राग आल्यावर थांबलं आणि चूक झाल्यावर नमलं तर पुढचे अनेक प्रॉब्लेम टाळता येतात.
हर्षदा नंदकुमार पिंपळे
राग……! राग शब्द जरी ऐकला तरी कितीतरी गोष्टी सहजपणे आपल्याला आठवतात.रागाच्या भरात केलेलं सगळं आपल्याला आठवत राहतं.इतकच नाही तर कुणाचा राग शांत करायला काय काय केलेलं असतं हेही आपल्याला आठवत राहतं.मित्रांनो , राग ही खरं तर एक नैसर्गिक भावना आहे. राग येणं अगदी स्वाभाविक आहे. कुणाला
कोणत्या गोष्टीचा राग येईल तेही आपण सांगू शकत नाही. इतकच नाही तर कुणी राग आल्यावर कसं React होऊ शकतं तेही आपण सहजासहजी स़ांगू शकत नाही.कारण राग आल्यावर कुणी शांत बसतो तर कुणी अगदी तावातावाने पेटून उठतो.कित्येकांच्या रागावर कंट्रोल हा नसतोच.राग आला की स्वतःला त्रास करून घेणे , जी वस्तू दिसेल ती फेकने वगैरे अशा गोष्टी काही जणं सर्रासपणे करतात.
कळत नकळतपणे का होईना त्या त्यांच्या हातून घडतात.पण मग अशा या रागाच्या परिस्थितीत आपण अनेकदा स्वतःच आणि इतरांचही नुकसानच करत असतो. राग आला की जरा म्हणून काही जण थांबत नाही. तर अशा रागावर कंट्रोल नसणाऱ्या प्रत्येकाला एकच सांगणं आहे की…. राग आला की थोडसं थांबून पहा.स्वतःच्या रागावर थोडासा कंट्रोल ठेवायला शिका.
कारण पुढे होणारे कित्येक प्रॉब्लेम्स हे सहज टळू शकतात. नाहीतर रागाच्या भरात आपण काय काय करतो. आपल्या मनात नसतानाही आपण कुणाला नको ते बोलून जातो.एखाद्या वस्तू तोडतो , लहान-सहान काहीच पाहत नाही. त्यांच्यावरही हात उगारतो.थोडक्यात’वड्याच तेल वांग्यावर काढणे’ आपल्या सवयीचे होऊन जाते.
आणि हे केवळ रागाच्याच बाबतीत नाही तर चूकीच्या बाबतीतही आपण अनेकदा असेच वागतो. इतरांकडून आणि आपल्या स्वतःकडूनही चूका या होतातच.पण चूक झाल्यावरही आपण अनेकदा गोंधळ घालतो.एकमेकांना दोष देत बसतो.त्याच चूकीतून भांडणाला उगाचच निमित्त मिळतं. स्वतःकडून आणि दुसऱ्याकडूनही चूक झाल्यावर आपण सहसा नमतं घेत नाही. ज्याची चूक झाली त्याला थेट धारेवरच धरायला निघतो.एका चूकीमुळे त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून जातो. “तू जबाबदार आहेस याला…तुझ्यामुळे हे झालं…”वगैरे वगैरे बोलून पार एखाद्याला सोलवटून टाकतो.
पण अशावेळेस एखादं मन चुकीची पावलं उचलायला अजिबात डगमगत नाही. सतत एखाद्याला त्याच्या चूकीवरून बोलणे कधी कधी खूप महागात पडू शकते.कारण राग,चूका हे शब्द जरी छोटे वाटत असले तरी यांचा होणारा परिणाम मात्र भयंकर मोठा असतो.आणि या परिणामांना नाही म्हंटलं तरीही आपल्याला सामोरं जावं लागतं.त्या परिणामांचा प्रत्येकाला काही ना काही त्रास हा सहन करावाच लागतो.
सगळं कसं अवघड होऊन बसतं.सगळा पसारा नंतर स्वतःलाच आवरावा लागतो. स्वतःची ऊर्जा आणि वेळ दोन्हीही यामध्ये खर्च होते.कित्येकांना तर आपण उगाच यात ओढतो.थोडक्यात एखाद्याचा नाहक बळी घेतो.जसं एखाद्या चहात बुडलेल्या बिस्कीटाला काढण्यासाठी आपण दुसऱ्या बिस्कीटाचाही बळी घेतो.
त्यापेक्षा थोडं थांबलं तर काय होईल…? कुणी नमतं घेतलं तर काही बिघडणार आहे का…? नाही नं…..?
जर नंतर होणारे असे उपद्व्याप टाळायचे असतील तर खरच राग आला तर थोडं थांबलं पाहिजे.चूका झाल्या तर थोडं नमतं घेतलं पाहिजे.थोडं समजून , थोडं शांत राहूनही गोष्टी हाताळता येतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर रागाच्या भरात नुकसानच जास्त होणार आहे.कधी कधी नमतं घेऊन शांतपणे आपण चूकांची जाणीव करून देऊ शकतो.
प्रत्येक वेळी गोष्टी उद्ध्वस्त केल्या पाहिजेत असं नाही.चूका होतात…त्यामुळे त्या समजून उमजून घेऊन आपण नमतं घ्यायला हवं.राग अनावर होतो कधी कधी पण त्याला आवरल तर पुढच्या अनेक गोष्टी सहज हाताळता येतात. जर आपलाच आपल्यावर कंट्रोल नसेल तर गोष्टी अवघडच होणार नं….?
म्हणून;कधी कधी थोडं थांबायला शिका…
कधी स्वतःही नमतं घ्यायला शिका…
राग हा येतच राहणार…
आणि चूकाही होतच राहणार….
तुम्ही केवळ हसतहसत झेलायला शिका….
मित्रांनो,आयुष्य खरच खूप सुंदर आहे
थोडं समजून घ्यायला शिका…!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


