या संपूर्ण ब्रम्हांडातील सर्वात शांत ठिकाण म्हणजे ‘आपलं मन’..!!
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
आयुष्य जरा जास्तच गोंधळून गेलय.या धकाधकीच्या जीवनात थोडी म्हणून जीवाला उसंत नाही.खूप ताण आलाय. थकल्यासारखं वाटतय. जरा शांत ठिकाणी जावसं वाटतय.निवांत पहूडावं वाटतय…असं कितीदा होतं ना आपल्या बाबतीत…..??शांत ठिकाणी जावसं वाटतय म्हणजे नक्की कुठे जावसं वाटतं…..?? जिथे मानसिक शांतता मिळेल त्या सुंदर नी शांत ठिकाणी आपल्याला जावसं वाटतं.आणि मग आपण वेगवेगळे प्लॅन्स बनवायला लागतो.
इथे जायच की तिथे जायचं ? हे छान आहे की ते…??यामध्ये आपण आपला कितीतरी वेळ घालवतो.महाबळेश्वर नाहीतर मग गोवा…नकोनको त्यापेक्षा मनाली ला जाऊयात….आपल्याला वाटतं की अशी ठिकाणं सगळ्यात शांत आहेत. पण ती निवडतानाही आपण तळ्यात मळ्यात करतो.
पण मित्रांनो , ही सगळी रम्य आणि डोळ्यांना दिसणारी भौतिक ठिकाणं झाली.तितेही वाटतं शांत. पण या संपूर्ण ब्रम्हांडातील सर्वात शांत ठिकाण म्हणजे ‘आपलं मन’ आहे. पण आता तुम्हाला असही वाटेल की , मन कसं काय एखाद शांत ठिकाण असु शकतं…??आणि मुळात मन डोळ्यांना तर दिसतही नाही..??आणि मनात तर नेहमीच काहुर माजलेलं असतं…???मग तरीही हे शांत ठिकाण कसं काय…???
तर मित्रांनो खरचं मन हे सगळ्यात शांत ठिकाण आहे. आपण केवळ तिथे कधी सहसा फिरायलाच जात नाही. शांतीच्या ठिकाणांमध्ये कदाचित या मनाचा नंबर शेवटीच असावा.किंवा तो नसावा.तुम्हाला माहीत नसेल पण या ठिकाणी गेल्यावर एक वेगळीच शांतता आपण अनुभव असतो. त्यामुळे कधीतरी या शांत ठिकाणी एकदा तरी नक्की जायला हवं. यात इतकं काय आहे की हे ब्रम्हांडातील सर्वात शांत ठिकाण आहे….??असा प्रश्न कदाचित सगळ्यांना पडलाही असेल.पण याचं उत्तर मात्र क्वचितच मिळालं असेल. तर मित्रांनो जाणून घेऊयात या शांत ठिकाणाबद्दल……………..
मन माझे मोरपिशी स्वप्न जणू…
मन माझे शिशिरातील इंद्रधनू…
वाह्…!! ‘रोहिणी निनावे’ यांनी यांनी लिहिलेल्या या ओळी कानांना ऐकायला अगदी मधुर वाटतात. पण जेव्हा त्यांचा अर्थ आपल्याला समजतो तेव्हा मात्र त्याच ओळी तनामनात अक्षरशः एक वेगळीच नवी रुंजी घालून जातात.मोरपिस आणि इंद्रधनू या दोन्ही गोष्टींकडे पाहिल्यावर आपल्याला खूप छान वाटतं.
आपल्या डोळ्यांना ते दृश्य सारखं बघत रहावस वाटतं. पण मला ते इंद्रधनू पहायचय पुन्हा पुन्हा… ही ओढ मात्र मनातून येते.थोडक्यात काय तर मनातच इंद्रधनू नी मोरपिस आपल्याला सतत आपल्या अवतीभवती आहेत असचं जाणवतं. त्यांना पाहून मानसिक शांतता मिळतेय की काय असचं वाटतं. इतकच नाही तर आयुष्य जितक सहज सुंदर सोपं वाटत असतं
तितकच ते अवघडही असतं. आयुष्यात असंख्य प्रश्नांचं चांदण भर अमावस्येलाही दिसत असतं.पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत आपल्याला मिळत नाही. तोपर्यंत आपण काही शांत होत नाही. आपल्या हृदयाची धडधड चालूच असते.मांजर जशी डूक धरते तसच कधीकधी संकटांचे पर्वत डूक धरून उभेच असतात.
यामध्ये आपण थकून जातो.आयुष्याच चित्र पूर्णतः बदलेल असतं.पण यामधून बाहेर यावं..एखाद्या शांत ठिकाणी जावं असं वाटणं अगदी साहजिक आहे. तर जायचं असेल अशा एखाद्या ठिकाणी तर ‘मन’ नावाच एक सुंदर असं ठिकाण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते अगदी शांत असं ठिकाण आहे. जिथे तुम्हाला पुन्हा पुन्हा नक्कीच जायला आवडेल.
कारण—डोळे अलगद मिटल्यानंतर थोडा दीर्घ श्वास घेऊन जे काही अनुभवत असतो ते म्हणजे खरं सुख आहे. कारण मिटल्या डोळ्यांना काही दिसत नसतं पण खूप काही जाणवत असतं.आपण स्वतःशीच संवाद साधत असतो.आपल्याच आयुष्यातील गुंता आपण सोडवत असतो.कुठे ,कसं नी काय चुकलं याची व्यवस्थित उत्तरं आपल्याला हळुहळू सापडतात.आयुष्यात माजलेलं काहूर काही काळासाठी तरी थांबतं.सगळं जाणवायला लागतं.समजायला लागतं.
बंद खोलीच्या सगळ्या खिडक्या उघडतात नी खिडकीतून समाधानाचे वारे वाहायला लागतात. अशी मंद वाऱ्याची झुळूक सुखद शांतता देऊन जाते.आणि आयुष्य उलगडल्यावर जो काही आनंद, जी काही रिफ्रेशिंग करणारी feeling असते ती केवळ आपल्या मनातच असते.आपण फक्त ती इतरत्र शोधत असतो. ‘काखेत कळसा नी गावाला वळसा’ हे अचूक लागू होतं आपल्याला. कारण शांततेसाठी आपण आपलं मन सोडून थेट काश्मिर नी केरळ गाठतो.आपलं मन आपल्या जवळच असतं.केरळला जाऊन शांत वाटेलही.काही प्रश्नांची उत्तरं मिळतीलही.
पण जिथे आयुष्य अगदी एका कळीप्रमाणे उमलतं ,फुलाप्रमाणे फुलतं ,ते मनासारख शांत ठिकाण दुसरं कोणतही नाही.आणि हो…आपलं मन काही असं पर्यटनासाठी जात नाही.उलट आपणच कधीतरी पर्यटनासाठी ‘मना’सारख्या शांत नी सुंदर ठिकाणी आवर्जून गेलं पाहिजे.
खरचं या संपूर्ण ब्रम्हांडातील सर्वात शांत ठिकाण म्हणजे ‘आपलं मनच’ आहे. हे एकदा त्या मनाला भेट दिल्यावर नक्कीच समजेल.
मनासारखा ठिकाण म्हणजे आपल्यासाठी एक पर्वणीच आहे. तिथे फिरायला गेल्यावर तो सहवास सतत हवाहवासा वाटणारा आहे. तिथे तुम्ही आणि तुमची ती place अर्थात मन…..ह्या दोनच गोष्टी असतात. असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळतात.न सुटलेली कोडी उलगडायला लागतात.आणि मग आनंदाची हिरवळ पसरत जाते. समाधानाचा पाऊस बरसतो.सुखाचे झरे खळखळून हसतात.ओल्या मातीचा सुगंध घ्यावा तसच त्या शांततेचा सुगंध आपण मनसोक्तपणे अनुभवत असतो.मग मला सांगा….यापेक्षा शांत नी सुंदर अजून काय असु शकतं…???
अगदी फ्री…..मध्ये एकदा तरी अवश्य भेट द्या…ब्रम्हांडातील या सर्वात शांत ठिकाणाला… अर्थातच ‘आपल्या मनाला’….!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


