Skip to content

रोजच्या २४ तासांपैकी १० तास आपण इतरांना देतो आणि स्वतःला मात्र १ तासही नाही.

रोजच्या २४ तासांपैकी १० तास आपण इतरांना देतो आणि स्वतःला मात्र १ तासही नाही.


मयुरी महेंद्र महाजन

पुणे


तसं पाहिलं तर आयुष्यातल्या प्रत्येक क्षणांची मोजदाद न करता प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटायला हवा परंतु दिवसाच्या मिळणार्‍या चोवीस तासांचे आपले नियोजन कसे असते याचा आपण कधीतरी अंदाज घ्यायला हवा….. प्रत्येक वेळेस नियोजनानुसार सर्व गोष्टी होतीलच असे नसते ,आपण आपल्या झोपेची वेळ सोडली तर किती वेळ स्वतः सोबत असतो विचारा कधी तरी स्वतःला….,

आता तुम्ही म्हणणार की आम्ही तर प्रत्येक वेळेस स्वतः सोबत असतो तर मित्रांनो स्वतःसोबत शरीराने असलो तरी मनाने मात्र माझी ही कामे राहिली आहेत, मला अमुक अमुक व्यक्तीला भेटू राहिलेले काम सुद्धा पूर्ण करायचे आहे, हे तर साधे प्रश्न झालेत असे कितीतरी प्रश्न मनात सतत न थांबता निरंतर सुरू असतात… कामाची असलेली वेळ, मग ते कुठलेही असेल, त्यातल्या त्यात घराची जबाबदारी, वरकळ असलेली कामे आणि निवांत वेळ मिळालाच तर आपला मोबाईल किंवा टीव्ही….

या सर्वांमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्यासोबत इतरांनी जर आपल्याला वेळ नाही दिला तरी चिडचिड होते ,मी इतका वेळ वाट बघत होतो तुला मात्र माझ्या वेळेचे काही देणेघेणे नाही अशा पद्धतीने चिडचिड होते परंतु आपणच आपल्याला साधासा एक तासही न देता म्हटल्यावर आपल्या मनाला आपल्यावर किती चिडचिड वाटत असेल माझ्या निरीक्षणात मी बर्‍याच जणांना जेव्हा बघते …

तेव्हा असे लक्षात येते की आम्हाला सतत कुठलातरी उद्दीपक समोर असावा असे वाटते कारण या गोष्टीला माणसाने लावलेला सवयी कारणीभूत आहेत ,असे नाही की आपण आपल्या जनरेशनमध्ये असलेल्या गोष्टी वापरायला नको परंतु त्यांचा वापर आपण करतोय कि ,ती यंत्र आपल्याला वापरत आहे, याचा कुठेतरी विचार व्हायला हवा….

वेळ मिळत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर मला आवर्जून सांगावसं वाटतं ,वेळ कधीच मिळत नसतो, आपल्याला वेळ काढावा लागतो आणि हो मला असं नेहमी वाटतं की प्रत्येकाला 24 तास मिळालेले असतात फक्त त्या 24 तासात ठरवलेले नियोजन मात्र प्रत्येकाचे वेगळे असते इतकेच… कारण की 24 तास सुद्धा खूप असतात खूप काही करण्यासारखे असते त्या 24 तासात त्यापैकी आपण जर एक तास स्वतःसाठी राखून ठेवला तर बाकीचे 23 तास आपल्या आयुष्याला मिळालेली नवलाई ठरेल… मी कोण आहे?? मी कुठून आलो ???माझा जन्म कशासाठी झालेला आहे??? असे प्रश्न जर तुम्हालाही पडत असतील तर तुम्ही स्वतःच्या शोधात निघालेले आहात असं म्हणायला हरकत नाही…

रोजच्या चोवीस तासांपैकी दहा तास आपण इतरांना देतो आणि स्वतःला मात्र एक तासही नाही याचे कारण असे आहे की स्वतःच स्वतःला वेळ देण्यासाठी कुठली सक्ती( बंधन )नाही ते बंधन मुक्त आहे किंवा बरेच जण असे म्हणू शकतात की स्वतःला काय वेळ द्यायचा जेव्हा आराम करावासा वाटतो, तेव्हा आराम करून आम्ही स्वतःला वेळ देतो की स्वतःला वेळ देणे म्हणजे झोपेला वेळ देणे नाही,,

स्वतः सोबत असताना इतर कुठल्याच गोष्टीचा विचार न होता फक्त आपणच आपल्या सोबत आहोत याची अनुभूती घेणे ,….बघा एक गंमत आहे आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे त्यात गंमत अशी आहे की त्यावरून तुम्ही कोणाशी बोलायचे असेल तर लगेच एका क्लिक वरती बोलू शकता परंतु स्वतः सोबत जर बोलायचे असेल तर करून बघा स्वतःच्याच मोबाईल ने स्वतःला कॉल तो कॉल केल्यावर ती व्यक्ती बिझी आहे असं सांगतो …..म्हणजे आपल्याला सर्वांसाठी वेळ आहे, परंतु स्वतःसाठी वेळ काढायचे म्हटले तर आपण बिझी आहोत….

मान्य आहे जीवनाच्या निरंतर चालणार्‍या प्रवासात कामे प्रत्येकाला आहेत, जबाबदारी सुद्धा आहेत, नोकरी असेल, व्यवसाय असेल,अन्य काही असेल परंतु या सर्वांमध्ये कधीतरी निवांत बसावे आपल्या मोबाईल ला सोडून आणि स्वतःला एक प्रश्न विचारावा मी सर्वांसाठी तर जगतो आहे परंतु मी माझ्या स्वतःसाठी कधी जगलोय का?? माझ्या आयुष्यात मी स्वतःला जे काही द्यायला हवं होतं ते मी स्वतःला दिलेलं आहे का ?????

कधीतरी ध्यानधारणा करून स्वतःच्या अंतर्मनात डोकवायला हवे आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते…. मन सांगते असं नको करायला आणि अहम ची ईच्छाशक्ती सांगते घेऊन बघ असे करत करत या शरीराला आतून पोकळ होईपर्यंत ही क्रिया चालते….. आणि नंतर पश्चाताप करून मी असं करायला नको होते याची जाणीव होते.

जर आपण स्वतःला वेळ दिला तर आपण कुठल्याही व्यसनात कधीच अडकणार नाही जीवनाचा पूर्णपणे आनंद अनुभवायला मिळेल याची पूर्ण खात्री कारण स्वतःचे अस्तित्व स्वतः सोबत घेऊन जगणारी माणसं कधीच एकटी नसतात,,,, तुम्ही सर्व आहात ना…. स्वतःसोबत…… इतरांना न्याय देता देता कधी स्वतःचं स्वतःवर अन्याय नाही होऊ द्यायचा कारण इतरांना काय वाटेल याचा विचार फार लवकर होतो परंतु आपल्या मनाला काय वाटेल इथे मात्र कुठेतरी मनाची कसरत होते ,बघा ….स्वतः साठी आपण किती वेळ आणि कसा वेळ देणार आहात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

….!!!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!