Skip to content

लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंतचा काळच खूप छान असतो ?

लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंतचा काळच खूप छान असतो ?


सौ. मिनल वरपे


एकदा काय लग्न जमलं की अनेकांकडून एक वाक्य तर हमखास सांगितलं जाते ते म्हणजे लग्न जमल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ खूपच छान असतो… ते क्षण खूप खास असतात.. त्या क्षणात जगून घ्यायचं…

खर तर ते क्षण इतर सगळ्या क्षणांपेक्षा खूप वेगळे तर नक्कीच असतात… लग्न कोणत्याही पद्धतीने असेल तरी या मधल्या वेळेत दोघं एकमेकांचे जवळचे मित्र म्हणून असतात.. प्रेम आपुलकी काळजी या सगळ्या भावना दोघांमध्ये असतातच पण या नात्याला नवरा बायकोचं नाव नसते..

एकमेकांना मनापासून स्वीकारण्याची वेळ असते ही.. दोघांच्या आवडी निवडी.. दोघांचे स्वभाव याचवेळी ओळखण्याचा प्रयत्न केला जातो.. खर तर या सगळ्या गोष्टी पुढे सुद्धा होतातच पण या वेळी एकेमकांबद्दल असलेली ओढ ही वेगळी असते.. दोघांनाही वेगळं अस कोणतं बंधन नसते.. सगळ्यांनी केलेली थट्टा, लग्नाबद्दल असलेली उत्सुकता, पुढच्या जीवनाची स्वप्न यावेळेत एकमेकांसोबत शेअर केली जाते… आणि म्हणूनच ही वेळ खूपच वेगळी आणि हवीहवीशी वाटणारी असतेच…

हाच काळ खूप छान असतो अस गंमतीत म्हणणं ठीक आहे पण खरं तर एकदा लग्न झालं की त्यानंतरचे क्षण सुद्धा तेवढेच सुंदर असतात.. फरक असतो तो आपल्या विचारांचा..

लग्नाआधी दोघांनाही एकमेकांबद्दल जाणून घेण्याची ओढ असते पण हीच ओढ मात्र लग्नानंतर कमी होत जाते.. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी लग्नाआधी खूप उत्सुकता असते कारण तेव्हा दोघं ही एकमेकांसाठी नविन असतात.. एकमेकांबद्दल फारशी ओळख नसते आणि ही ओळख वाढावी..

यासाठी दोघेही जास्तीत जास्त एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात लग्नानंतर मात्र सतत सोबत असल्यामुळे न बोलता सुद्धा एकमेकांच्या आवडी निवडी, सवयी , एकमेकांची ओळख होत असते ज्यांना याची जाणीव असते त्यांना लग्नानंतरची समजून घेण्याची ही पध्दत सुद्धा खूप आवडते.. पण ज्यांना न बोलता कळत नाही म्हणजेच प्रत्येक गोष्ट बोलून व्यक्त केली तरच कळते त्यांना मात्र जोडीदार जरी समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल तरी ते लक्षात येत नाही….

लग्नानंतर सुद्धा दोघांमध्ये तेवढंच बोलणं सुद्धा होऊ शकते पण त्यासाठी दोघांनी एकमेकांशी तसा संवाद ठेवण्याची गरज असते.. एकमेकांना गृहीत धरून दिवस ढकलले तर त्या संवादातील गोडवा कसा कळणार… खरं तर लग्नाआधी दोघेही एकमेकांच्या नजरेसमोर नसतात त्यामुळे फोनवर बोलून, भेटल्यावरच काय तो संवाद होत असतो पण लग्नानंतर मात्र एकमेकांच्या सोबत राहून बोलून किंवा अबोलपणे एकमेकांशी खूप सुंदर संवाद साधता येतो..

लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी, ओळखण्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला जातो पण लग्नानंतर तर सोबतच असतो त्यामुळे समोरच्याला न विचारता सुद्धा त्याच्या वागण्याबोलण्यातून त्याच्या सवयी जाणून घेता येतात त्यासाठी खास वेळ देण्याची किंवा वेळ घेण्याची गरज नसते.. आणि लग्नानंतर तर जाणीवपूर्वक एकमेकांसाठी वेळ काढला तर दोघांनाही एकमेकांबद्दल असलेला आदर आणि प्रेम हा वाढतो..

लग्नानंतर नवरा बायको या नात्यात सुद्धा ओढ ही असतेच पण त्यासाठी दोघांनीही रोज त्याच त्याच गोष्टीत न अडकता एकमेकांसाठी, एकमेकांना आवडेल अस नवीन काहीतरी केलं पाहिजे .. रोजच तेच विचार, त्याच तक्रारी असतील तर एकमेकांचा कंटाळा यायला वेळ लागत नाही.. त्यापेक्षा तक्रारी कमी केल्या आणि जास्तीत जास्त सक्रिय राहील तर नक्कीच दोघांनाही नात्यातील ओढ जाणवेल.

लग्नाआधी तर एकमेकांबद्दल खूप साऱ्या आशा अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण होतील की नाही याची भीती सुद्धा असते.. जरी कितीही आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तरी मनात प्रश्न तर असतातच की पुढे कस होणार … सर्व जमेल की नाही पण तेच लग्नानंतर मात्र दोघांनाही वास्तवतेचे भान येते… आशा अपेक्षा तर प्रत्येकालाच असतात पण त्या पूर्ण होण्यासाठी दोघे मिळून प्रयत्न करू लागतात .. एकमेकांवरील प्रेमासाठी काही अपेक्षा बाजूला सारून जे आहे त्यामधे आनंद घेण्याची तयारी ही लग्नानंतर असलेल्या नवरा बायकोच्या नात्यातच असते..

मूळ बाळ वाढवणे, मुलांचं शिक्षण, घर सांभाळणं, घरातील आर्थिक स्थिती सांभाळणे, घरातील वातावरण कायम आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सगळ्याच जबाबदाऱ्या या लग्नानंतर जरी वाढत असल्या तरी त्या जबाबदारीचा स्वीकार करून प्रत्येक क्षणात आनंद अनुभवण्याची जर तयारी ठेवली तर संसार हा कायम सुंदर वाटेल..

लग्नाआधी असलेलं नातं, लग्नाआधीचे दिवस हे जितके छान वाटतात तेवढेच सुंदर दिवस हे लग्नानंतर सुद्धा जाणवतील फक्त एकमेकांना त्या नात्यातील आनंद देण्याचा प्रयत्न कायम केला पाहिजे..

एकमेकांना जास्तीत जास्त समजून घेणे, अपेक्षांचं ओझं एकमेकांवर न लादणे, एकमेकांना जमेल तेवढा वेळ देणे,कोणत्याही बाबतीत एकमेकांवर बळजबरी न करता नात्यातील स्वातंत्र्य जपणे, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून त्यानुसार जास्तीत जास्त त्या जपण्याचा प्रयत्न करणे, सतत एकमेकांबद्दल तक्रारी न करता एकमेकांचा आधार बनणे… यात खरचं काही कठीण आहेका… या साध्या गोष्टीतूनच संसाराची दोनही चाक अगदी सुरळीत चालतील.. आणि लग्नानंतरचा प्रत्येक क्षण हा नेहमीच सुंदर जाणवेल..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!