाईट वाटू शकते. उदाहरणार्थ, एखादी स्त्री पतीच्या पश्चातही अत्यंत टापटीप, मॉडर्न, सगळे सौभाग्य अलंकार घालून राहू शकते. त्यात तिला आनंद मिळतो. जर ती स्वतःच्या कर्तबगारीने नवऱ्याच्या पश्चात त्यांची सर्व कर्तव्यं उत्तम निभावत असेल, तिचे कुटुंबीय तिच्यासोबत असतील, तर तिला लोक काय म्हणतील? याचा विचार करायची गरजच काय?? ती कोणालाही answerable  नाहीयं. तिला काहीही सिद्ध करायचं नाहीयं. तिचं घर चालवायला, महिन्याचा खर्च भागवायला हे लोक येतात का?? नाही ना! मग तिने कसं रहावं, कसं जगावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे.

तसंही लोक दोन्ही बाजूंनी बोलतात. ती दुःखी राहिली तर म्हणतील, “झालं की आता. किती काळ तेच तेच उगाळत राहणार?”. आनंदी राहिली तर म्हणतील, ” हिला काहीच कसं वाटत नाही? नवरा नाही तरी नटते-मुरडते..” लोक ढोल बडवल्यासारखे दोन्हीं बाजूंनी बोलतात. त्यामुळे लोकांचा विचार न करता मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी आवर्जून करायच्याच.

तसंही लोकांना काहीतरी विषय चघळायला हवाच असतो. कोणाबद्दलही चवीचवीने गॉसिपिंग करणे हा समाजाचा स्वभावच आहे. त्यातून लोकांची स्मरणशक्ती क्षीण असते. विषय चघळून ते विसरूनही जातात. आपण मात्र कोण काय म्हणेल? याचा बागुलबुवा करून ठेवतो. आणि त्यालाच घाबरत बसतो. हे सगळं आपल्या मनातच असतं. आपल्या मनातले विचार, लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला, तर लोक काय म्हणतील? हा प्रश्नच उरत नाही. हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात.

कित्येक करियरच्या मुख्य वळणावर उभी असलेली तरुण मुले मुली मळलेल्या वाटेवरून जायला तयार नसतात. डॉक्टर पालकांना मुलाने डॉक्टरच व्हावे असं वाटत असतं. पण त्याची आवड वेगळी असेल तर?? त्याने  नक्की आत्मविश्वासाने, न डगमगून जाता स्वतः ला संधी द्यावी. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी स्वतःला एक संधी नक्कीच द्यायला हवी.

आपल्या मराठी नाट्य क्षेत्रात कितीतरी असे नामवंत अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्यांचे शिक्षण धोपट मार्गाने डॉक्टर, इंजिनियर असं झालंय. पण त्यांनी आपला कल ओळखून, आपली आवड वेळीच ओळखून स्वतःला एक संधी दिली आणि धैर्य दाखवलं. आज ते स्वतः या अभिनयाच्या क्षेत्रात नामवंत तर आहेतच. त्यांना स्वतःला आवड पूर्ण करण्याचा आनंद, समाधान आहेच. पण त्यांनी सादर केलेल्या कलेमुळे हजारो लोकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. उदाहरणार्थ डॉ. गिरीश ओक, डॉ. श्रीराम लागू, डॉ. काशिनाथ घाणेकर..  आणि असे अनेक…

अगदी प्रेमाचेही तसेच आहे ना! खूप विरोध पत्करूनही लग्न करून यशस्वी संसार करणारी जोडपी आपण आजूबाजूला पाहतोच की! आज त्यांनी त्यांच्या मनाचा कौल ऐकून, मनासारखी कृती केल्याने ते आनंदी आणि समाधानी आहेत.

सर्वात प्रथम स्वतःला प्राधान्य द्या. स्वतःला काय हवं नको ते पहा. स्वतःच्या आवडीच्या, छंदाचा, क्षमतांचा, कुवतीचा अभ्यास करा. तुमचं प्रेमाचं माणूस असू दे नाहीतर आवडीचं क्षेत्र असू दे, स्वतःच्या मनासारखी कृती करून, स्वतः वर लक्ष केंद्रित करून प्रामाणिकपणे त्यासाठी मेहनत करून स्वतःचे ध्येय गाठा. त्यावेळी मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

लहान मूल जेव्हा पहिलं पाऊल टाकतं तेंव्हा ते अडखळतं, धडपडतं, पडतं. पण म्हणून ते प्रयत्न सोडत नाही. तर ते परत परत स्वतःला संधी देत राहतं. पुन्हा चालायचा प्रयत्न करतं. या वेळी ते इतकं निर्मळ, संस्कारहीत असतं की आई वडील काय म्हणतात याकडे त्यांचं लक्षच नसतं. आणि दोन पावलं चालल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद असतो. इतक्या सहजतेने तुम्ही स्वतःच्या मनाला आवडेल अशी कृती करा.

तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचा आणि मग बघा.. मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. फक्त हा आनंद मिळवताना, मनासारखी कृती करताना इतर दुखावले जाणार नाहीत हा विचार नक्की हवा. समंजसपणे, सकारात्मकतेने, आत्मविश्वासाने स्वतःला हवे तसे आयुष्य जगण्याचा, आनंदी करण्याचा नक्की मनापासून प्रयत्न करा. माझ्या शुभेच्छा…

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!