Skip to content

लोकांचं तोंड बंद करण्यापेक्षा तुमचे कान बंद करा.

लोकांचं तोंड बंद करण्यापेक्षा तुमचे कान बंद करा.


सोनाली चेवले


तुम्ही काही केलंत तरी तुम्हाला नावं ठेवणारी लोकं असतात आणि काही नाही केलं तरी नावं ठेवणारी लोकं असतातच. पण कोणी तुम्हाला नावं ठेवल्यामुळे किंवा तुमचं कौतुकही केल्यामुळे, तुम्ही कसे आहात हे स्पष्ट होत नाही, तर ते कसे आहेत हे स्पष्ट होत असतं.
त्यामुळे इतर लोकं आपल्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही तर आपण आपल्याबद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचं आहे. काय सांगावं, आज नावं ठेवणारे उद्या तारीफ करू लागतील आणि आज कौतुक करणारे उद्या नावं ठेऊ लागतील. त्यामुळे ह्या गोष्टी फार मनावर घ्यायच्या नसतात.

आणि आपल्याबद्दल कोण काय म्हणतंय, याचाच जर आपण विचार करत बसलो तर महत्त्वाच्या गोष्टी बाजूलाच पडतील आणि आपल्याला आयुष्यात जे करायचंय ते राहूनच जाईल. रांजणाच्या तोंडाला झाकण असतं पण लोकांच्या तोंडाला नाही. त्यामुळे आपल्याला जे योग्य वाटतं आणि ज्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही, ते आपण न घाबरता केलं पाहिजे, किंवा जे करतोय ते न घाबरता चालू ठेवलं पाहिजे. आयुष्य आपलं आहे तेव्हा आपल्या आयुष्याशी निगडीत निर्णयही आपण स्वतःच घ्यायचेत. आणि हो, त्यांची जबाबदारीही. कारण आपला निर्णय चुकुही शकतो, तेव्हा त्याचं खापर इतरांच्या माथी न मारता तेही स्वीकारण्याची तयारी हवी.

इतिहासात जर डोकावलं तर ज्या समाजसुधारकांनी, शास्त्रज्ञांनी, किंवा इतर व्यक्तींनी जो नवीन विचार मांडला, नवीन कल्पना मांडली, नवीन गोष्ट करण्यास सुरवात केली त्यावर सगळ्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला का? त्यांना सहकार्य केलं का? उलट बऱ्याच लोकांनी त्यांची निंदा केली, त्यांचं हसू केलं. त्यांचा विरोध केला, त्यांना त्रासही दिला. पण ते बदलाचे पुरस्कर्ते लोकं डगमगली का? त्यांनी त्यांचं काम सोडलं का? तर नाही. त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्यांचं काम सुरूच ठेवलं.

एवढं होऊनही त्यांनी लोकांनाही तुच्छ समजलं नाही. कारण त्यांना हे कळत होतं की आपण जे पाहतोय ते ह्यांना आत्ताच दिसणार नाही किंवा कळणारही नाही. कारण त्यांनी उभ्या आयुष्यात कधी चौकटीपलीकडचा विचार केलेला नसतो. त्यांनी सजगतेने कधी विचार केलेला नसतो. त्यामुळे त्यांना समजणं हे अवघडच आहे.

पण त्यांनी त्यांच्या कृतीतून लोकांना दाखवून दिलं, आणि लोकांचाही दृष्टिकोन बदलायला सुरवात झाली. त्यांनी जो बदल घडवून आणला त्यामुळे त्यांचं किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचं, परिस्थितीचंच नाही तर येणाऱ्या पिढ्यांचही आयुष्य सोप्पं आणि सुंदर केलं.
त्यांनी जर लोकांमुळे माघार घेतली असती तर हे शक्य झालं असतं का? त्यांनी दाखवून दिलं की तुम्हाला स्वतःवर ठाम विश्वास असेल तर हे जगही एक ना एक दिवस तुमच्यावर विश्वास ठेवेलच.

बेडकाच्या त्या एका गोष्टीमध्ये, त्या एका बेडकाला इतर बेडूक त्यांच्या अनुभवामुळे, तू खड्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीस हे वारंवार सांगूनही त्या बेडकाने प्रयत्नात सातत्य ठेवलं आणि खड्याच्या बाहेर आलंच, कारण ते बेडूक बहिरं होतं!

आपणही असं बहिरं राहिलं की कोणत्याच गोष्टी आपल्याला विचलित करू शकत नाहीत आणि आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो.

पण कधी कधी आपले कान उघडेही ठेवायचे असतात. कारण कोणत्याही व्यक्तीला अस वाटत नाही की आपण जे करतोय ते चुकीचं आहे किंवा असू शकतं.

आपण व्यक्ती म्हणून जरी वाईट नसलो तरी एखादी चुकीची गोष्ट आपल्या हातून होऊ शकते. माणूस हा चुकांमधूनच शिकत असतो, आणि जो कधीच चुका करत नाही, तो कधीच काही नवीन करण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे ह्या गोष्टींचा कमीपणा वाटण्याचंही कारण नाही.
फक्त आपल्याकडून चूक झालीय ही जाणीव जर आपल्याला झाली तर ती चूक मान्य करून त्यातून शिकून परत ती चूक होऊ नये ह्याची दक्षता मात्र घ्यायची असते.

आणि एक ना एक दिवस लोकांचीही तोंडं बंद होतीलच, तेही तुमच्या कामामुळेच! फक्त तुम्ही जे करताय त्यावर तुमचा ठाम विश्वास हवा, आणि तो निर्णय तुम्ही सजगतेने घेतलेला असावा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!